कट्टर धर्मांध औरंगजेब प्रेमात पडल्यानंतर दारू प्यायला निघाला होता…

मुघल पातशाह औरंगजेब याने स्वतःला आलमगीर अर्थात ‘जगज्जेता’ ही उपाधी लावून घेतली होती. इतिहासात औरंगजेबाची ओळख ही क्रूर, कपटी धर्मांध राजा म्हणून आहे आणि इतिहासकारांनी याचे खूप सारे दाखले देखील दिलेले आहेत.

हा धर्मांध राजा त्याच्या ऐन तारुण्यात जेव्हा १८ वर्षांचा राजकुमार होता तेव्हा एका तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता याचा देखील दाखला अनेक समकालीन इतिहासकारानी दिला आहे.

मुघल काळात जनानखाना ही खाजगी बाब असल्याने पडद्याआडच राहायचा. त्यामुळे ह्या संदर्भातील उल्लेख क्वचितच इतिहासकारांनी आपल्या मांडणीत केलेले दिसतात. मुघलांनी अनेक दशके ह्या भारत भूमीवर सत्ता गाजवली, ह्या काळात शेकडो मुली, स्त्रिया ह्या मुघल जनानखान्यात स्वतःच्या नशिबाला दोष देत गेल्या तर कधी ज्जेता राजाने पराजित राजाकडून स्त्रियांची मागणी केली, कधी त्यांचे सौदे झाले तर कधी त्या एकमेकांना नजराणा म्हणून भेट दिल्या गेल्या.

मात्र इतिहास ह्या स्त्रियांच्या दिनचर्येबद्दल, त्यांना दिल्या गेलेल्या वागणुकीबद्दल, अधिकाराबद्दल काहीही प्रकाश टाकत नाही. काही समकालीन इतिहासकारांनी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून राजकुमार औरंगजेब आणि एका गुलाम स्त्रीच्या प्रेम संबंधाबाबत केलेला उल्लेख विश्वसनीय वाटतो.

निकोलाव मनुची याने ह्या घटनेचा उल्लेख ‘Storio-da-Morgo 1653-1708’ अर्थात ‘असे होते मुघल १६५३ – १७०८’ या आत्मचरित्राच्या पहिल्या खंडात केला आहे. याच बरोबर औरंगजेबाचे चरित्रकार हमीदुद्दीन खान निमचन यांनी ‘अहकम-ए-औरंगजेब’ ह्या १६४० साली लिहिलेल्या पुस्तकात व नवाब समसम-उदौला शाह नवाझ खान यांच्या ‘मासिर-अल-उमरा’ यात देखील उल्लेख आहे.

म्हणूनच ह्या संबंधातील ही विस्तारित माहिती आज वाचकांसाठी येथे देत आहे.

गोष्ट आहे १६३१ सालची.

तत्कालीन मुघल पातशाह शहाजहाँ हा स्वतः दख्खनच्या मोहिमेवर होता. ह्या मोहिमेवर असतानाच त्याची प्रिय पत्नी मुमताज महल हिचे प्रसूती दरम्यान बुऱ्हाणपूर येथे निधन झाले. तिच्या कलेवराचा तात्पुरता दफनविधी हा बुऱ्हाणपूर येथेच करण्यात आला व नंतर १६४८ साली आग्रा येथे ताजमहल मध्ये हलवण्यात आला. असे म्हटले जाते की पत्नीच्या वियोगाने व्याकुळ झालेला शहाजहाँ दुःख सागरात बुडाला, तो कुणाला भेटत नसे. काही काळानंतर दुःख विसरून त्याने कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली व शेहजादा औरंगजेब याला दख्खनेचा सुभेदार म्हणून नियुक्त केले, यावेळी औरंगजेब फक्त १४ वर्षांचा होता. त्याने स्वतःचे ठाणे म्हणून किरकी येथून कारभार पाहण्यास सुरुवात केली पुढे किरकीचे नाव औरंगाबाद असे ठेवण्यात आले.

