औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावाचं मुंडकं कापून भाल्यावर नाचवलं होतं.

औरंगजेब म्हणजे महाधूर्त, बेरकी राजकारणी आणि अतिशय क्रूर कृत्ये केलेला शासक. सतराव्या शतकात होऊन गेलेल्या काही बलाढ्य बादशाहपैकी एक. औरंगजेब जेव्हा मुघल सम्राट होता, तेव्हा त्याचे साम्राज्य काबुल कंदहार पासून ते बंगालपर्यंत आणि उत्तरेत काश्मीरपासून तामिळनाडूच्या सीमेपर्यंत पसरलेले होते. अकबरानंतर एवढ्या मोठया भागावर राज्य करणारा एकमेव मुघल बादशाह म्हणून त्याची इतिहासाने नोंद घेतली. पण ही गादी, हे साम्राज्य त्याला वारसाहक्काने मिळाले नाही. यासाठी त्याने रक्ताचे पाट वाहीले.

मयूर सिंहासनावर बसण्यासाठी आपल्या 36 नातेवाईकांना मारणाऱ्या औरंगजेबाची ही गोष्ट आहे.

इसवी सन 1657-58 ची गोष्ट. शाहजहाँन बादशाह आजारी पडल्याची बातमी त्याच्या चार मुलांना समजली. शाहजहाँन ला बरीच मुलं होती. त्यांपैकी सर्वात लाडका मुलगा दारा शुकोह. दारा त्यावेळेस पेशावर भागात सुभेदार म्हणून तैनात होता. शाह शूजा बंगालचा सुभेदार, मुराद मध्यभारत-गुजरात बाजूस तर औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून कार्यरत होता.

एकाच वेळेस या चारही मुलांनी आग्र्याकडे प्रयाण केले. वडिलांच्या काळजीने नव्हे, तर दिल्लीच्या गादीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी.

रस्त्यात मुराद आणि औरंगजेबाची युती झाली होती. शाह शुजा तर बंगालहून गंगेच्या पाण्यात होड्या टाकून दिल्लीकडे निघाला. पण त्याच्या मागे मुरादचा मुलगा, दिलेरखान आणि तीस हजारांचे सैन्य औरंगजेबाने लावून दिले. शुजा उलट्या पावली पळत अरसाईच्या डोंगररांगेत जाऊन लपला. आजवर त्या मुघल राजपुत्राची कबर कुठे आहे, त्याला कुणी मारले की त्याला नैसर्गिक मृत्यू आला, याविषयी कोणतेही उत्तर इतिहासात सापडत नाही. एका भावाचा निकाल लावल्यावर औरंगजेब वळला दारा शुकोह कडे.

दाराच्या फौजेच्या एका तुकडीचा औरंगजेबाने धर्मतजवळ दारुण पराभव केला. समूगढ जवळ या दोन्ही भावांची आमने-सामने गाठ पडली. मुराद तर औरंगजेबाच्या पक्षात सामील होता.

‘तुला बादशाह बनवून मी आयुष्यभर अल्लाचे स्मरण करीन’ असे लालच त्याला दाखवल्यामुळे मुराद गाफील होता.

एक भाऊ तर आधीच पळून गेलेला. आता फक्त दाराचा निकाल लावला की बस, मुघलांची राजसत्ता आपल्या पायाशी लोळण घेणार, हे औरंगजेबाला समजले. समूगढच्या लढाईत दाराचा दारुण पराभव झाला. तो इराणकडे पळून गेला. इकडे मुरादला एका गाफील क्षणी औरंगजेबाने आपल्या सैनिकांकरवी कैद केले आणि आजन्म काळकोठडीत टाकले.

इकडे दारा इराण, पेशावर, कराची, गुजरात असे वणवण भटकत शेवटी राजपुतण्याच्या बोलणखिंडीजवळ येऊन पोहोचला.

इथल्या ‘दादार’ गावचा जमीनदार होता ‘जीवन मलिक’. शाहजहानच्या काळात या जीवन मलिकने प्रचंड मोठा अपराध केला होता. त्यामुळे शाहजहानने त्यास हत्तीच्या पायाखाली चिरडून मारण्याची शिक्षा दिली. पण दाराच्या मध्यस्तीमुळे जीवन मलिकचे प्राण वाचले. पुढे चालून हा मलिक संपत्तीच्या मोहापाई आपल्यासोबत दगा करेल, याची दाराला सुतराम कल्पना नव्हती. या मलिकने जहागिरीच्या लोभापाई औरंगजेबाला दाराच्या ठिकण्याची माहिती दिली.

मिर्झा राजे जयसिंग, दिलेरखान आणि काही मातब्बर सरदारांनी दाराला अटक करण्यासाठी दादार गावावर आक्रमण केले. दाराला बोलनखिंडीजवळ अटक करण्यात आली.

