भारतातलं एक गाव जिथे धर्म जात राजकारण पैसे यांना एंट्री बॅन आहे…

जिथे कधी कोणत्याही व्यक्तीच्या किंवा देशाच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही आणि जिथे विविध देशांतील आध्यात्मिक वृत्तीच्या साधकांना एकत्र येऊन मानवजातीच्या आत्मोन्नतीसाठी वास्तव्य करता येईल, असं एक उपनगर निर्माण करावं, अशी एक संकल्पना मूळ फ्रेंच नागरिक असलेल्या मीरा रिचर्ड आणि अरविंद घोष यांच्या प्रेरणेने पुढे आली.

त्या उद्देशाने पाँडिचेरी (पुदुचेरी) पासून १२ किलोमीटर अंतरावर एक टापू निवडला गेला आणि २८ फेब्रुवारी, १९६८ रोजी ” या आगळ्या प्रायोगिक स्तरावरील ‘जागतिक उपनगरा’ ची स्थापना करण्यात आली. 

‘चांगलं उन्नत जग निर्माण करण्याची अतीव सदिच्छा आणि अस्मिता मनी बाळगून त्यासाठी आध्यात्मिक साधना करू पाहणाऱ्या जगातील साधकांना एकत्र आणल्यास अखिल मानवतेचा दिव्य भविष्याकडे प्रवास साध्य होईल’ अशी मीरा रिचर्ड ज्यांना साधक ‘श्री माँ’ म्हणून हाक मारायचे आणि त्यांचे सहाध्यायी अरविंद घोष जे स्वातंत्र्य – चळवळीच्या पूर्वार्धातील आघाडीचे सक्रिय बंडखोर कार्यकर्ते होते,यांची तशी धारणा होती.

आध्यात्मिक साधनेद्वारे माणसातील अतिउच्च जाणिवेचा ध्यास घेणं साध्य व्हावं, या उद्देशाने यापूर्वी स्थापन झालेल्या पाँडिचेरीच्या आश्रमाच्या स्थापनेतही या दोघांचा पुढाकार होता. 

ऑरोव्हिलच्या प्रकल्पामध्ये इंदिरा गांधी, करण सिंग यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी विशेष रस घेतला आणि मीरा रिचर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली ऑरोव्हिलची स्थापना केली गेली. ऑरोव्हिलचं प्रायोगिक उपनगर पॉडिचेरीजवळ असलं, तरी भौगोलिकदृष्ट्या तमिळनाडूच्या विलुपुरम जिल्ह्यात या ‘टाऊनशिप’चा अंतर्भाव होतो.

या प्रकल्पाला भारत सरकारने १९६६ साली मान्यता दिली आणि युनेस्कोनेही अशा जगावेगळ्या प्रयोगात त्याच्या सभासद देशांनी त्यात सहभागी होण्याच्या कल्पनेला मान्यता दिली.

२८ फेब्रुवारी, १९६८ रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं, त्या दिवशी जगातील सुमारे १२४ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक मीरा रिचर्ड यांनी या प्रकल्पामागचे उद्देश स्पष्ट करताना ४- कलमी जाहीरनामा घोषित केला.

त्याचं सार असं होतं की,

ऑरोव्हिलवर कुणाचीच मालकी राहणार नाही. फक्त जगातील अखिल माणुसकीचा त्यावर हक्क राहील. दिव्य जाणिवेची आस धरणं, इतकंच इथे राहण्यासाठी आवश्यक राहील.

दुसरं माणसाच्या अविरत शिक्षणाचं आणि मानसिक विकासाचं कार्य करण्यासाठीच ही जागा (टाऊनशिप) राहील.

तिसरं म्हणजे भूत आणि भविष्यकाळामधील हा एक पूल ठरावा, ही ‘ऑरोव्हील’च्या निर्मितीमागची भूमिका आहे, इच्छा आहे.

तर चौथं म्हणजे खऱ्या अर्थाने मानवजातीचं ऐक्य साधण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रात जे संशोधन करू पाहतात त्या सर्वांसाठी हे उपनगर राहील.

वास्तुशास्त्रज्ञ रॉजन अंगर याने ‘आरोक्हिल’ उपनगराची रचना केली असून, इथे उभारलेल्या ‘मातृमंदिर’ या धर्मनिरपेक्ष केंद्राची संकल्पना अल्फान्सा यांची आहे. वास्तुशास्त्रीय दृष्ट्या वास्तू उच्च कलेचा नमुना समजली जाते.

मीरा रिचर्ड यांचा १९७३मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर ‘ऑरोव्हिल फाउंडेशन’च्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचं कार्य सुरू आहे. इथे कृणा देशाची मालकी अपेक्षित नसली, तरी ‘फाउंडेशन’ची सूत्रं भारताच्या केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याकडे सोपवलेली आहेत व या प्रकल्पातील अर्ध्या जमिनीचे हक्क या खात्याकडे राखीव ठेवलेले आहेत. 

अनेक साधकांच्या बहुअंगी अभिव्यक्तीतून इथे विकास साधण्याची नीती स्वीकारलेल्या या उपनगरात कोणत्याही धर्माला किंवा राजकारणालास्था स्थान ठेवलेलं नाही. सर्वसंगपरित्याग करून आपली गती ज्यात आहे. त्यात कार्यरत राहून उच्च जाणिवेचा ध्यास घेणं हेच अपेक्षित आहे.

त्या दृष्टीने वास्तुशास्त्र, सुतारकाम, लोहारकाम, कलाकुसर, विज्ञान, कलाक्षेत्र, शिक्षण, लघुउद्योग आदी क्षेत्रांसाठी या उपनगरात लहान लहान कक्ष आहेत. सदस्यांनी केलेल्या वस्तू देशभर विकून आर्थिक गरज भागवण्याचा प्रयत्न असतो.

एकंदरीतच इथे प्रवेश मिळवणं जटील असल्याने २००७ पर्यंत येथील रहिवाशांची एकूण संख्या केवळ सुमारे २ हजार इतकीच मर्यादित असल्याचं दिसून येतं. त्यात ४४ देशांच्या मूळ नागरिकांचा समावेश असून भारतीयांची संख्या सुमारे ८०० च्या वर आहे.

इतर नागरिकांचं मूळ राष्ट्रीयत्व लक्षात घेता फ्रान्स, जर्मनीतील लोकांची संख्या भारताच्या खालोखाल व इतर देशांच्या तुलनेत मोठी आहे. ‘जागतिक उपनगरा’ चा हा प्रयोग जगावेगळा ठरला. बाहेरच्यांना पूर्वपरवानगीने भेट-प्रवेशिका घेऊन हे उपनगर पाहण्याची मुभा ठेवलेली आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.