CWC चे अधिकार पाहता ही कमिटी गांधी घराण्याला अध्यक्ष पदावरून हटवू शकते पण..

५ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या दारुण पराभवानंतर १३ मार्च रोजी काँग्रेस वर्किंग कमिटी म्हणजेच CWC ची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाला आलेल्या अपयशाचे मंथन करण्यात आले. 

या बैठकीच्या आधी पक्षाला आलेल्या पराभवामुळे सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी यांनी आपला राजीनामा देण्यास तयारी दर्शवली होती मात्र CWC सदस्यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला. आणि पुन्हा एकदा ‘सोनिया गांधीच काँग्रेस अध्यक्ष म्हणून’ समितीने जाहीर केले. जोपर्यंत कॉंग्रेसची संस्थात्मक निवडणूक होत नाही तोपर्यंत सोनिया गांधीच पक्षाचं नेतृत्व करतील असं देखील CWC ने स्पष्ट केलं. 

यात काही विशेष नाही कारण दरवेळेस तीच ती स्क्रिप्ट गिरण्यात येते, तेच यावेळेस देखील घडलं. 

पण जरासा बदल जाणवला तो म्हणजे, याच बैठकीत काँग्रेसचा नाराज गट म्हणून ओळखला जाणाऱ्या  G२३ गटाने मुकूल वासनिक यांचे नाव समोर केलं होतं पण CWC ने या नावाचा प्रस्ताव फेटाळला.

G२३ गटातील नेत्यांकडे कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची कितपत क्षमता आहे हा भाग वेगळा पण या गटाने कितीही मागणी केली कि, पक्ष नेतृत्व बदला, गांधी घराण्याच्या बाहेरील एक सदस्य अध्यक्ष म्हणून निवडा पण याचा हक्क कुणाला असतोय तर CWC ला असतो..

आणि म्हणूनच जोपर्यंत काँग्रेस कार्यकारणी समिती म्हणजेच CWC मनावर घेत नाही तोपर्यंत तर काय जी २३ गटाची हि मागणी पूर्ण होणार नाही. 

थोडक्यात काँग्रेसमध्ये या CWC ताकद इतकी आहे आहे या कमिटीच्या निर्णयाचा प्रभाव हा पक्षातील निर्णयावर प्रभाव टाकतो. 

 हे CWC काय आहे ? 

CWC चा इतिहास पाहायला गेलं तर हि कार्यकारणी समिती काँग्रेसच्या स्थापनेपासूनच अस्तित्वात आहे. पक्षातील निर्णय प्रक्रियेमध्ये या समितीचा मोठा दर्जा असतो. थोडक्यात हि काँग्रेसची सर्वोच्च कार्यकारी समिती आहे, एकदा का या समितीने निर्णय घेतला तर तो पक्षाला आणि सदस्यांसाठी अंतिम निर्णय असतो. 

या CWC ची स्थापना १९२० च्या डिसेंबर मधील काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात झाली होती. त्यानंतर या कमिटीचा काँग्रेसच्या विस्तारामध्ये मोठा रोल होता. हि कमिटी पक्षाचे धोरण ठरवण्यास मदतीची ठरते.  

CWC चे सदस्य कोण असतात ?

CWC मध्ये पक्षाचा अध्यक्ष, पक्षाचा संसदेतील नेता आणि इतर एकूण २३ सदस्य असतात. या २३ सदस्यांपैकी १२ सदस्य हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारे (AICC) निवडले जातात आणि उर्वरित पक्षाध्यक्ष नामनिर्देशित करतात. सद्याच्या घडीला या कमिटीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी हे प्रमुख सदस्य आहेत.

CWC चे सदस्य निवडण्यासाठी निवडणुका कशा होत असतात ?

पक्षांतर्गत लोकशाही टिकावी म्हणून निवडणूक आयोगाने पक्षाअंतर्गत निवडणुका होणं गरजेचं असल्याचा आदेश तसा पक्षांना दिलेला आहे. आता हा भाग वेगळा कि प्रत्येक पक्षातल्या कार्यकारिणीच्या निवडणूक या कितपत लोकशाही मार्गाने होतात आणि होत नाहीत.

तर या समितीच्या आत्तापर्यंत खऱ्याखुऱ्या निवडणुका दोनदाच झाल्या. त्या म्हणजे, १९९२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष पीव्ही नरसिंह राव यांनी पॅनेलसाठी निवडणूक घेतली होती. त्यावेळेस राव यांचे टीकाकार समजले जाणारे अर्जुन सिंग आणि शरद पवार निवडून आले होते.

पण आणखी एक गोष्ट म्हणजे जेंव्हा याच निवडणुकीत जेव्हा एकही अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा सदस्य आणि एकही महिला सदस्य नसल्याचं कारण देत संपूर्ण CWC कमिटीच्या सज्ञान बडतर्फ केले आणि पुन्हा नव्याने समितीची रचना केली होती. 

