फक्त आत्ताचं सरकारच नाही, तर औरंगजेबाने देखील फटाक्यांवर बंदी घातली होती

आपल्याकडे कोणताही आनंद लय मोठ्या जल्लोषाने साजरा करण्याची पद्धत आहे. या जल्लोषात ढोल, डीजे, रोषणाई अशा गोष्टींचा समावेश नसला तर हा जल्लोष कसला? असं म्हटल्या जातं. त्यातही फटाक्यांचं मुख्य आकर्षण. म्हणजे बघा ना, दिवाळी हा सण तर फटाक्यांचा हक्काचा सण असतोच मात्र आता लग्न समारंभ, एखादी मॅच जिंकणं, कुणाचं तरी स्वागत करणं अशा गोष्टींपासून वाढदिवसासारख्या छोट्या कार्यक्रमालाही फटाके वाजणारच.

आधी फक्त दिवाळीला फटाके घरात यायचे मात्र आता वर्षभर फटाके लागता म्हणजे लागतातच. मात्र असा जल्लोष करताना किती प्रदूषण यामुळे होतंय? याचा विसर सगळ्यांनाच पडतो. अशात जेव्हा सामान्य नागरिक जबाबदारीने वागत नाहीत तेव्हा पुढाकार घ्यावा लागतो तो शासनाला. मग जबरदस्ती एखादा नियम आणावा लागतो कारण ‘कायदा’ हेच एक साधन असतं सामान्य नागरिकांना कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करण्यापासून थांबवण्याचं.

मुख्यतः दिवाळीच्या आणि लग्न समारंभाच्या सिजनमध्ये सरकार फटाक्यांवर बॅन लावताना आपण बघतो. जेव्हा केव्हा असा बॅन लागतो तेव्हा अनेक जण शासनाच्या नावाने भरभरून बोटं मोडतात. पण भिडूंनो, हा फटाके बंदीचा कायदा काय आत्ताचा नाहीये, त्यालाही ३५० वर्षांचा इतिहास आहे. खुद्द औरंगजेबाने देखील फटाक्यांना त्रासून त्यांना बॅन करण्याचे आदेश दिले होते.

राजस्थानमधील बिकानेरच्या स्टेट अर्काइव्हमध्ये १६६७ साली काढलेला एक आदेश आजही जशाच्या तसा आहे. १६०० चा कालखंड म्हणजे मुघल बादशाह औरंजेबाचा आणि त्यावेळच्या या आदेश पत्रात फटाक्यांचा उल्लेख आहे.

८ एप्रिल १६६७ अशी तारीख या आदेश पत्रावर आहे. यामध्ये दिलेल्या आदेशात असं लिहिलंय की, बादशाहच्या प्रांतातील सर्व अधिकाऱ्यांना लिहून कळवा आतापासून फटाक्यांवर बंदी घालण्यात येत आहे, तेव्हा शहरात कुठेही आतषबाजी होऊ नये. तशी घोषणाही नगरांमध्ये करा. आतापासून कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी बारूदापासून बनवलेले गोळे फोडण्यास सक्त मनाई आहे.

या आदेशात कोणत्याही सणाचा उल्लेख नाही. शिवाय कोणत्याही कालमर्यादेचा उल्लेख नाहीये. मात्र इतकं तर स्पष्ट समजतं की या आदेशानुसार फटाक्यांवर दीर्घकाळ बंदी घालण्यात आली होती.

111
औरंजेबाच्या फटाके बंदीचं बिकानेरच्या स्टेट अर्काइव्हमधील आदेश पत्र

याचा अजून एक किस्सा असा की जेव्हा राजस्थानमधील या औरंगजेबाच्या आदेश पत्राबद्दल सर्वांना कळालं तेव्हा अनेकांनी बिकानेरच्या स्टेट अर्काइव्हला भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना या पत्राची सत्यता विचारली. तेव्हा इतिहास तज्ज्ञांच्या पुष्टीनंतर जेव्हा खात्री पटली की हे पत्र खरं आहे, तेव्हा एकच कल्ला झाला. औरंगजेबाचं पुनरागमन अशा नावाने सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु झाला.

यात औरंजेबाचं पुनरागमन हे सरकारला उद्देशून म्हणण्यात आलं होतं. कारण तो काळ दिवाळीचा होता आणि राजस्थान सरकारने फटाक्यांवर बंदीचा नियम लागू केला होता. म्हणून औरंगजेबाने दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली आणि आता आपल्याकडे न्यायाधीश आणि राजकारणी असं करताय, असं सर्व म्हणत होते.

त्यातच अजून एक ऐतिहासिक बाब समोर आली. स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच जवळपास १९०८ मध्ये, तत्कालीन बिकानेर राज्यात, गनपावडर, फटाके यांच्या उपयोगाला घेऊन ‘अचानक स्फोट करणाऱ्या पदार्थांचा ऍक्ट’ बनवण्यात आला होता. या कायद्यात कुणालाही इजा पोहोचवण्यासाठी गनपावडरचा  उपयोग केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली होती. फटाके आणि आतषबाजीच्या  वापराला रेग्युलेट करण्यात आलं होतं, असं समोर आलं. 

मग काय, असे इतिहासाचे दोन्ही मुद्दे आणि तेव्हाचा सरकारचा निर्णय यांना एकत्र करत राजस्थानमध्ये फटाक्यांच्या वापराला आधीपासून बंदी असून आताही इतिहासाची पुनरावृत्ती केली जातेय. सरकारला सामान्यांचा आनंद बघवतंच नाही, असं बोललं जात होतं. अशाप्रकारे औरंगजेबाने तेव्हा राजस्थानात राडा घातला होता.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.