औरंगजेबाचं ‘मराठ्यांची कत्तल करा’ हे फर्मान डावलून त्याच्या मुलाने मराठ्यांना मदत केलेली

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा विषय सगळ्या लहान थोरांपासून माहीत असतो. कारण याचे धडेच आपल्याला शाळेच्या इतिहासात मिळालेले आहेत. पण त्यानंतर काही गोष्टी घडल्या त्यापासून इतिहासप्रेमी लोक अनभिज्ञ असतात.

अशीच एक गोष्ट म्हणजे औरंगजेब याचा मुलगा शहजादा मुअज्जमने मराठ्यांना मदत केली होती.

तर शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले त्यावेळी दक्षिणेच्या सुभेदारीवर शहजादा मुअज्जम आणि त्याचा सेनापती जसवंतसिंग यांची नेमणूक करण्यात आली होती. पण बादशहाच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्याच कारण म्हणजे दक्षिणेत परत एकदा शिवाजी महाराजांनी पुन्हा उचल खाल्ली आणि मराठ्यांशी दोन हात करायची वेळ आली तर कोणाचे धडगत राहणार नाही याची खात्री बादशहाला होती.

महाराजांच्या एका ही सरदाराचा पराभव करण्याचें सामर्थ्य या दोघांमध्ये नव्हतं हे बादशहा पुरेपूर जाणून होता. त्यामुळे बादशाहाने फर्मान काढलं की पुरंदरच्या तहाप्रमाणे युवराज संभाजीराजांच्या नावाने ६ सहस्त्रांची मनसबदारी काढण्यात यावी. पण संभाजीराजे वयाने अगदीच लहान असल्याने ही फौज घेऊन सरसेनापतीने संभाजीराजांच प्रतिनिधित्व औरंगाबाद मध्ये असलेल्या सुभेदाराचा म्हणजेच पर्यायाने शहजादा मुअज्जमच्या हाताखाली चाकरी करायची.

शिवाजी महाराज प्रचंड हुशार होते. औरंगाबाद मधली खडानखडा खबर दररोज कानी यावी म्हणून त्यांनी प्रतापराव गुजर, निराजी रावजी, मोरोपंत पेशवे, मुजुमदार सबनीस या मंडळींना पाठवलं होतं. हा शहजादा मुअज्जम हौसमौज, इश्कबाजी, रंगेलपणा करायचा. पण एक गोष्ट मात्र निश्चित होती ती म्हणजे शहजादा सरसेनापती प्रतापराव गुजर, रावजी निराजी आणि इतर मराठा सरदारांना बरोबर प्रेमाने वागायचा.

त्याच्या त्या आपुलकीच्या वागण्यात मोगलांच्या मगरुरीचा जरासुद्धा अंश नव्हता. त्याच्यात मैत्रीभाव होता यात तिळमात्र शंका नव्हती.

पण एक रात्र अशी उतरली की त्याचं शिवाजी महाराजांवरच प्रेम दिसून आलं.

दिवसभराचे थकलेभागलेले मराठा सैनिक आपल्या छावणीत आपापला थाळा घेऊन भोजन करत होते. तोच चौखूर धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज छावणीत आला. सारी छावणी दचकून उठली. शहजादयाचा अत्यंत विश्वास गुप्तहेर निरोप घेऊन आला होता की तुम्हाला भेटायला बोलावलंय. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर

अगर भोजन कर रहे हो तो हाथ धोने के लिए यहा मौजुद हो जाइये

प्रतापराव गुजर आणि रावजी निराजी घोड्यावर स्वार होऊन ताबडतोब भेटीस गेले.शहजादा मुअज्जम तेव्हा औरंगाबादेत रंगीत दरवाजाजवळ असलेल्या किल्ले अर्क या भुईकोटात राहत होता. प्रतापराव आणि निराजीपंत तिकडे गेले. त्यांना लागलीच एकांत जागी असलेल्या खलबत खाण्यात नेले. आणि शहजादा म्हणाला,

