मुघलांच्या घरात कंजूष बादशहा जन्मला. त्याने स्वस्तातला ताजमहाल बांधला.

मुघलीया सल्तनत उर्फ मुघल साम्राज्य म्हटल की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते आग्र्याचा ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला, फत्तेहपूर सिक्रीचा पंचमहाल अशा अनेक देखण्या वास्तू, कोहिनूर हिरा, मयूर सिंहासन, मुघलांचा जनानखाना, देशभर पसरलेलं राज्य, त्यांचं महाप्रचंड सैन्य, तिथे होत असलेली महाप्रचंड उधळपट्टी.

मुघल राजे पराक्रमी होते विलासी होते त्याबरोबरच कलाप्रेमी होते. गायक संगीतकार चित्रकार, लेखक, धर्मपंडित यांच्या वर त्यांनी प्रचंड पैसा खर्च केला.

फक्त एकजण सोडून. औरंगजेब

शहाजहानचा हा धाकटा लेक. अतिशय बिलंदर. बाप जेव्हढा कलाप्रेमी तेव्हढा हा कलेबद्दल द्वेष असलेला.

पणजोबाच्या काळापासून म्हणजे अकबराच्या काळापासून जो काही हिंदुमुस्लीम एकतेचा संदेश वगैरे टाईपची भूमिका होती ती याला जरा सुद्धा पटायची नाही. शहाजहानचा थोरला दाराशुकोह म्हणजे अकबराच्या दोन पावले पुढ. तो तर हिंदू धर्माचा अभ्यासक, संस्कृत जाणणारा वगैरे वगैरे.

औरंगजेबाला हे आवडायचं नाही. तो एकदम कट्टर होता. आता आपल राज्य आहे आणि इथ राहणाऱ्या जनतेन आपल्या नियमानुसार राहिलं पाहिजे असा त्याचा आग्रह होता आणि आपले अडाणी वडील भाऊ हे काय ती बोटचेपी भूमिका घेतात अस त्याच स्पष्ट मत होतं. तो त्यांना समजावून सांगायचा पण शहाजहान म्हणजे आपल गाणी, चित्रकला, किंवा ताजमहालच बांधकाम यात बिझी असायचा.

ताजमहाल म्हणजे शहाजहानचं स्वप्न होतं.

औरंगजेबच्या आईच्या म्हणजेच मुमताज महलच्या स्मरणार्थ  शहाजहानने यमुनेच्या तीरावर शुभ्र संगमरवरी ताजमहाल उभा केला. पैसा पाण्यासारखा खर्च झाला. वीस वर्ष काम चाललेलं. पण शहाजहानने हयगय केली नाही.

बायकोच्या प्रेमात आपण जे केलं तस पुढच्या सातशे पिढ्या कोणाला काही करता येऊ नये अस त्यानं ठरवलेलं.

एक दिवस औरंग्याच डोक उठल. त्यान बापाला, सगळ्या भावांना अटक केली. जनतेच्या लाडक्या राजपुत्राला आपल्या सख्ख्या मोठ्या भावाला धिंड काढून भर चौकात ठार मारलं आणि अख्ख्या भारतवर्षाचा आलमगीर बनला.

औरंगजेब क्रूर होता, जुलमी होता, धर्मांध होता. त्याने अकबराने रद्द केलेला हिंदूवरचा जिझिया कर परत सुरु केला. मंदिरे लुटली. पण या बरोबरच तो पराक्रमी देखील होता. 

त्याने अनेक मोहिमा हाती घेतल्या. मुघल सल्तनत प्रचंड पसरवली. शत्रुवर द्यामाया दाखवली नाही. आक्रमकपणे राज्य वाढवलं. त्याच्या काळात मुघल साम्राज्य तिच्या उत्कर्षतेला पोचलं. जवळपास एक तृतीयांश भारत त्याच्या अधिपत्याखाली असेल.

सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य यांच्या नंतर एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा म्हणजे औरंगजेबच असेल.

