चव्हाण, झांबड की बनसोड औंरगाबादमध्ये चाललेय आघाडीची धरसोड..

चहावाल्यापासून रिक्षावाल्यापर्यन्त आणि आयटीवाल्यापासून सातव्या वेतनवाल्यापर्यन्त प्रत्येकाला हाच इंटरेस्ट आहे की २०१९ ला काय होणार. कॉंग्रेस येणार की मोदी कायम राहणार? भाजपच येणार पण नितीन गडकरी असणार काय? ऐन टायमिंगला तिसरी आघाडी हिट ठरणार. वंचित आघाडी वंचितच राहणार वगैरे वगैरे.

आत्ता गावागावातल्या या चर्चांचा विस्फोट बोलभिडू वर होतच राहणार आहे. त्यातलीच आजची चर्चा औंरगाबादची.

औंरगाबाद म्हणजे खा. चंद्रकांत खैरे यांचा बालेकिल्ला. सहसा कसं असतं बालेकिल्ला असो किंवा नसो पण दोन तीन टर्म झाल्या की निवडून येणारे त्यास “बालेकिल्ला” म्हणू लागतात. आत्ता शिवरायांचे बालेकिल्ले असे असायचे की एक एक किल्ला जिंकताना शत्रूंचा कस लागायचां. पण राजकारणातले बालेकिल्ले तसे नसतात. हळुच सुरूंग लावून ते उडवून लावण्याचं खास कसब विरोधकांकडे असतं. औंरगाबादचा बालेकिल्ला हा असाच.

यंदा कॉंग्रेसकडून दर्डा, झांबड, सत्तार अशी नेहमीची नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी मात्र सतिश चव्हाण यांच्या नावावर अडून आहे. अर्थात हे राष्ट्रवादीचं दुर्दैव आहे. दुसरा उमेदवारच नाही. ज्या पक्षाला सतीश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त उमेदवार सापडत नाही त्या पक्षाला मतदार शोधायचे आहेत. सेनेकडून यावेळीही खैरेच उभे राहणार आहेत हे जगजाहिर आहे. भाजपला युती झाली नाही तर बागडेंना मैदानात आणावे लागेल. दोन चार जणांना विचारल्यानंतर कॉंग्रेसतर्फे प्रा. रवींद्र बनसोड लढणार म्हणून सांगण्यात आलं. प्रा. बनसोड यांचं नाव कॉंग्रेसतर्फे चर्चेत येण्यामागे काहीतरी मोठी खेळी आहे.

पक्षश्रेष्ठी औरंगाबाद मध्ये सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे का? मागे आ. सुभाष झांबड आणि प्रा. रवींद बनसोड अशी कॉंग्रेसअंतर्गत तिकीटाची स्पर्धा रंगली होती. 

आत्ता या पुर्वअनुभवावर एक बातमी ऐकण्यात आली. ती म्हणजे औरंगाबादची सीट राष्ट्रवादीच्या ताब्यात.

आत्ता आघाडीचं गणित आघाडीच जाणो. पण राष्ट्रवादीला नेमक तिकीट का तर सतिश चव्हाण यांच्यासाठी खुद्द शरद पवार यांच्याकडून लावण्यात आलेली फिल्डिंग. आत्ता राजकारणात जरा सौम्य इंटरेस्ट असणाऱ्यासाठी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सध्या आतल्या गोटातून एकमेकांना जागा सोडायचा खेळ चालू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडे नगरच्या सीटची ऑफर विखेंच्या गोटातून आली आहे. विखे आणि पवार हे विळ्या भोपळ्याच सख्य. तरिही विखेंच्या उत्तराधिकाऱ्यांसाठी हि जागा पवारांनी सोडायची ठरवलं तर त्याबदल्यात पवारांनी औरंगाबादची जागा मागितली आहे.