२९ ऑगस्ट १६५९ रोजी त्याला दिल्लीत आणण्यात आले. एका चिखलाने माखलेल्या घाणेरड्या हत्तिणीच्या पाठीवर अत्यंत साध्या हौद्यात दाराला बसवले. त्याचे पाय साखळदंडाने बांधलेले होते आणि त्याच्या पाठीमागेच नांगी तलवार घेऊन गुलाम नजर बेग बसला होता.

मळक्या कपड्यात, डोक्यावर केवळ एक फडके गुंडाळलेल्या दाराची साऱ्या दिल्लीतून धिंड काढण्यात आली. आपले मरण त्याला निश्चित दिसत होते.

एवढ्या बिकट काळातसुद्धा दाराने आपल्या लहान भावाला, औरंगजेबाला एक बोलके पत्र लिहिले. दारा म्हणतो,

“मला राज्यप्राप्तीची अपेक्षा राहिली नाही. तू मला मारून माझ्यावर अन्यायच करतो आहेस. मला राहायला एक छोटसं घर दे, सेवेला एक दासी दे. बस. अजून काही नको. आयुष्यभर तुझ्या चांगल्यासाठी मी प्रार्थना करीन.”

पण औरंगजेबाने दाराला मारण्याचा हुकूम दिला. ३० ऑगस्टच्या रात्री गुलाम नजर बेग आणि काही मारेकरी दाराच्या कोठडीत शिरले. त्याच्या मुलाला, सिपाहार शुकोहला दारापासून लांब नेण्यात आले. दाराचे मुंडके धडावेगळे झाले.

औरंगजेबाने एका भाल्याच्या टोकावर ते मुंडके लावून साऱ्या शहरभर फिरवण्याची आज्ञा दिली. ज्याला मारले तो खरंच आपला भाऊ होता कि कुणी तिर्हाईत व्यक्ती, याची खात्री करून घेण्यासाठी औरंगजेबाने दाराचे मुंडके एका तबकात घालून दरबारात आणण्यासंबंधी आदेश दिले.

या भावंडांनी कित्येक वर्षे एकमेकांना पाहिले नव्हते. ज्याला मारले तो दाराच आहे, याची खात्री करून घेण्यासाठी औरंगजेबाने दाराचा ‘किमांश’ मागवून घेतला. समूगढच्या लढाईत तो किमांश औरंगजेबाला मिळाला होता. यातून औरंगजेबाचा प्रचंड धूर्त, सावध आणि संशयी स्वभाव आपल्याला दिसून येतो. औरंगजेबाच्या आज्ञेवरून, कोणत्याही अंतिम विधींची पूर्तता न करता दाराचे ‘मुंडके नसलेले शरीर’ हुमायूनच्या कबरीजवळ दफन करण्यात आले.

दाराला पकडून देणाऱ्या जमीनदाराचे नाव होते ‘जीवन मलिक’. बोलनखिंडीजवळच्या ‘दादार’ गावचा तो जमीनदार. जीवनच्या या विश्वासघाताचे बक्षीस म्हणून औरंगजेबाने जीवन मलिकला ‘बख्तियारखान’ ही पदवी बहाल केली. दाराला या मलिकने पकडून दिल्यामुळे दिल्लीच्या नागरिकांमध्ये प्रचंड राग धुमसत होता.

एके दिवशी आपल्या काही सैनिकांसह मलिक दरबारात निघाला असता अचानक दंगल उसळली. दिल्लीतल्या जनतेने मलिकसोबत असलेल्या सर्व सैनिकांना मारून टाकले. जीवन मलिक कसाबसा बचावला. पण आपल्या कृत्याचे कोणतेही पुरावे अस्तित्वात ठेवायचे नाहीत, याची पुरेपूर काळजी औरंगजेबाने घेतली. एके दिवशी नजरबेग दरबारात आला असता, बक्षिसीचे कारण सांगून त्याने जीवन मलिकसोबत भांडण काढले. ते भांडण एवढे टोकाला गेले, कि नजर बेगने मलिकवर तलवारीचा वार करून संपवले. या गुन्ह्याची शिक्षा म्हणून सैनिकांनी नजर बेगची जागेवरच खांडोळी केली.

अशा रीतीने औरंगजेबाने आपल्याविरुद्ध उलटू शकणाऱ्या सर्व पुराव्यांची परस्परच विल्हेवाट लावली. असा हा धूर्त, पातळयंत्री आणि प्रचंड राजकीयदृष्ट्या सतर्क असलेला औरंगजेब.

पण याच औरंगजेबाच्या, करालकाळाच्या मगरमिठीतून मराठ्यांचा छत्रपती ‘शिवाजी महाराज’ सहीसलामत सुटून स्वराज्यात या परतले होते. तेसुद्धा त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाला भर दरबारात त्याचा अपमान करून.. या एकाच घटनेने मुघलांच्या सर्वात ताकदवान बादशाहला, औरंगजेबाला मरेपर्यंत दख्खनेत वणवण हिंडावे लागले. सैन्याने, संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या आपल्या बलाढ्य भावांची हत्या करून सर्वात सामर्थ्यवान बादशाहच्या मागे मराठ्यांनी मात्र मरीआईचा फेरा लावला होता.

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.