तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तान क्रिकेट धड जात्यातही नाही अन सुपातही नाही

अफगाणीस्तानवर कब्जा मिळवून तालिबानने जगाला आश्चर्याचा आणि धोक्याचा इशारा दिला आहे. अनेक निर्णय घेण्यात आले सोबतच अफगाण क्रिकेटला धक्का बसेल असा निर्णयसुद्धा तालिबानने घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेटवर गदा येण्याचा हा निर्णय दिसू लागला आहे. तर जाणून घेऊया या सगळ्या प्रकरणाबद्दल.

तालिबानने स्पष्ट केलंय कि आमच्या देशातल्या महिला क्रिकेट मध्ये सहभाग घेणार नाही. क्रिकेटचं नाही तर इतर कुठल्याही खेळामध्ये सहभाग घेण्याची परवानगी महिलांना तालिबानने नाकारली आहे. तालिबानच्या मते क्रिकेटमध्ये बुरखा घालून खेळता येत नाही जेणेकरून महिलांचा चेहरा दिसेल आणि इस्लाम अशा गोष्टींना परवानगी देत नाही. 

तालिबानच्या कल्चरल कमिशनच्या डेप्युटी हेडचं म्हणणं आहे कि महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी देणे गरजेचं नाही कारण महिलांनी क्रिकेट खेळायलाच हवं असंही काही गरजेचं नाही. क्रिकेटमध्ये अशी परिस्थिती आहे कि त्यांचा चेहरा आणि शरीराचा इतर भाग दिसू शकतो आणि हा सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे या गोष्टी व्हायरल होऊ शकता, त्यामुळे अशा गोष्टींना इस्लाम परवानगी देत नाही.

तालिबानच्या या निर्णयामुळे आधीच अफगाणिस्तान क्रिकेट धड जात्यात नाही अन सुपात नाही मधेच अडकून आहे. महिलांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाकारल्याने अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघावर हा निर्णय बेतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध अफगाणिस्तान एकमेव कसोटी सामना खेळणार होता मात्र ऑस्ट्रेलियाने तालिबान सरकारच्या निर्णयामुळं अफगाणिस्तानच्या संघाबरोबर एकमेव कसोटी सामना खेळण्याचं कॅन्सल केल्याचं बोललं जातंय.

ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कोलबेक यांनी तालिबानच्या महिला क्रिकेटला परवानगी न देण्याच्या कारणावरून ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या होबार्टमधील कसोटी सामन्याला स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेल्याच बोललं जातंय. या सामन्याचा कन्फर्मेशन अजूनही अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डला मिळालं नाहीए म्हणून हा सामना कॅन्सल होण्याच्या बेतात आहे.

पुढे त्यांनी सांगितलं कि जागतिक पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटला जास्त प्राधान्य देत आहोत, क्रिकेटबद्दल आमचं व्हिजन  हे स्पष्ट आहे कि जास्तीत जास्त महिलाना क्रिकेट खेळण्याची मुभा द्यावी. अफगाणिस्तान महिला क्रिकेटचा निर्णय हा अस्वस्थ करणारा आहे, त्यामुळे सगळ्या बाजूंचा विचार करता आम्ही या टेस्टवर अजूनही ठाम निर्णय देऊ शकत नाही. 

अफगाणिस्तानमध्ये ह्युमन राईट्सवर चाललेले वाद जगजाहीर आहे, रशीद खान सारख्या खेळाडूला खेळताना बघणं हि कधीही पर्वणीचीच गोष्ट  पण तालिबानच्या अशा निर्णयामुळॆ अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघालासुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानचा महिला क्रिकेट संघसुद्धा तुल्यबळ आहे पण तालिबानचा हा निर्णय त्यांना गोत्यात आणू शकतो.

टी-२० वर्ल्डकपचा विचार करता हे संकट अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला किती महाग पडू शकतं याची प्रचिती यायला लागली आहे, वर्ल्ड कप बाबतच्या प्रवेशावरसुद्धा तालिबानचा हा निर्णय प्रश्नचिन्ह उभं करून गेला आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.