जेव्हा नाटकातला औरंगजेब चुकून ‘गेट आउट’ म्हणाला

मराठी रंगभूमी ही दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेली रंगभूमी. नाटक पाहणं हा मराठी नाट्यरसिकांसाठी एक सोहळाच असतो. आत्ता जरी इतकं होत नसलं तरी पूर्वीच्या काळी ‘गंधर्व नाटक कंपनी’ सारख्या मोठ्या कंपनी नाटक पाहायला येणाऱ्या रसिकांवर अत्तरांचे फवारे शिंपडायचे. बालगंधर्वांसारखे दिग्गज नटश्रेष्ठ डोक्यावर कर्जाचा डोंगर असला तरीही नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांचं साग्रसंगीत स्वागत करायचे. रसिकांच्या सेवेत कोणताही खंड ते पडू देत नव्हते.
नाटक सुरू झाल्यावर ते इतकं रंगायचं की रात्री सुरू झालेला प्रयोग थेट पहाटे संपायचा. कलाकाराच्या अभिनयाची किमया आणि रसिकांनी दिलेली दाद ही आगळीवेगळी जुगलबंदी रंगायची.
आजही मराठी नाटकांमधील कलाकार रंगदेवतेचा मान आणि रंगभूमीचा आदर ठेवून भूमिका करतात.
मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाटक सादर होत असताना झालेली एक चूक त्यांना नट म्हणून किती अस्वस्थ करून गेली , हे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेतून पाहायला मिळतं.
प्रभाकर पणशीकर यांना नाट्यवर्तुळात सर्व ‘पंत’ म्हणत असत.
पंतांची विशेष ओळख म्हणजे ‘तो मी नव्हेच’. आचार्य अत्रे लिखित या नाटकात पंतांनी पाच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाकर पणशीकर हे नाव लोकप्रिय झालं.
आजही ‘तो मी नव्हेच’ नाटकात पणशीकरांनी साकारलेली लखोबा लोखंडे ही भूमिका नाट्यरसिक विसरू शकत नाहीत.
एका उच्चशिक्षित घरात पणशीकरांचा जन्म झाला. पणशीकरांचा जन्म गिरगावचा. गिरगावात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पणशीकर लहानपणापासून भाग घ्यायचे. इथेच त्यांच्या अभिनयावर खऱ्या अर्थाने संस्कार घडले.
१९५५ साली वयाच्या २५ व्या वर्षी ‘राणीचा बाग’ या नाटकाद्वारे पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. या तरुण वयात मो. ग. रांगणेकर या दिग्गज नाटककाराच्या सहवासात पणशीकर आले. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन संस्थेतर्फे पणशीकरांनी ‘कुलवधू’, ‘खडाष्टक’, ‘भुमिकन्या सीता’ यांसारख्या नाटकांमध्ये काम केले.
भिडूंनो, इतक्या कमी वयात रंगभूमीवर इतकी मोठी मजल मारल्यामुळे पणशीकरांचा अभिनयाचा पाया पक्का झाला.
आजही तुम्ही यू ट्यूब वर पणशीकरांचं कोणतंही नाटक बघाल तर त्यांची भाषा विलक्षण असते. ज्या स्पष्टपणे पणशीकर मराठी बोलतात त्याच अस्खलितपणे औरंगजेबाच्या उर्दू मिश्रित हिंदी भाषेवर सुद्धा त्यांची पकड असते.
एकूणच भाषा कोणतीही असो, ती कशी बोलावी हे प्रत्येक कलाकाराने पणशीकरांकडून शिकावं.
पणशीकर मराठी रंगभूमीवरचे प्रतिष्ठित नट होते. अनेक दर्जेदार नाटकं पणशीकरांच्या अभिनयाने रंगभूमीवर गाजली. पणशीकरांची नाट्यकारकीर्द ऐन भरात होती त्यावेळचा किस्सा…
‘अश्रूंची झाली फुले’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ ही पणशीकरांची नाटकं त्यावेळी रंगभूमीवर प्रचंड गाजत होती.
एक नाटक संपूर्ण शहरी भाषेचं तर दुसरं नाटक ऐतिहासिक. चुकून जरी दोन्ही नाटकांमध्ये भाषेची गडबड झाली तर संपूर्ण प्रयोग फसणार होता.
एकदा नागपूरला असताना ‘अश्रूंची झाली फुले’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ अशा दोन्ही नाटकांचे प्रयोग एकाच दिवशी एकाच नाट्यगृहात होते. दोन्ही नाटकांमध्ये पणशीकरांच्या महत्वपूर्ण भूमिका.
सकाळी ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकाचा प्रयोग झाला.
काहीच तासांमध्ये पणशीकर ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाच्या प्रयोगासाठी तयारी करत होते. तो दिवस पणशीकरांसाठी धावपळीचा दिवस होता. त्यांचं मन काहीसं चलबिचल झालं होतं.‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा प्रयोग सुरू झाला.
आणि एका संवादात औरंगजेबाच्या भूमिकेत पणशीकर ‘चले जाव’ च्या ऐवजी ‘गेट आउट’ असं चवताळून ओरडले.
उपस्थित प्रेक्षकांना पणशीकरांकडून झालेली ही चूक लक्षात आली. त्यांनी २ मिनिटं संपूर्ण नाट्यगृह डोक्यावर घेतलं. काहीच तासांपूर्वी पणशीकरांनी ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकाचा प्रयोग केल्यामुळे दोन्ही नाटकांची सरमिसळ झाली.
त्यामुळे चलबिचल अवस्थेत पणशीकर अनावधानाने हा शब्द बोलुन गेले. प्रयोग पुढे सुरू राहिला.
परंतु झालेली ही चूक एक कलाकार म्हणून पणशीकरांना खटकली. प्रयोग झाल्यावर ते व्यथित झाले. त्या रात्री ते जेवले नाहीत. पुढे सहकाऱ्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी दोन घास खाल्ले.
‘तो दिवस आयुष्यातला एक कटु दिवस होता’,
असं पणशीकर एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.
पणशीकरांसारख्या नाट्यकर्मींमुळे आज मराठी रंगभूमी स्वतःची विशेष ओळख जपून आहे.
हे ही वाच भिडू.
खरच छान लेख,आवडला