औरंगाबाद बुऱ्हाणपूर पासून २२० किमी दक्षिण-पूर्वेला आहे. औरंगजेबची मावशी सलाह बानो तेव्हा बुऱ्हाणपूरला राहत असे. तिचा निकाह मुघल सेवेतील बुऱ्हाणपूरचा सुभेदार खान-ए-झमान सैफ खान याच्याशी झाला होता. तो तोफखाना विभागाचा प्रमुख होता.

१६३६ साली औरंगजेब दिल्लीहून औरंगाबादला जात होता तर रस्त्यात बुऱ्हाणपूरला मावशीकडे काही दिवस मुक्कामी थांबून पुढे जावं असा त्याचा बेत होता. भाचा असला तरी तो मुघल शेहजादा होता. मावशीने त्याच्या पाहुणचारात ‘आहू खाना’ येथे (शाही बागात) मोठी दावत दिली. औरंगजेब आपलाच एक कुटुंब सदस्य असल्या कारणाने दावत मध्ये सैफ खान अर्थात शेहजादा औरंगजेब याचे काका यांच्या जनानखान्यातील स्त्रियांचा मुक्त वावर होता.

याचवेळी औरंगजेबाची नजर झाडाची फांदी पकडून गाणं गुणगुणत आपल्याच दुनियेत तल्लीन असलेल्या एका मुलीवर पडली.

त्या मुलीचे सौंदर्य पाहून शेहजादा औरंगजेब घायाळ झाला. त्याच्या पायातील त्राण गेले व तो तेथेच मूर्च्छित होऊन खाली पडला. ही बातमी कानावर पडताच शेहजादा औरंगजेब याची मावशी सलाह बानो धावत तिथे पोहचली व त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. प्रहर दोन प्रहरनंतर त्याला शुद्ध आली, मावशीने, ’तुझी तब्येत बरोबर नाही, तुला यापूर्वी असे कधी झाले होते का?’ असे त्याला वारंवार विचारले पण त्याने मात्र आपल्या मावशीला काहीच सांगितले नाही. ह्या सगळ्या घटनेने मात्र त्या सगळ्या दावतचा बेरंग झाला. एक सुतकी कळा सर्वत्र पसरली.

दुसऱ्या दिवशी औरंगजेब याने कालच्या घटने मागील कारण मावशीला सांगितले. हे सगळं ऐकून मावशी चिडीचूप झाली. औरंगजेब मावशीची शांतता पाहून औरंगजेब नाराज झाला. मावशीने दिलेल्या माहीती प्रमाणे त्या मुलीचे नाव हिराबाई जैनाबादी होते, तिचे आडनाव हे तिच्या मूळ गावाच्या नावानुसार होते. पुढे मावशीने शेहजादा औरंगजेबाला सांगितले की तिचा नवरा (शेहजाद्याचे काका) हा जनानखान्या बाबत कठोर असून तो याबाबतीत पातशाहची देखील पर्वा करत नाही.

शेहजादा आपल्या जनानखान्यातील एका मुलीवर भाळला असून त्याला ती हवी आहे अशी बातमी जरी त्याला कळाली तर तो रागाने आनावर होईल व त्या पोरीला व त्यानंतर मला संपवून टाकेल असं मावशीने शेहजाद्याला सांगितले. यावर औरंगजेब म्हणाला की मी दुसऱ्या मार्गाने त्यांची परवानगी घेण्याचा प्रयत्न करेल.

दख्खनच्या मोहिमेवर औरंगजेब सोबत त्याचा विश्वासू मित्र व दख्खनचा दिवाण मुर्शिद कुली खान होता. औरंगजेबाने त्याला विश्वासात घेऊन त्याला ह्या प्रकरणात सल्ला विचारला. मुर्शिदने, ’मी स्वतः आपल्या आज्ञेने आपल्या काकांना संपून टाकतो व, याची सजा म्हणून मला नंतर मृत्यदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा जरी मिळाली तर मी माझ्या मालकाच्या आनंदासाठी हसत-हसत ती शिक्षा स्वीकारेल.’

पण असे केल्याने मावशी विधवा होईल म्हणून शेहजादा औरंगजेबने मुर्शिद खानाच्या ह्या प्रस्तावास नकार दिला व मुर्शिदला सरळमार्गाने जाऊन सैफ खानाकडे त्या मुलीला शेहजाद्यासाठी मुक्त करण्याची विनंती कर असा आदेश दिला. मुर्शिदने असेच केले.