त्यांनतर एक निवडणूक झाली ती १९९७ मध्ये कलकत्ता अधिवेशनात सीताराम केसरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. शरद पवार, अहमद पटेल, माधव राव सिंधिया, प्रणव मुखर्जी हे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडून आलेले. 

१९९८ मध्ये सोनिया गांधी पक्षाध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक न होता सदस्यांचे नामांकन करण्यास सुरुवात झाली.  थोडक्यात ‘सुरक्षेच्या’ दृष्टीने समितीमध्ये सदस्य निवडले जात होते. २०१० मध्ये पुन्हा सोनिया या अध्यक्ष झाल्या आणि पुर्नरचना केली गेली.  आत्तापर्यंतच्या सर्वच पक्ष अध्यक्षांनी आपल्या सोयीने सोडायची नेमणूक केली. 

त्यानंतर थेट २०१७ मध्ये राहुल गांधींनि पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली आणि त्यांच्या नेतृत्वात या समितीत २०१८ मध्ये पुनर्रचना करण्यात आली. 

निवडणूक होत नाहीत तर मग या सदस्यांची निवड कशी केली जाते ?

तर थोडक्यात पक्ष अध्यक्ष जितकं आपल्या जवळचे सदस्यांना निवडतात तितकेच याही बाबीकडे ध्यान दिलं जातं कि,  तो सदस्य पक्षासाठी जातीय आणि प्रादेशिक संघटन करू शकतो का. मग कमिटीत किती महिला आणि किती पुरुष सदस्य आहेत, त्यांच्याकडे संपत्ती किती आहे हि बाब लक्षात घेतली जात नाही. 

CWC च्या सदस्यांना कोणते अधिकार असतात ? 

ज्यापद्धतीने काँग्रेसची घटना आहे त्याप्रमाणे या कमिटीचे अधिकार पहिले तर लक्षात येईल कि याची पक्षात एवढी ताकद असते यामागचं महत्वाचं कारण म्हणजे CWC ला निर्माण झालेल्या परिस्थितीत पक्षाध्यक्षांना हटवण्याचा आणि इतर कुणा सदस्यांना नियुक्त करण्याचा अधिकार असतो.  

पक्षाची घटना आणि नियमांची अंमलबजावणी करण्याचा सर्वस्वी अधिकार या कमिटीकडे असतो. कमिटीची जेंव्हा जेंव्हा पुर्नरचना करण्यात आली तेंव्हा तेंव्हा अधिकारांमध्ये टप्प्याटप्य्याने बदल होत गेले. त्याप्रमाणे कमिटीला वेगवेगळे अधिकार मिळाले आणि 

जेव्हा १९४७ च्या आधी हीच कमिटी सत्तेचं केंद्र होती, या कमिटीची अध्यक्ष पक्षाच्या अध्यक्षापेक्षाही जास्त ऍक्टिव्ह असायचे पण कालातंराने यात बदल होत गेले. 

१९६७ च्या दरम्यान काँग्रेसमध्ये दोन तुकडे झाले तेंव्हा काँग्रेसमधील वातावरण डिस्टर्ब होत चालले होते तेंव्हा CWC निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था बनून समोर आली होती. कमिटीचे पक्षातील वर्चस्व आणि अधिकार हे वेगवेगळ्या पातळ्यांवर बदलत गेले.

पण काँग्रेस पक्षाची सद्य स्थिती पाहता…

आत्ताच्या घडीला CWC चं पक्षातील स्थान काय आहे हा मुद्दा असू देत की आजच्या घडीला CWC कमिटी गांधी घराण्याचा चेहरा असलेला अध्यक्ष हटवू शकते का हा मुद्दा असू देत या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कमिटी पक्ष नेतृत्वाचा मोठा निर्णय का घेत नसावी. 

चर्चा अशी समोर येते कि, CWC आपला अधिकार वापरून काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी घराणं सोडून इतर कुणाला का नेमत नाही ?

यामागील कारण जसं कि आपण सुरुवातीला बघितलं कि काँग्रेसचा सलग होणारा पराभव आणि गांधी घराण्याचा एकहाती पक्षावरील कंट्रोल पाहता CWC कमिटी आपले अधिकारांचा वापर करत पक्ष नेतृत्वात बदल घडवेल का अशी अपेक्षा नाराज गटाकडून व्यक्त केली जातेय.

पण अपेक्षा आता फोल ठरू शकते कारण १३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत CWC ने जी २३ गटातून मुकुल वासनिक यांच्या नावाचा प्रस्ताव फेटाळून सोनिया गांधींच्या नावालाच फायनल केलं आहे. मग या बैठकीनंतर पुन्हा तेच घडतांना पाहून, राजकीय विश्लेषक सांगत आहेत कि, CWC सारख्या मोठ्या कमिटीला ला जर सोनिया गांधीच एकमेव पर्याय वाटत असतील तर मग काँग्रेसच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय. 

बदलत्या काळानुसार मर्यादित वैयक्तिक हितसंबंधांचा विचार करणं सोडून देऊन या सदस्यांनी  आपल्या अधिकारांचा वापर करून पक्षाच्या भविष्यासाठी एकत्रितपणे विचार करायला हवा.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.