औरंगजेबाने पुण्याचं नाव बदलून ‘मुहियाबाद’ असं केलं होतं

नामांतरच्या सगळ्या वादाचा मूळ आहे मुघल बादशाह औरंगजेब.

अत्यंत पाताळयंत्री माणूस. त्याच्या पूर्वीचे मुघल बादशाह काही आदर्श वगैरे नव्हते पण या औरंगजेबाने सत्तेत आल्यावर एवढे घोळ घातले की आजकाल अकबर सुद्धा अनेकांना संत वगैरे वाटतो. त्याने सख्ख्या भावांना ठार केले, वडिलांना तुरुंगात टाकले,  काशीची वगैरे देवळे पाडली, गावे बेचिराख केली, जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणले. सत्तांध झालेला हा आलमगीर विरोधकांना संपवण्यासाठी कोणत्याही थराला जात होता.

त्याने घातलेला औरंगाबादच्या नावाचा घोळ आजही राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. गंमत म्हणजे याच औरंगजेबाने पुण्याचं नाव देखील बदलून ठेवलं होतं.

तस बघायला गेलं तर पुणे हे खूप जुनं गाव. पुरातन काळातील लेणी, उत्तखननात सापडलेली नाणी व इतर वस्तू यावरून या गावाचं अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे याचा पुरावा सापडतो. सातव्या शतकातील सापडलेल्या ताम्रपटात या भागाचा उल्लेख पुण्यविषय असा होतो.

पुढे या पुण्यविषयचे नामांतर पुनक व पुढे पुनवडी असे झाले.

एकेकाळी या परिसरात कुंभारली व कासारली या दोन कारागिरांच्या वस्ती होत्या. पुढे बाराव्या शतकातील मुसलमान राजवटीने या वस्त्यां मोडून मोठं गाव वसवलं आणि कसबा पुणे हे नाव दिले. याच काळात अरबस्तानातून आलेल्या पाच मुस्लिम धर्मोपदेशकांनी मुठा नदीच्या काठी असलेले पुणेश्वर व नारायणेश्वर ही मंदिरे भ्रष्ट करून तिथे दर्गे बनवले. या दर्ग्यांना आज थोरला शेखसल्ला व धाकटा शेख सल्ला असे ओळखलं जाते.

सतराव्या शतकात शहाजी महाराजांना पुण्याची जहागीर मिळाली आणि इथला खऱ्या अर्थाने विकास सुरु झाला.

त्यांनी सोमवार पेठ रविवार पेठ यांची स्थापना केली. गावाचं शहर बनण्यास इथूनच सुरवात झाली. पुण्याच्या जवळच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. पुण्याच्या बारा मावळातच त्यांना स्वराज्याची प्रेरणा आणि ती उभारण्यासाठी सवंगडी मिळाले.

शहाजी महाराज दक्षिणेत गेल्यावर आदिलशाही सरदार मुरार जगदेवने पुण्याचा विध्वंस केला, गाढवाचे नांगर फिरवले. त्याच्या दहशतीमुळे गाव निर्मनुष्य झाले.

पण राजमाता जिजाऊंनी उध्वस्त झालेलं पुणे पुन्हा वसवलं. कसबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. बाळ शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला. पुणे सोडून गेलेले गावकरी पुन्हा परतले. इथेच बांधलेल्या लाल महालात राहून जहागिरीचा कारभार त्या पाहू लागल्या. शिवरायांना कारभाराचे धडे शिकवले.

शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यावर त्यांनी आपली राजधानी राजगडावर हलवली. या स्वराज्यावर चालून आलेला औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान पुण्यात उतरला होता. त्याने आपला मुक्काम शिवरायांच्या लाल महालातच ठोकला होता. पुण्यात जागोजागी चौक्या उभारल्या. मुघलांच्या भल्या मोठ्या छावणीचे स्वरूप पुणे शहराला आले.

मात्र तरीही अचानक हल्ला करून महाराजांनी त्याची बोटे कापली. या हल्ल्यानंतर शाहिस्तेखान पुणेच काय तर महाराष्ट्र सोडून पळाला. पुण्याच्या आसपास असलेले सिंहगड, पुरंदर, तोरणा असे अजस्त्र किल्ले या शहराचं रक्षण करत होते.

पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतर मराठ्यांना हरवून दक्षिण भारत जिंकायचे म्हणून औरंगजेब बादशाह स्वतः महाराष्ट्रात आला. त्याने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले, त्यांची हत्या घडवून आणली. मात्र त्यानंतर छ. राजाराम महाराज व नंतर महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

या धामधुमीच्या काळात पुण्याकडे लक्ष देणे मराठ्यांना शक्य नव्हते. याचाच फायदा घेत औरंगजेबाने पुण्यावर वर्चस्व निर्माण केले.

साधारण १७०३ साली तो पुण्यात मुक्कामास आला. त्याला हे शहर फार आवडले. इथून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष ठेवता येणे शक्य होते. त्याची सेना मराठ्यांचे गडकिल्ले जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत  होती. वर्षोनुवर्षे वेढा घालून किल्ले हातात येत नव्हते आणि एवढं करून जिंकलेले किल्ले काही दिवसात मराठे पुन्हा घेत होते.

संपूर्ण भारताचा सम्राट असलेला औरंगजेब पुण्याच्या या मुक्कामाच्या काळात घाईला आला होता. त्याला व त्याच्या सेनेला पुन्हा आग्र्याला परत जायचे होते पण आता मराठ्यांना न संपवता परत जाणे म्हणजे मोठी अपमानास्पद गोष्ट होती.

पुणे मुक्कामी राहिल्यावर औरंगजेबाची जुनी खोड उफाळून आली. गावाचे नाव बदलणे. मराठ्यांवर विजय न मिळवता येत असल्याची निराशा आणि वैफल्य त्याने लपवण्यासाठी त्याने छत्रपतींच्या या शहराचं नाव बदलायचं ठरवलं.

याच काळात औरंगजेबाचा एक लाडका नातू मूही- उल- मिलत पुण्यातच वारला. मृत्यूच्या वेळी तो दहा वर्षाचा होता. औरंगजेबाच्या दहाव्या मुलाचा कामबक्ष याचा तो मुलगा. या मूही उल मिलतचं स्मरण राहावं म्हणून त्याने पुण्यात एक व्यापारी पेठ वसवली. आपल्या नाचगाण्याच्या शौक पुऱ्या करण्यासाठी मुघलांनी या पेठेत कोठे उभा केले. 

नातवाच्या नावाची पेठ वसवून बादशाह थांबला नाही तर त्याने पुण्याचे नाव देखील  बदलून मुहियाबाद असे केले. 

याचा पुरावा म्हणजे औरंगजेबाचा दरबारी इतिहास असलेला ‘मआ-सिर-अलमगिरी’ नावाचा ग्रंथ. या ग्रंथात उल्लेख आहे की,

“हिजरी सण १११४ मध्ये कोंडाणा किल्ला काबीज केल्यानंतर एक वर्ष काळ मुहियाबाद- पुणे येथे घालविण्याचा औरंगजेबाने निश्चय केला.”

औरंगजेब फार काळ पुण्यात टिकला नाही. काही काळाने तो पुन्हा अहमदनगर औरंगाबादकडे निघून गेला. पुण्याच्या या छोट्याशा वास्तव्यात त्याने बदलले नाव मात्र पुणेकरांनी फार काळ टिकू दिले नाही. वापरात नसल्यामुळे मुहियाबाद हे नाव मागेच पडले.

पुढे जवळपास सव्वाशे वर्षांनी बाजीराव पेशव्यानी सासवड वरून पेशवाईची गादी पुण्याला आणली. येथे शनिवार वाडा बांधला. त्याच्याच काळात मुहियाबाद पेठेचे नाव बदलून बुधवार पेठ असे करण्यात आले. औरंगजेबाच्या काळात मुघलांनी बदनाम केलेली ही पेठ आजही आपल्या वेश्याव्यवसायासाठी ओळखली जाते. धाकट्या शेख सल्याच्या दर्ग्याजवळ औरंगजेबाच्या नातवाची कबर अजूनही पाहायला मिळते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.