औरंगाबादचे जाधव मुख्यमंत्री अंतुलेंच्या अंगावर धावून जातात कारण

औरंगाबादचे जाधव म्हणजे विश्वनाथराव जाधव. विश्वनाथराव जाधव हे औरंगाबादमधून दोनदा आमदार म्हणून निवडून आले होते.

एका जाहीर बैठकीत ते थेट मुख्यमंत्री अंतुले यांच्या अंगावर धावून गेले होते. ते पण उगीच धावून जायचं म्हणून नाही तर मुख्यमंत्री अंतुले यांना एक दोन ठेवून द्यायच्या या हेतूनेच.

मात्र अंतुले मुख्यमंत्री होते. त्यांना पोलीसांच संरक्षण होतं. पोलीस अचानक मध्ये पडले आणि अंतुलेंची जाधवांच्या तडाख्यातून सुटका केली.

हा किस्सा झाला होता तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्याकडे होती तर यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा कॉंग्रेसकडून फारकत घेतली होती.

झालेलं अस की,

मराठवाड्याच्या मागण्यासंबधी विचार करण्यासाठी औरंगाबादला कॅबिनेटची बैठक भरवली होती. तेव्हा विश्वनाथराव जाधव व त्यांचे समर्थक यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी कॅबिनेटची मिटींग चालू होती तिथे मराठवाड्याच्या मागण्यांसंदर्भात मोर्चा घेवून जाण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.

ठरल्याप्रमाणे औरंगाबादमध्ये कॅबिनेट मिटिंग सुरू झाली आणि तब्बल दहा हजारांचा मोर्चा या बैठकीच्या दिशेने रवाना झाला. मोर्चाने मराठवाड्याच्या विकासासंबधित ११ मागण्या समोर ठेवल्या होत्या.

मोर्चा येताच मुख्यमंत्री अंतुले यांनी मोर्चाला चर्चेसाठी बोलवलं. विश्वनाथराव जाधव यांच्यासह समर्थक चर्चेसाठी गेले. चर्चा सुरू होताच, मुख्यमंत्री म्हणाले तुमच्या ११ काय मी १२ मागण्या मान्य करतो. चर्चा सकारात्मक दिशेने चालू झाली.

इतक्यात यशवंतराव चव्हाणांच नाव चर्चेत निघालं. यशवंतराव चव्हाणांच नाव ऐकताच अंतुले म्हणाले,

वो काळा दगड, उसको क्या आता हैं.

यशवंतराव चव्हाणांना काळा दगड म्हणताच लोकांच पित्त खवळलं. विश्वनाथराव जाधव उभे राहिले आणि थेट अंतुलेंच्या अंगावर धावून गेले. पोलीस आणि कार्यकर्त्यांनी कसबस जाधवांना धरलं. तिथून लोक गेले आणि अंतुलेंची सुटका झाली.

आजकाल नेत्यांना आपल्याच भागापुरत मर्यादित ठेवलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठवाड्याचं नुकसान केलं असा आरोप वारंवार केला जातो. मात्र यशवंतरावांना सर्वाधिक प्रेम मिळालं ते मराठवाड्यातूनच.

त्यांनी डॉ. झकेरिया यांना औरंगाबादमधून निवडून आणलं. औरंगाबादमध्ये पंचतारांकित हॉटेलांपासून ते विमानतळ सुरु करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून डॉ. झकेरिया यांनी केलं.

मराठवाड्याचं आतोनात प्रेम यशवंतरावांवर असल्याने त्यांच्या बद्दलचे अनुद्गार खपवून घेणं अशक्य होतं आणि तेच झालं. 

हे ही वाच भिडू