सैफ खानाने शेहजाद्याची विनंती ऐकून घेतली व उत्तर आपल्या पत्नी मार्फत देतो असे सांगितले.

सैफ खानाने शेहजादा औरंगजेब याची ही इच्छा आपल्या बायकोस सांगितली आणि यास माझा होकार आहे असे देखील सांगितले; मात्र ही शेहजाद्याला दिलेली भेट नसून मला या बदल्यात शेहजाद्याच्या जनानखान्यातील एक स्त्री हवी आहे. सैफ खानाने आपली पत्नी सलाह बानो जवळ स्पष्ट पणे नमूद केले की मला शेहजाद्याची पत्नीच हवी असे नाही तर उपपत्नी देखील चालेल, खास करून छत्तरबाई मिळाली तर उत्तमच.

सलाह बानो दोघांमधील समनव्यक होण्यास तयार नव्हती, पण, ‘तुला जीव प्यारा असेल तर मी सांगतो तसे कर’ अशी धमकी सैफ खानाने दिली. सलाह बानो ताबडतोब पालखी मध्ये बसली व शेहजाद्याकडे जाऊन तिने सैफ खानाचा निरोप दिला. काकांचा होकार ऐकून औरंगजेब हर्षोउल्हासीत झाला. त्याने ताबडतोब छत्तरबाईला काकांकडे रवाना केले, शेहजाद्याने आपली मागणी पूर्ण केली हे पाहून काकाने देखील हिराबाई जैनाबादीला लगोलग औरंगजेबाकडे पाठवले.

समकालीन नोंदी मध्ये हे नमूद केलेले आहे की औरंगजेब आपलं प्रेम असलेल्या हिराबाई सोबत सुखाने राहत होता.

तिच्या सानिध्यात त्याने आपल्या काही धार्मिक रीती-रिवाजांना देखील फाटा दिला होता. एकदा हिराबाईने त्याला दारूचा प्याला दिला आणि तिच्यावर त्याचे असलेले प्रेम ते दारू प्राशन करून सिद्ध करण्यास सांगितले. त्याने तो प्याला आपल्या ओठांपर्यंत नेला व प्राशन करणार इतक्यात हिराबाईने तो प्याला हिसकावला व म्हणाली की, ‘मी फक्त तुमची परीक्षा घेत होते, तुम्हाला दारू पिण्याची काहीच गरज नाही’.

दुसऱ्या एका समकालीन नोंदीत औरंगजेब हिराबाईच्या संगतीत दारू प्राशन करत होता असा दाखला दिला आहे. हिराबाई सोबत तो संगीत व नृत्याचा आनंद घेऊ लागला होता. औरंगजेब हिराबाईच्या प्रेमात आकंठ बुडाला होता, या दरम्यान दैनंदिन कामात त्याच्याकडून हलगर्जी होऊ लागली, प्रशासकीय कामाकडे दुर्लक्ष होऊ लागले.

समकालीन इतिहासकारांनी औरंगजेब व त्याच्या भावंडांचे आपापसातील संबंध अत्यंत रोषपूर्ण होते असे दाखले दिले आहेत. दारा शुकोव्ह व औरंगजेब मधून तर विस्तव जात नसे. आपल्या हेरांकडून जेव्हा दाराला औरंगजेबाच्या प्रेम प्रकरणाची, काकांबरोबर जनानखान्यातील स्त्रियांची अदलाबदली बद्दल माहिती मिळाली तेव्हा तो तडक आपल्या वडिलांकडे अर्थात पातशाह शहाजहाँकडे गेला व तक्रारीच्या सुरात म्हणाला की,

‘बघा ह्या दांभिक औरंगजेबाची धार्मिकता आणि त्याग… स्वतःच्या स्वार्थासाठी तो आपल्या मावशीच्या जनानखान्यापर्यंन्त पोहचला आहे.’

