बादशाहची सत्ता असलेलं औरंगाबाद शहर छत्रपतींच्या दर्शनासाठी उतावीळ झालं होतं..

पुरंदरचा तह झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या भेटीस जावे असा मिर्झा राजे जयसिंग यांचा आग्रह सुरु होता. शिवरायांना देखील उत्तरेतील मुघल राजवटीची पाहणी करायची होती पण औरंगजेबाचा कपटी स्वभावामुळे दगा फटका होण्याची भीती होती.

एकतर मुघलांच्या राजधानीत जाऊन भर दरबारात मुघल बादशाहाची भेट घ्यावयाची म्हणजे महाराजांच्या दृष्टीने एक कसोटीचा प्रसंग. कुठल्याही प्रकारचा अन्याय आणि कसल्याही प्रकारचा अवमान सहन करण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. महाराजांचा तो स्वभावच नव्हता.

औरंगजेबाला या दक्षिणेत तुफान माजविणाऱ्या राजाला प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता होतीच. त्याने मिर्झा राजे जयसिंग यांना काहीही करून महाराजांना आग्र्याला पाठवा असा दबाव होता. मिर्झा राजेंनी शिवरायांची मनधरणी करण्याची कोणतीही कसर सोडली नव्हती. महाराजांना सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घेतली.

मिर्झा राजे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून महाराज आग्रा भेटीसाठी निघाले.

५ मार्च १६६६ रोजी त्यांनी राजगडावरून प्रस्थान केले. त्यांच्यासोबत निवडक सरदार आणि युवराज संभाजी महाराज देखील होते. प्रयाणापूर्वी स्वराज्याची सगळी जबाबदारी त्यांनी राजमाता जिजाऊंच्या कडे सोपवली. ३ हजारांचे सैन्य घेऊन महाराज गडावरून बाहेर पडले.

राजपूत राजे जयसिंग यांच्या आग्रहाखातर महाराजांनी औरंगाबाद शहरात मुक्काम ठेवला. त्यांच्या या आगमनाचे भीमसेन सक्सेना या इतिहासकाराने तारिख ए दिलकशा या ग्रन्थात वर्णन केले आहे.

शिवरायांच्या ताफ्यात सर्वांत पुढे एक महाकाय हत्ती होता, ज्याच्या माथ्यावर त्यांची सोनेरी किनार असलेली भगवी ध्वजा होती. त्यांच्या सैन्याचे उच्चधिकारी पाठीमागून घोड्यांवरून चालत होते. घोड्यांना सोनेरी आणि चांदीच्या आभूषणांनी सजवण्यात आले होते. या लवाजम्यासमोर दखनी लष्कराची तुकडीही होती.

छत्रपती शिवाजी महाराज एका पालखीत विराजमान झालेले होते. ही पालखी चांदीने मढवलेली होती आणि तीवर सोन्याची चित्रे होती. हौद्यांनी सजवलेल्या दोन हत्तिणी या पालखीच्या मागून जात होत्या.

औरंगजेबाच लाडकं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादची जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी उतावीळ झाली होती. आगमनाची खबर शहरात वणव्यासारखी पसरली आणि शेकडो लोक त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर आले. त्यांची एक झलक मिळावी यासाठी पुढे जाण्याची जणू स्पर्धाच लागली होती.

इतके लोक आले होते मात्र तरीही औरंगाबादचा मुघल सुभेदार सफशिबन खान स्वतः त्यांच्या भेटीला गेला नाही. त्याने आपल्या पुतण्याला स्वागतासाठी पाठवले होते. त्याला वाटलं की महाराज त्याच्या हवेलीवर येतील पण तस घडलं नाही. 

महाराजांनी थेट जयसिंग पुऱ्यातील मिर्झा राजेंच्या हवेलीवर गेले. इकडे वाट बघत बसलेल्या खानाचं धाबं दणाणलं. शिवाजी महाराज आपल्या गुस्ताखीमुळे चिडले आहेत हे त्याच्या ध्यानात आले. गडबडीत जयसिंगपुऱ्यात जाऊन त्याने महाराजांची भेट घेतली.

जयसिंगपुरा आणि पहाडसिंगपुरा परिसरात हा मिर्झा राजे जयसिंग यांचा राजवाडा होता आणि त्याच्या सभोवताली सोनेरी महाल होता. या महालाच्या पाठीमागेच सुखनपुरा, हनुमान टेकडी आणि गोगापीर टेकडी होती.

जयसिंगपुरा, टाऊन हॉल, जामा मशीद, किले अर्क, रंगीन दरवाजा, दिल्ली दरवाजा, रोझा बाग या मार्गाने महाराज हर्सुल सरायमध्ये पोहोचले होते. अर्थात, त्यावेळी बहुसंख्य दरवाजे आणि तटबंदीचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम १८९२ मध्ये पूर्ण झाले.

शिवरायांच्या प्रमाणे मिर्झा राजे हे देखील शिवभक्त होते. ते हवेलीच्या मागील बाजूस महादेव मंदिरात पूजेसाठी जात. त्याच महादेव मंदिरात शिवाजी महाराजांनी पूजा केली होती. तसेच या परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही महाराजांनी दर्शन घेतले होते. शिवछत्रपतींच्या आगमनामुळे त्यानंतर जयसिंगपुरा सर्वत्र प्रसिद्ध झाला. 

दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुभेदार खानची भेट घेतली होती. तिथे बादशहाने महाराजांसाठी पाठवून दिलेला बहुमान पोशाख व नजराणा सुपूर्द करण्यात आला. येण्याजाण्याचा लष्कराचा खर्च म्हणून औरंगजेबाने शाही खजिन्यातून १ लाख रुपयांची तरतूद केली होती, ती देखील महाराजांकडे सोपवण्यात आली.

औरंगजेबाने महाराजांना एक पत्र देखील पाठवले होते. त्यात म्हटले होते की,

“तुम्ही विश्वासाने आमच्याकडे यावे, भेट झाल्यावर आपला मोठा सत्कार करण्यात येईल आणि माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल.”

औरंगाबादेत महाराज दोन दिवस मुक्काम केला आणि त्यानंतर आग्याकडे प्रयाण केले.छत्रपती शिवाजी महाराजांची या शहराच्या वाट्याला आलेली ही एकमेव भेट ठरली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.