औरंगजेबाचा हल्ला झाला तेव्हा पाटलांनी विठोबाला आपल्या विहिरीत लपवल होतं.

युगानुयुगे कंबरेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा. या सावळ्या सगुण मूर्तीच्या दर्शनाची आस लागून लाखो भाविक दर आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला निघतात.

कित्येक राजवटी आल्या व गेल्या पण पंढरपूरच्या विठुरायाचे महात्म्य कमी झाले नाही.

ज्ञानोबा माउलींनी भागवत पंथाची पताका तेराव्या शतकात रोवला. तेथून संत नामदेव, गोरोबा, चोखोबा, एकनाथ महाराज,तुकोबा अशा अनेक संतांच्या पुण्याईने विठ्ठल भक्तीचे तेज वाढतच राहिले.

पुढे निजामशाही सारख्या परकीय राजवटीतही अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठोबाकडे कोणाची वाकडी नजर कधी पडली नाही.

ते काम केलं आदिलशाहीचा क्रूर सरदार अफजलखानाने.

१६५९ साली हिंदवी स्वराज्यावर खान चालून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोऱ्यातल्या प्रतापगडावर आश्रय घेतला होता.

अजिंक्य असलेल्या या प्रतापगडाला जिंकणे अफझलखानाला अशक्य होते. जावळीच्या घनदाट जंगलात शिरणे शक्य नव्हते.

चढ्या घोड्या निशी शिवबाला उचलून आणतो

असा अहंकारी विडा उचललेल्या अफझलखानाच्या इभ्रतीचा प्रश्न होता. त्याला कोणीतरी सल्ला दिला की

शिवरायांना प्रतापगडावरून बाहेर काढायचे असेल तर इथल्या धार्मिक स्थळावर हल्ला करा.

अफझलखानाने सर्वप्रथम तुळजापुरावर हल्ला केला आणि तिथली मूर्ती भंजन केली. तिथून तो आता पंढरपूरला येणार हे तिथल्या बडव्यांच्या लक्षात आले.

त्यांनी विठुरायाची मूर्ती पंढरपूरातून रातोरात हलवली.

जवळपास दहा पंधरा वर्षे विठोबाची मूर्ती पंढरपूराच्या बाहेर होती. काळात या मूर्तीचा प्रवास देगाव, चिंचोली, गुरसाळे या गावांमध्ये झाला असल्याचं सांगितलं जातं.

याचे नेमके पुरावे सध्या उपलब्ध नाहीत मात्र जेष्ठ इतिहासकार राजवाडे यांच्या मते अखेरीस ही मूर्ती माढ्याला हलवण्यात आली. सर्व संकटे दूर झाल्यावर पांडुरंगाची मूर्ती परत पंढरपूरास आणली गेली.

आजही माढ्याला विठोबाच मंदिर आहे.

काही संशोधक दावा करतात की माढ्याच्या मंदिरातील मूर्ती हीच पांडुरंगाची मूळ मूर्ती आहे. याबद्दल मात्र अनेक प्रश्न चिन्ह आहेत.

पंढरपूरावर अफझल खानापेक्षाही मोठे संकट १६९५ साली औरंगजेबाच्या रूपाने आले.

या काळात पंढरपुरापासून वीस मैल अंतरावर भीमा नदीच्या तीरावर असलेल्या बेगमपुरा (ब्रम्हपुरी) येथे मुघल सम्राट औरंगजेबाची छावणी वसली होती. औरंगजेबाची कीर्ती कट्टर धर्माभिमानी व हिंदूद्वेष्टा अशी होती. भारतभरात अनेक मंदिरांचा त्याने नाश केला होता.

औरंगजेबापासून विठुरायाच्या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी तिथल्या गोपाळ विठ्ठल बडवे यांनी ही मूर्ती देगावच्या पाटलांना दिली.

अशा संकटाची पूर्व कल्पना असल्यामुळेच की काय पण देगावच्या जिवाजी व सूर्याजी पाटलांना छत्रपती राजाराम महाराजांनी अभय पत्र दिलेले होते.

पंढरपूर व देगाव इथे जर मुघलांनी हल्ला केला तर स्वतः मराठा सेनापतीने येथे येऊन संरक्षण करावे असे या पत्रात लिहलेले आहे.

यामुळेच पंढरपूरच्या बडव्यांनी विठुरायाची मूर्ती सूर्याजी पाटलांच्या हवाली केली. त्यांनी ती मूर्ती आपल्या शेतातल्या विहिरीत लपवली.

पुढे १६९९ साली औरंगजेबाने पंढरपूराजवळून आपली छावणी हलवली.

तेव्हा देगावच्या पाटलांनी देवाची मूर्ती पंढरपूरला परत आणली. मात्र पाटलांनी आम्ही तुम्हाला मूर्ती परत करत आहोत मात्र मूर्ती ताब्यात घेण्यापूर्वी तसे कागदावर लिहून द्या असे तिथल्या बडव्यांना सांगितले.

११ ऑक्टोबर१६९९रोजी हे कागदपत्र होऊन त्यावर नारो गोविंद बडवे, गोपाळ विठ्ठल बडवे व इतर पाच बडव्यांनी या कागदावर सह्या केल्या.

हा कागद मिळाल्यावर सूर्याजी पाटलांनी विठोबाची मूर्ती बडव्यांकडे सुपूर्द केली.

यानंतर विठुरायाच्या मूर्तीची पंढरीच्या मंदिरात पुनरप्रतिष्ठापणा करण्यात आली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांची मराठी राजवट सुरू झाली. तेव्हापासून कधी विठोबाची मूर्ती हलवण्याची गरज भासली नाही.

आजही कोरोनाचे संकट जगभरात घोंगवत आहे. पंढरपूरची वारी या महामारीच्या रोगामुळे रद्द करावी लागली आहे. मात्र अफझल खान व औरंगजेबाच्या संकटाला सामोरे गेलेले वारकरी या कोरोनाच्या संकटाला ही असेच धैर्याने सामोरे जातील यात कोणतीही शंका नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.