इकडे हिराबाई आजारी पडली आणि दिवसेंदिवस तिची तब्येत ढासळू लागली. औरंगजेबाने हकीम लोकांची फौज उभी केली पण कुणाचीही मात्रा लागू पडेना. फकीर, मौलवी हिराबाईच्या सलामतीसाठी दुआ मागू लागले. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. ह्या दुर्धर आजारपणात हिराबाईचा मृत्यू झाला.

हिराबाई एका थंड हवेच्या झुळूक सारखी औरंगजेबाच्या आयुष्यात आली व एका वादळाप्रमाणे गेली. वादळ गेल्यावर जसा तो परिसर उजाड आणि बोडखा बनतो अगदी तशीच औरंगजेबाची अवस्था झाली होती.

हिराबाईच्या अकाली निधनाने औरंगजेबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. ह्याच दुःख सागरात शेहजादा औरंगजेब शिकारीसाठी बाहेर पडला. अकील खान हा शेहजाद्याच्या खास मर्जीतील माणूस, तो कवी होता. त्याने शेहजाद्याला विचारले की दुःखात असताना तू शिकारीसाठी कसा बाहेर पडू शकतोस? त्यावर औरंगजेब उत्तरला –

घरातील चार भिंतीत विलाप केल्याने अंतःकरणातील दुःख शांत होऊ शकत नाही,
एकटा असल्यावर माणूस मन मोकळं रडू शकतो!

त्यावर अकील खान उत्तरला-

प्रेम किती साळसूद आणि सोपे दिसतं पण ते खूप कठीण असतं
विरह हे प्रेमाचेच नाव आहे, एकत्र येणे हा त्या प्रेमाचा अंत आहे

अकील खानाचे वरील उद्गार ऐकून औरंगजेबाला अश्रू आवरता आले नाहीत. औरंगजेबाने त्या क्षणाला शपथ घेतली, यापुढे तो दारूला शिवणार नाही, संगीत ऐकणार नाही. या सोबतच औरंगजेबाने संसारिक सुखा मध्ये रमताना राज्य करण्याची जोखीम कधीही न करण्याची देखील शपथ घेतली. [हिराबाई होती तोवर औरंगजेब दारूही प्यायला(?)]

असे सांगितले जाते की हिराबाई आपल्या गान कौशल्याने इंद्रियांना मोहित करत असे. नखरे तर तिला अंगभूत देणगीच होती. ती औरंगजेबाच्या जीवनात वसंत ऋतू बनून आली पण ग्रीष्माच्या झळा सोसण्यासाठी औरंगजेबाला मागे ठेवून अंतर्धान पावली.

इतिहासात औरंगजेब भावुक झाला अशी नोंद असलेली हिच एवढी एकमेव घटना आहे. हिच त्याची हळवी बाजू. पण यानंतर ह्याच औरंगजेबाने पातशाह बनण्यासाठी स्वतःच्या बापाला कैद केले, भावांची निर्घृण हत्या केली, आपल्या पुतण्यांना ठार केले, पुतणींचे लग्न स्वतःच्या मुलांशी लावून दिले, स्वतःच्या मुलांना कैदेत ठेवलं, मंदिरं पाडली, जमेल ती क्रौर्याची परिसीमा गाठली.

आपली प्रियसी हिराबाईच्या अकाली मृत्यू बरोबर कदाचित औरंगजेबाचे काळीज देखील मेलं असावं… औरंगजेबाचे खरे प्रेम – हिराबाई जैनाबादी

  • राहुल सुधाकर कराळे

संदर्भ: ‘Storio-da-Morgo 1653-1708 – निकोलाव मनुची
अहकम-ए-औरंगजेब – हमीदुद्दीन खान निमचन
मासिर-अल-उमरा – नवाब समसम-उदौला शाह नवाझ खान
India under Aurangjeb – Jadunath Sarkar

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Ravi Thakre says

    False story to glorify the most brutal and heartless person of his time.

  2. सत्येंद्र तेलतुंबडे says

    हिराबाई आजाराने मेली नसून वेरुळच्या पुरोहितांनी तिची हत्या केली.तेव्हापासून तो हिंदू च्या विरोधात गेला.इतिहास पूर्ण आणि सत्य सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.