औरंगजेबाने जेव्हा शेतीवर कर लावला तेव्हा जाट समाजाने अकबराची कबर फोडली होती… 

साधारण १६६० चा तो काळ होता. 

त्या काळात औरंगजेबाकडे नुकतीच दिल्लीची गादी आली होती.  मुघल सल्तन संपूर्ण खंडात प्रस्थापित करण्यासाठी तो झटत होता.  राज्याची घडी तो लावत होता. याच काळात मुघल सम्राज्याची आर्थिक घडी बसवण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. राज्याच्या खजिन्यात म्हणावी अशी रक्कम नव्हती याची जुळणी कशी करायची याचा विचार करत असताना औरंगजेबाने राज्यात वेगवेगळे कर लावण्यास सुरवात केली. 

अशातच एक कर होता तो शेतीचा. शेतीवरचा कर वसुल करण्यास सुरवात तर करण्यात आलीच होती पण खूप मोठ्या प्रमाणात औरंगजेबाने हा कर लावण्यास सुरवात केली. 

याचा सर्वात प्रथम विरोध झाला तो मथुरेच्या जवळ असणाऱ्या गोकला नावाच्या जमिनदारापासून. गोकला हा जाट होता. त्याने त्यांच्या समर्थकांसह शेतीच्या या कराला विरोध केला. 

औरंगजेबासाठी ही घटना म्हणजे त्याच्या राज्याच्या विरोधातलं बंड होतं.

गोकला या जमिनदाराला त्याची जागा दाखवण्यासाठी मुघल सैनिकांची एक तुकडी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने पाठवली. घमासान युद्ध झाले आणि सन १६६९ साली गोकला आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. 

गोकला व त्याच्या सहकाऱ्यांना आग्रा येथे आणण्यात आले.  औरंगजेबाने त्यांना मुस्लीम होण्याची ऑफर दिल्ली.  गोकला व त्याच्या साथीदारांनी ही ऑफर नाकारली तेव्हा सर्वांना मुख्य चौकात अत्यंत वाईट पद्धतीने कंठस्थान घालण्यात आलं.  

या घटनेनंतर औरंगजेबाचा दरारा निर्माण होईल व कोणताही जाट पुन्हा मुघलांच्या वाटेला जाण्याची हिंम्मत करणार नाही असा औरंगजेबाचा अंदाज होता.

पण औरंगजेब चुकला, या घटनेनंतर जाट समुदायात द्वेषाची भावना निर्माण झाली. 

बृज क्षेत्रातील जाट समाजाने गोकलांचे वंशज राजाराम सिनसिनवार यांना आपलं सरदार घोषीत केलं व त्यांच्या नेतृत्वाखाली मार्च १६८८ साली आग्राच्या शेजारी असणाऱ्या सिंकदरामधील बादशहा अकबरच्या मकबऱ्यावर चाल केली. एका मुघल बादशहाच्या मकबऱ्यावर चाल करणं हे सर्वात मोठ्ठं आव्हान होतं. 

इतिहासकार निकोलो नमुची यांनी या घटनेबाबत लिहलं आहे की, 

जाटांनी मुघलांची शान आणि शक्तीचे प्रतिक असणाऱ्या मकबऱ्यावरील पितळेचा दरवाजा तोडला. मकबऱ्यावर असणारे सोने आणि रत्नांची नासधुस केली. शक्य तितक्या गोष्टी जाट आपल्यासोबत घेवून गेले. ज्या गोष्टी घेवून जाता आल्या नाहीत त्या त्यांनी जाळल्या. 

यामध्ये बादशहा अकबरच्या कबरमधून अवशेष काढून त्याच्यावर अग्नीसंस्कार केले गेले, अस निकोला मनुची लिहतो.

ही गोष्ट सर्वात महत्वाची होती कारण मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी गोकला व त्याच्या सहकार्यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचा बदला घेण्यासाठी सम्राट अकबराचे अवशेष काढून त्यावर हिंदू धर्माप्रमाणे अग्नि संस्कार केल्याचा हा दावा आहे. 

यानंतर राजाराम सिनसिनवार मुघलांच्या सोबत झालेल्या एका युद्धात मारले गेले. पुढे जावून राजाराम यांचे वंशज बदन सिंह यांना जयपुरचे राजे सवाई जयसिंह यांनी बृजराज चा किताब दिला. याच बदनसिंहानी दत्तक घेतलेल्या सूरजमल सिंह यांनी १७३२ भरतपूर संस्थानची स्थापना केली. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.