महाराणी ताराबाई तख्तावर येणार असल्याचं कळताच त्या रात्री औरगंजेब घाबरुन झोपला नाही

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्तानाचा आलमगिर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता.

शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. मुघलांच्याबरोबरच पोर्तुगीज, सिद्दी अशा अनेक शत्रूंचा सामना केला. पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभुराजांना पकडले व हालहाल करून मारले, त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं.

औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला.

राजाराम महाराजांनी शिवरायांनी दूरदृष्टीने खोल दक्षिणेत उभारलेल्या ठाण्याचा म्हणजेच जिंजीचा सहारा घेतला. मुघलांनी तिथेही धडक दिली पण संताजी धनाजी सारख्या शूरवीर सरदारांनी स्वराज्याची मशाल विझू दिली नाही. ३ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला. पण औरंगजेबाचे हे दिवास्वप्न खोटे ठरले. कारण होत्या,

भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजाराम छत्रपतींची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या.

पण त्या आधी एक प्रसंग घडला होता. तो म्हणजे एक विधवा सिंहासन काय सांभाळणार म्हणून औरंगजेबाने ताराराणींना दुर्लक्षित केलं होतं.

दुपारची नमाज आणि खाना उरकून औरंगजेब स्वस्थपणे आपल्या बिछान्यावर बसला होता. लांबून 3 4 घोडेस्वारांच्या टापा जवळ येताना ऐकु आल. आता कुठली खबर आली असेल म्हणून औरंगजेब जरा अस्वस्थच झाला. जवळ येऊन घोडेस्वार पायउतार झाले आणि ते तंबूच्या दरवाज्यात आले. आपल्या दस्ताने अंगावरील धूळ झटकून त्यांनी आतमध्ये येण्याची परवानगी मागितली. औरंगजेबाने लगेच त्यांना आत येण्याची परवानगी दिली. चौघांनी लवून कुर्निसात केला. त्यातला एक उत्साहात म्हणाला,

आला हजरत एक खूश खबर है

असं बोलल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बादशाहची परवानगी न घेताच आपण बोललो. त्याने लगेच माफी मागितली. पण खुशखबर म्हंटल्यावर औरंगजेबाचे कान टवकारले. त्याने डोळ्यानेच निरोप्याला बोलण्याची हमी भरली तसा तो बोलू लागला.

हुजूर संबा का भाई और शिवा का दुसरा बच्चा राजाराम मर गया। मराठो का राजा राजारामने सिंहगड किल्ले पर आखरी सांस ली।

औरंगजेबाचे डोळे आनंदाने लकाकले बातमी देणारा मनुष्य पुढे बोलू लागला,

कोई बिमारी से उसकी इतनी कम उमर मे मौत हो गई। मगर हुजूर मराठोने उनका तख्त खाली नही छोडा। उसकी बेवा बीबी को उन्होने तख्त पे बिठाया है। उसे मराठोने अपनी रियासत का वारीस होने का एलान किया है और अब वह उनके तख्त पर बैठकर पुरी रियासत का कामकाज देखेगी।

औरंगजेब बेहद खूष झाला. नंतरची वाक्य त्याला ऐकणे इतकी महत्त्वाची वाटली नाहीत. तो म्हणाला,

एक बेवा औरत हमसे क्या लढेगी। शुक्र हे परवरदिगार का। आखिर इस लंबे सफरसे चल रही जंग को आखरी पढाव मिला।

असं म्हणत त्याने चार जणांना बक्षीस देऊन नावाजलं. पण त्याचा हा आनंद तेव्हढ्यापुरताच होता. त्या रात्री झोपताना औरंगजेबाच्या मनात विचार आला आणि त्याच्या छातीवर प्रचंड दडपण आलं. त्याने विचार केला की,

आज राजारामाच्या मृत्यूची बातमी ऐकून जो आनंद आपल्याला झालाय तसा ह्यापूर्वी संभाला मारल्यानंतर झाला होता. तेव्हा दख्खन हाशील झालीच, असा आपला समाज होता. तोपर्यंत सिवाच्या ह्या दुसऱ्या मुलाचे नाव आपल्याला ठाऊक सुद्धा नव्हते, कधी चेहरासुद्धा पाहिला नव्हता. या न पाहिलेल्या राजारामाने आपल्याला नऊ वर्ष अक्षरशः मूर्खात काढलं.

आता त्याची बेवा औरत आपल्याला काही करू शकणार नाही म्हणून आपण निर्धास्त आहोत, पण जर ताराबाईने ह्या शैतान मराठ्यांना पुन्हा लढायला तयार केलं तर ?

औरंगजेबाची नेमकी हीच शक्यता खरी ठरली. ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. ताराबाईसाहेबांनी वयाने लहान असलेल्या आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजींचा विशाळगड येथे राज्याभिषेक केला व त्यांच्या नावाने कारभार पाहू लागल्या.

सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मुलगी असल्यामुळे त्यांना राज्यकारभाराबरोबर युद्धकलेमध्ये देखील त्या पारंगत होत्या. शिवशंभूच स्मरण कायम मनात ठेवून त्यांनी मुघलांशी लढा तीव्र केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करून मुघलांना नामोहरम केलं.

मुत्सद्दीपणे कधी बोलणी करून कधी तलवारीच्या बळावर त्या एक एक किल्ले परत जिंकू लागल्या.

एवढ्या प्रयत्नाने अगदी हातातोंडाशी आलेलं मराठ्यांच राज्य आपल्याला हुलकावणी देत आहे, कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसताना एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते आहे हे औरंगजेबाला सहन होत नव्हते. रागाने जळणाऱ्या बादशहाची झोप उडाली होती. त्यातच त्याने अनेक चूका केल्या. जवळपास पंचवीस वर्षे आपली घरे सोडून दक्षिणेत आलेले मुघल सैन्य देखील वैतागले होते. त्यातच माण मध्ये आलेल्या महापुरात मुघल सैनिक, घोडे, खजिना वाहून गेला. खुद्द बादशहा औरंगजेब लंगडा झाला.

१७०७ साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगात्र केलेला आलमगिर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला.

कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।

आजही कोल्हापूर मधील ताराबाई महाराणी साहेबांचा पुतळा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अखंड उभा आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.