फक्त औरंगाबादच नाही तर नंदुरबार पण खाली करण्याची ऑफर असल्याचं फोन वरुन माहिती पुरवणारे पक्षातले लोक सांगतात. समजा अस झालंच तर औरंगाबादची जागा राष्ट्रवादीच्या खिश्यात जावू शकते आणि इथे शरद पवार पुन्हा कॉंग्रेस देखील आमचीच हे सिद्ध करु शकतात. 

पक्षांतर्गत राजकारण ठिकच आहे पण यानिमित्ताने प्रा. रवींद्र बनसोड सारखी अराजकीय माणसं मैदानात ऊतरताहेत ही चांगली गोष्ट आहे. कॉंग्रेसला अशा अभ्यासू आणि प्रभावी वक्त्याची गरज आहे.कॉंग्रेसकडे आज प्रभावी वक्ता नाही. अर्थात कॉंग्रेसने पैसा हाच निकष  ठेवला तर पहिले पाढे पंचावन्न आहेतच. बनसोड यांच्यासारखे वक्ते आणि अभ्यासू नेते भाजप आपल्याकडे केंव्हाही ओढून नेऊ शकते. आज भाजप मध्ये कॉंग्रेसी आणि राष्ट्रवादी मुळ असणारी किती जण आहेत याची वेगळी आकडेवारी देण्याची गरज नाही. पण त्यांनी पक्ष का सोडला तर नेहमीच्या जागा वाटपाच्या गोंधळातून.

कॉंग्रेसच तिकीट फिक्स म्हणून काम करणारे आ. सुभाष झांबड असतो की प्रा. बनसोड किंवा अन्य कोणी कार्यकर्ते असो. पक्ष लढला तर वाढतो याचं गणित राहूल गांधी मांडताना फेल होतील याचाच परिपाठ दिसेल. बाकी सतिश चव्हाण यांना तिकीट मिळालं तरी ते देखील उत्तम लढतील हे देखील खरं. राष्ट्रवादीच्या मधुकर मुळे अण्णांच्या ताब्यातून चव्हाण यांनी ज्या धूर्तपणे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ताब्यात घेतलं ते सगळ्यांना माहित आहे.

अर्थात त्यामुळे चव्हाणांना विरोधकपण खूप आहेत. एकाअर्थी सतिश चव्हाण यांना ताकद देवून त्यांना मराठवाड्यात पक्ष वाढवण्यासाठी लढायला लावण हा शरद पवारांचा निर्णय असू शकतो. पण या तहात कॉंग्रेस सपशेल हारत आहे हे नक्की. औरंगाबादची जागा कॉंग्रेसने लढवली तर रंगत येऊ शकते. हा कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

सतिश चव्हाण शिक्षण संस्थाचालक आहेत. बनसोड कोचिंग क्लासेसवाले आहेत. रिझल्टसाठी कोचिंग क्लासकडे लोकांचा ओढा असतो. काहीही असो चव्हाण किंवा बनसोड या दोघांच्या संस्था, मराठा कार्ड आणि जनसंपर्क यामुळे चंद्रकांत खैरेंना पेपर जड जाणार आहे. तिकीट कोण मिळवतो हे महत्वाचं. तिसराच कुणी कॉंग्रेस उभा करू शकते.

कॉंग्रेसला शेवटी युद्धात जिंकण आणि तहात हारणं हे सवयीचं झालं असावं.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Satish says

    आपल्याला माहिती असावी की मराठी माणसाचा खरा नेता कोण तोही औरंगाबाद मधील कारण जर आजवर चे नेते खरे मराठी असते तर त्यांनी आतापर्यंत कचरा उचलण्यासाठी एवढा वेळ लावला नसता म्हणून म्हणतो अशा प्रश्नांना जाणून घेण्यासाठी जर आपणास खरा माणूस पाहिजे असेल तोही मराठी हिंदवी मराठी तर माणूस रवींद्र बनसोड पाटील यांच्याशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही

Leave A Reply

Your email address will not be published.