पण एवढ्या मोठ्या राज्याचा मालक, सुवर्णभूमी भारताचा बादशहा आलमगीर औरंगजेब आपल्या खऱ्या आयुष्यात प्रचंड कंजूष होता. त्याला वावगा एक पैसा खर्च करायला आवडायचं नाही. शहाजहानने भरती केलेले गायक, नर्तक, चित्रकार, शिल्पकार यांना सगळ्यात पहिला हाकलून काढल. मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम बंद पाडले. जनतेकडून गोळा केलेला कर अशा वैयक्तिक छंदापायी खर्च करणे त्याला पटायचं नाही.

याचा अर्थ तो पैसा विकासकामासाठी खर्च करत होता तर अस पण नाही. सगळा पैसा सैन्यावर खर्च करायचा.

रोज इथून शेजारच्या राज्यांवर हल्ले करून आपलं राज्य कस मोठ करायचं एवढच त्याच ध्येय असायचं. पण तिथेही एक एक रुपयाचा हिशोब त्याला लागायचा. त्याच्या या व्यवहारीपणामुळे मुघल सरदारांचाही फुकटचा डामडौल कमी झाला. भ्रष्टाचार कमी झाला. पण त्याच्या संशयी वृत्तीमुळे त्याने भरपूर शत्रू देखील निर्माण केले.

औरंगजेबाच्या धर्मांधतेच्या विरोधात छत्रपती शिवरायांच्या सारखे सार्वभौम राजे उभे राहिले.

औरंगजेबाची धर्मांधता आणि कंजुषपणा एकत्र येऊन तो जास्त विचित्र बनला होता.

स्वतःच्या कपड्यावर देखील अतिशय कमी पैसे खर्च करायचा. दरबाराच्या काळात नाईलाज म्हणून अंगावर जडजवाहीर वागवायचा. अन्यथा त्याला पाहिलं तर कोणाला वाटायचं सुद्धा नाही की हा भारताचा बादशाह आहे. त्याला कुराणाच वेड होतं. रात्रंदिवस कुराणाचा अभ्यास करायचा. त्यात लिहिलं आहे की स्वतःचा खर्च एखादा व्यवसाय करून कमवावा. मग हा गडी कुरणाच्या अनेक हस्तलिखित प्रती करून विकायचा. एवढच नाही

तर हा भारताचा आलमगीर बादशहा स्वतःच्या हाताने टोप्या शिवून त्या विकायचा आणि त्यातून स्वतःचा खर्च चालवायचा.

आपल्या बापाला त्याने आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैदेत ठेवलेलं. शहाजहान रोज कोठडीतल्या खिडकीतून  तासनतास आपल्या लाडक्या ताजमहल कडे पहात बसायचा. औरंगजेबला त्याच हसू यायचं. ताजमहल कडे बघत तीळतीळ तुटून शहाजहान मेला. बहिणींच्या आग्रहाखातर औरंगजेबने त्याच लाडक्या ताजमध्ये दफन केलं.

औरंगजेबला काय ठाऊक की आपल्यावर ही एकदिवस अशीच वेळ येणार आहे.

त्याची बायको दिलरास बानू बेगम ही आपल्या पाचव्या अपत्याला जन्म देऊन अल्लाला प्यारी झाली. पाषाणहृदयी औरंगजेब त्या दिवशी कधी नव्हे ते एकदम मोडून पडला. इराणची राजकन्या असलेल्या दिलरास बानूवर त्याच जीवापाड प्रेम होतं. त्या दिवशी त्याला जाणवल की आपली आई मेल्यावर आपला बाप एवढा इमोशनल का झालेला.

औरंगजेबांन ठरवलं की आपण पण बायकोसाठी ताजमहाल बांधायचा.

त्याकाळात मराठ्यांच्या स्वराज्याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला होता. त्याचा मुक्काम औरंगाबादमध्ये होता. इथेच दुप्पट मोठा ताजमहल बांधायचा त्याने प्लॅन केला.

