वर्ल्डकप जिंकणं सोडा, ऑस्ट्रेलिया जगातल्या सगळ्यात ‘टाईट’ देशांमध्येही पहिल्या नंबरवर आहे…

मध्यंतरी पार पडलेला टी२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियानं जिंकला. त्या स्पर्धेत भारत पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. त्यामुळं खरं लय दर्द झाला. त्यात पाकिस्तान पुढं गेलं आणि कित्येक चाहत्यांच्या जखमेवर खसा खसा मीठ चोळलं गेलं. पण ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा बाजार उठवला, त्या रात्री एकदम जंगी पार्ट्या झाल्या.

पुढं ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपही जिंकली, मग चर्चेत आलं त्यांचं सेलिब्रेशन. आता ऑस्ट्रेलिया हा आपल्या भारतासारखाच परंपरा मानणारा देश. त्यांच्या परंपरा फक्त थोड्या वाढीव असतात. ‘Shoey Celebration’ नावाची एक पद्धत त्यांच्याकडे आहे. यात हे गडी आपल्या शूजमध्ये बिअर ओततात आणि तोच शूज डायरेक्ट तोंडाला लावतात. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या या Shoey Celebration चे फोटोज चांगलेच व्हायरल झाले. जगभरातल्या अनेकांनी यावर टीका केली…

पण ऑस्ट्रेलियाचं फिक्स होतं.. ma celebration, ma rulez…

त्यामुळं त्यांनी दणक्यात बिअर रिचवल्या.

आता ऑस्ट्रेलिया आणि अल्कोहोल हे दोन विषय परत चर्चेत आलेत, चर्चा अशीये की एका सर्व्हेनुसार ऑस्ट्रेलिया जगातला सगळ्यात टल्ली देश ठरलाय. म्हणजे जेवढी दारू इथल्या लोकांनी पिलीये तितकी जगात कुठंच रिचवली गेली नाहीये.

कट्टर कार्यकर्त्यांनो हे वाचून लगेच ऑस्ट्रेलियाला हरवायचा विडा उचलू नका, गोष्ट विस्कटून सांगतो.

तर हा सर्व्हे केलाय लंडनमधल्या ग्लोबल ड्रग्स सर्व्हे (जीडीएस) या संस्थेनं. जीडीएसमधल्या कार्यकर्त्यांनी या सर्व्हेसाठी २२ देशातल्या ३० हजारहून जास्त व्यक्तींकडून माहिती घेतली. म्हणजे त्यांना दारू पिण्याच्या सवयीबाबत काही प्रश्न विचारले आणि त्याआधारे माहिती गोळा केली.

बरं काय पानचट प्रश्न विचारलेत असं पण नाही. प्रश्न विचारण्यात आले जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच आपल्या WHO च्या अल्कोहोल यूज डिसऑर्डर आयडेंटिफिकेशन टेस्ट नावाच्या प्रश्नावलीनुसार.

हे संशोधन करताना त्यांनी मद्यपींचा एक क्रायटेरिया बनवला होता. त्यांच्या डेफिनेशननुसार, ‘शारीरिक आणि मानसिक क्षमतेला धक्का लागेल, उभं राहता येणार नाही किंवा स्पष्ट बोलता येणार नाही इतकी दारू पिणारा म्हणजे मद्यपी. सोबतच दारू पिल्यावर गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष न देता येणारा किंवा आपल्याला ओळखणाऱ्या लोकांसमोर भलतंच बोलणारा किंवा भलतंच वागणारा कार्यकर्ता म्हणजे मद्यपी.’

थोडक्यात काय, तर लिटिल लिटिल घेणाऱ्यांची गिणती त्यांनी केलेली नाही.

या सर्व्हेचा रिझल्ट काय लागलाय?

तर सरासरी लोकांनी वर्षात १४.६ वेळा मद्यपान केलं. साहजिकच हे जे महिन्यातून एकापेक्षा थोडं जास्त आहे. मेक्सिकोमधल्या लोकांनी वर्षात ८.९ वेळा मद्यपान केलं. तर ऑस्ट्रेलियातली लोकं मात्र महिन्यातून दोनदा फकाट झाली. त्यामुळंच ऑस्ट्रेलियानं या लिस्टमध्ये टॉप केलं.

पिण्याची कारणं काय?

आता हा सर्व्हे फक्त कोण किती पितंय इतकाच मर्यादित नव्हता, तर कोण कशामुळं पितंय याची माहितीही या कार्यकर्त्यांनी काढलीये. या सर्व्हेनुसार लोकांनी समाधान मिळवण्यासाठी, मजा करायची म्हणून आणि दुःखात दारू पिली. आता तुम्ही म्हणाल आणखी दुसरं कारण असतंय होय? या तिन्ही कारणांमुळं दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सोबतच किरकोळ प्रमाणात पिणाऱ्यांमध्ये आनंद घेण्यासाठी पिणं हा उद्देश आढळला. ब्राझील, मेक्सिको आणि स्पेनमधल्या कार्यकर्त्यांनी दुःख झाल्यावर पिणं किंवा पिऊन दंगा करणं या गोष्टी टाळण्याला प्राधान्य दिलंय. तर नेदरलँडमधली लोकं समाधान मिळवण्यासाठी म्हणून आणि फिनलँडमधली लोकं मजा करण्यासाठी म्हणून दारू पिण्यात टॉपला पोहोचली आहे.

पिल्यावर वाईट वाटतंय का?

तुम्ही टेबलवर बसणारे किंवा मित्रांसोबत फक्त खायला बसणारे भिडू असाल, तर ‘उगाच पिलो राव, हे शेवटचं याच्यापुढं नाही,’ ही वाक्य तुम्ही हमखास ऐकली असणार. या सर्व्हे करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे प्रश्नही विचारले, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, आर्यलँडमधल्या लोकांना आपण कशाला पिलो किंवा कमी प्यायला हवी होती असा पश्चाताप सगळ्यात जास्त होतो.

आता या बातमीत कुठंच भारताचं नाव नाही, याचा तसा आम्हाला अभिमानच आहे. आपल्याकडची लोकं एकदमच चांगल्या लाईनला लागलीयेत असं एकंदरीत चित्र आहे. पण आपल्याकडं दुसरं चित्र असंही आहे की एखाद्या फकाट कार्यकर्त्यानी सर्व्हे घ्यायला आलेल्याचाच फिक्स इंटरव्ह्यू घेतला असता.

त्यामुळं लंडनमधल्या लोकांनी फारशी रिस्क घेतली नसावी. सध्याच्या आठवड्यात सर्व्हे झाला असता, तर मात्र भारतानं टॉप केलं असतं. कारण काय मस्त थंडी पडलीये, त्यात भूरभूर पाऊस म्हणजे मौका आहे, आणि ज्या रेटनं लग्न होतायत त्या रेटनं आशिकही वाढले असणार… म्हणजे दस्तूरही आहे.

तरी लगेच नियोजन लाऊ नका.. दारू पिणं काय चांगलं नसतंय. आता प्रत्येकाची चांगली वाईट डेफिनेशन काय आम्ही ठरवू शकत नाय म्हणा… त्यामुळं तूर्तास तरी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन आणि इतर देशांचे आभार.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.