मला आज आजच दिल्लीची एक अत्यंत गुप्त बातमी मिळाली आहे. माझे वडील औरंगजेब बादशाह यांचे गुप्त फर्मान दिल्लीहून निघाले. त्यातील मजकूर मला आज आधी समजला, त्यामुळेच मी आपणाला ताबडतोब बोलावून घेतले. माझ्या वडिलांचा औरंगजेब बादशहाचा मला असा हुकूम आहे की, मी तुम्हा दोघांना कैद करून दिल्लीकडे ताबडतोब रवाना व्हावे. आणि इथे असलेल्या सहस्त्र मराठ्यांची रातोरात कत्तल करावी. तुमची संपूर्ण छावणी लुटून सर्व छावणी गारद करावी.

प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुलगा हे गुपित कारस्थान आज आपल्यापुढे उघड करतोय हे ऐकून दोघेही आ वासून त्याच्याकडे बघत राहिले. त्यांची शरीरे एकदम शहारली. प्रतापरावांच्या मुठी आवेशाने आवळल्या, कपाळावरील शीर चढली. पण शहजादयाच्या आवाजने ते भानावर आले.

त्या दोघांच्या खांद्यावर प्रेमाने थोपटत तो म्हणाला माझ्या पिताजींचे हे फर्मान मला बिलकुल मंजूर नाही. त्यांनी विश्वासघात केला आहे. पण तरी काय करणार. फर्मान पोहोचलं तर मला त्याची अंमलबजावणी करावी लागेल अगदी नाईलाजानं. माझा सल्ला असा आहे की हे फर्मान पोचण्याच्या आत तुम्ही सर्व छावणी इथून सरळ सरळ निघून जा. माझ्या नकळत पळून जा.

ताबडतोब प्रतापराव गुजर आणि रावजी निराजी निघाले त्यांनी शहजादयाचे आभार मानले. त्यांनी त्या रात्रीच गाशा गुंडाळला आणि मराठ्यांचे छावणी वाऱ्याबरोबर दौडत निघाली. जणूकाही आकाशात आलेली मेघ आकाशातच विरून गेले. प्रतापरावांनी वऱ्हाड जहागिरीवर असलेल्या रावजी सोमनाथ यांना कळवलं, औरंगजेब दगा करणार आहे तरी खजिना आणि माणसं घेऊन रायगडाकडे पळा.

प्रतापराव गुजर आपली सहा हजार फौज घेऊन तिथून सरकले आणि थेट पूर्वेकडील मोगली मुलखात मुसंडी मारत घुसले. तिथेच लक्षावधीची लुटमार केली. भीमा ओलांडली आणि ते राजगडावर महाराजांच्या मुजऱ्यास दाखल झाले. रावजी सोमनाथ सुभेदार मोगलांची वराड मराठवाड्यातली ठाणी उध्वस्त करून राजगडावर वळले.

या सर्वांनी मिळून वीस लक्ष रुपयांचा नजराना मोगलांच्या मुलखातून जमा करून महाराजांच्या पायाशी आणून ठेवला.

आठ दिवसांनी दिल्लीच ते फर्मान औरंगाबादेत दाखल झालं. शहजाद्याने ते आपल्या हाताखालच्या सगळ्या सरदारांच्या देखत उघडल. ते फर्मान बाहेर काढून त्यांना सर्वांना मोठ्याने वाचून दाखवलं. त्या फार्मनातील अक्षर अन् अक्षर अगदी बातमी प्रमाणात खरं होतं. ते फर्मान वाचून शहजादा मुअज्जम स्वतःच्या डोक्यावर बुक्की मारून घेत म्हणाला,

हे हरामजादे मराठा आठ दिवस अगोदरच पसार झाले. हा हुकूम या अगोदर आला असता तर मीच मराठ्यांच्या मुंडक्यांचा मिनार रचला असता. पण हे मराठे पहाड के चुहे पळाले. शहजाद्याने मराठे आधीच पसार झाल्याची सगळी हकीकत औरंगजेबाला कळवली. हे सर्व वाचून औरंगजेब थक्क झाला. हे मराठा नेमके आधीच कसे पळतात हे त्याला समजलंच नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.