नाव सुद्धा ठरवलं “बीबी का मकबरा”

या बांधकामासाठी ताजमहालचा आर्किटेक्ट असणाऱ्या उस्ताद अहमद लाहोरीच्या मुलाला अताउल्लाला बोलावलं आणि त्याला डिझाईन बनवायची जबाबदारी दिली. बांधकाम करायचं कॉंट्रॅक्ट हसपत रायला दिल. दोघानाही बायकोच्या मरणाच्या दुःखात शोकाकुल असणारा औरंगजेब म्हणाला,

“खर्चाची चिंता करू नका. पण ताजमहालपेक्षा भारी इमारत आपल्याला बनवायची आहे.”

उस्ताद अताउल्लाह लाहोरी आणि हसपतराय कामाला लागले. त्यांनी दीड दोन वर्षे फक्त डिझाइन बनवायला लावली. खूप मेहनत घेऊन त्यांनी डिझाईन फायनल केलं. जगातलं आश्चर्य ठरू शकेल अशी बिल्डींग त्यांना बांधायची होती. अगदी बारीकसारीक गोष्टीची काळजी त्यांनी घेतलेली. त्यांना ताजमहलचा अनुभव होताच.

अतिउत्साहात अताउल्लाहने दावा केला की ताजमहालला सुद्धा डाग असू शकेल पण बिवी का मकबरा हा अंतिम आणि परिपूर्ण असेल .

औरंगजेबाने सगळ ऐकून घेतल. बारकाईने डिझाईनकडे पाहात म्हणाला,

“खर्च किती येणार?”

एकदम टिपिकल मिडलक्लास माणसाचा प्रश्न मुघल बादशाह विचारेल हे अताउल्लाहच्या स्वप्नात देखील आल नसावं. त्याने सांगितलं की,

“ताजमहाल बांधताना साधारण ३ कोटी रुपये खर्च आलेला म्हणजे आताची महागाई वगैरे पकडली तरी बिबी का मकबरा साठी दहा पंधरा कोटी एवढा खर्च येईल”

हे दहा कोटी म्हणजे आजच्या हिशोबात १००० कोटी असतील. तो आकडा ऐकून बादशाह हसू लागला. तो म्हणाला

“एवढा काय खर्च आपल्याला शक्य नाही. जास्तीतजास्त ३ लाख रुपये देतो. त्यात जेवढ होईल तेवढच बांधा”

अताउल्लाह आणि हसपत राय एकमेकांकडे बघतच राहिले. सातव आश्चर्य बांधायचं अशी मोठी स्वप्ने बघून आलेले आणि इथ बादशाहने सगळाच फुगा फोडला. त्याला काही म्हणता देखील येत नव्हत. मिळेल त्या निधीत बांधकाम सुरु केलं. बायको मेल्यावर ताजमहल बांधायचा जो जोश औरंगजेबवर चढलेला तो मधल्या कालावधित पूर्ण उतरून गेलेला.

औरंगजेबाच्या काळात हा मकबरा बांधून तयार झाला नाही. असं म्हणतात कि त्याच्या पोराने हे बांधकाम पूर्ण केले.

मिळेल त्या पैशात औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा उभा राहिला. नाही नाही म्हणत ३ च्या ऐवजी ७ लाख रुपये खर्च झाले. 

यातून उभी राहिली ती इमारत म्हणजे ताजमहालची स्वस्त प्रतिकृती म्हणता येईल. पण तस बघायला गेल तर ती सुद्धा खूप सुंदर आहे. कोणी काहीही म्हणो पण चेंगट औरंगजेबाने आपल्या बायकोवर थोडा तरी खर्च केला.

खुद्द त्याची कबर सुद्धा येथून काहीच अंतरावर खुलताबाद येथे आहे.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Dada says

    Wrong information as in Marathi ” Banawat Gosht” read history and then write the article 🙄🙄🙄🙄🙄🙄
    No use of historical knowledge 😉😉😉😉😉😉

  2. Ashu says

    मुम्बई अंडरवर्ल्ड च्या आणखी स्टोरी पब्लिश करा।
    खूप सुंदर आहेत तुमची सगळी लेख।

Leave A Reply

Your email address will not be published.