अयोध्या- मथुरा- कुतुबमिनारच्या याचिका खुद्द देवांनीच दाखल केल्यात पण कशा काय ?

२०१२ साली OMG Oh My God! नावाचा पिक्चर आलेला. या पिक्चरची शॉर्ट मध्ये स्टोरी अशीय की,

यात मुख्य भूमिका असलेल्या परेश रावल यांचं देवांच्या मूर्तीचं दुकान असतं. कसं बसा त्यांचा खर्च येणाऱ्या मिळकतीमधून चालत असतो. मात्र अचानक आलेल्या भूकंपात त्याचं दुकान पडते, त्यात असणाऱ्या मुर्त्यांची तुकडे होतात.

झालेल्या नुकसानीचा डोंगर पाहता ते इन्शुरन्स पॉलिसी इत्यादी कडे जातात आणि नुकसान भरपाई मागतात मात्र त्यांना त्या बदल्यात असं उत्तर मिळते की, भूकंप येणे ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्यात निसर्ग हा देवाने निर्माण केला आहे, अशी उत्तरं देऊन मिळणारी नुकसानभरपाई नाकारली जाते. 

मग जबाबदार कुणाला धरावं ? तर नैसर्गिक आपत्ती आणलेल्या देवाला हा दुकानदार जबाबदार धरतो. आणि कोर्टात देवाविरुद्धच याचिका दाखल करतो तेंव्हा या खटल्यात देवाची बाजू मांडण्यासाठी महंत, पुजारी, मौलवी, चर्चमधील फद्दर या सर्वांना न्यायालयात हजर राहावं लागतं.

पण जेंव्हा देवांवरच काही समस्या आली तर देव कुठे न्याय मागणार ? उत्तर आहे सुप्रीम कोर्ट !

तुम्ही म्हणाल ही काय बडबड चालू आहे ? देवावर कुठं अन्याय होतो का आणि जरी तसं झालं तर देवाला काय गरज आहे न्यायालयात चकरा मारायची ?

वर सांगितलेली स्टोरी पिक्चरची आहे मात्र आता रियल स्टोरी सांगते… 

देशातल्या पुरातन वास्तू हिंदूंच्या कि मुस्लिमांच्या यावरून जे वाद सुरु झालेत त्याबद्दलचा हा विषय आहे. त्यातील प्रसिद्ध अयोध्या प्रकरण तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर इतरही मुद्दे सुरु झालेत. कुतुबमिनार हा विष्णूस्तंभ असल्याचं प्रकरण असो की, मथुरा मधील शाही इदगाह मशीद प्रकरण असोत ही सगळी प्रकरणं एकएक करून वातावरण तापवत आहेत.

अयोध्याचा तर निकाल लागलाच आहे आता कुतुबमिनार आणि मथुरा या सगळ्या वास्तूंशी हिंदू संबंध दाखवत उत्खननाची मागणी करणाऱ्या याचिका कोर्टाच्या रांगेत उभा असलेल्या दिसत आहेत.   

पण या याचिका कुणी दाखल केल्यात खुद्द देवांनीच ! होय. देव स्वतःचा खटला लढतोय. 

कुतुबमिनारचा वाद असो की मथुरा प्रकरण असो की प्रसिद्ध अयोध्या प्रकरण, सगळ्यात देव स्वतः पक्षकार राहिला आहे. असे का?

१ ) आत्ता सुरु असलेलं प्रकरण म्हणजे, कुतुबमिनार प्रकरण.

२४ मे रोजी कुतुबमिनार वादावर दिल्ली न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान भगवान विष्णूंच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. हरिशंकर जैन हे विष्णू आणि जैन देवतांच्या वतीने याचिकाकर्त्याचे वकील म्हणून हजर झाले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आता यावर निर्णय होणार आहे. 

तर विषय असा आहे कि, अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती व चिन्हे आहेत व हिंदू व जैन मंदिरे तोडून कुतुबमीनार परिसरात बांधकाम करण्यात आले आहे, 

महंमद घोरीच्या कुतुबुद्दीन नावाच्या सेनापतीने कुतुबमीनार बांधताना कुव्वत-उल-इस्लाम मशीद परिसरातील किमान २७ मंदिरे उध्वस्त केली होती. त्यात भगवान विष्णू आणि जैन देवतांची मंदिरे होती. 

म्हणून भगवान विष्णूंच्या वतीने, कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

हरिशंकर जैन हे या प्रकरणात जैन देवता आणि भगवान विष्णू यांचे वकील आहेत. जैन तीर्थंकर भगवान ऋषभ देव आणि भगवान विष्णू यांच्या वतीने हरिशंकर जैन, रंजना अग्निहोत्री आणि जितेंद्र सिंह बिसेन यांनी याचिका दाखल केली होती.

देवाच्या वतीने याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना जेंव्हा दिवाणी न्यायाधीशांनी विचारले की, देवाकडून याचिका दाखल करण्याचे औचित्य काय आहे? 

तेंव्हा याचिकाकर्त्याने सांगितले की, आम्ही देवाच्या वतीने तर याचिका दाखल केलीच आहे तसेच देवानंतर भक्त हा आलाच.. त्याला त्याच्या देवावर श्रद्धा आणि अधिकार दोन्ही समान पातळीवर असतात. त्यामुळे खुद्द देवांच्या वतीने याचिका दाखल करण्याचा अधिकारही भक्ताला आहे. 

विशेष म्हणजे हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला आहे. 

२) त्यानंतर मथुरा प्रकरण बघूया…

नुकतीच मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने साक्षात भगवान श्रीकृष्णाचीच याचिका स्वीकारलीय. 

या याचिकेत नमूद केल्यानुसार, श्रीकृष्णाच्या एकूण १३.३७ एकर जमिनीपैकी सुमारे ११ एकर जमिनीवर श्रीकृष्ण जन्मभूमी आहे. तर शाही इदगाह मशीद २.३७ एकर जागेवर बांधली आहे. ही २.३७ एकर जमीन मोकळी करून श्रीकृष्ण जन्मभूमीत समाविष्ट करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे ही याचिका अॅडव्होकेट रंजना अग्निहोत्री यांनी सप्टेंबर २०२० मध्ये भगवान कृष्णाची (सखी ) मैत्रीण म्हणून दाखल केली होती.  मात्र दिवाणी न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात पोहोचले आणि दीड वर्षे सुनावणी सुरू आहे तसेच याची जुलैमध्ये सुनावणी होणार आहे.

रंजना अग्निहोत्री, हरिशंकर जैन, विष्णू जैन यांच्यासह एकूण सहा जणांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

३) अयोध्या प्रकरण

अयोध्या प्रकरणाच्या वादात कायदेशीर लढा हा बराच काळ लढला गेला. या वादात प्रभू राम म्हणजेच रामलल्ला हे पक्षकार होते हे कदाचित तुम्हाला आठवत असेल. उत्तर प्रदेशमध्ये लहान मुलाला प्रेमाने ‘लल्ला‘ म्हणलं जातं. 

म्हणजेच पक्षकार रामलल्ला हे अल्पवयीन आहे, म्हणूनच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश देवकीनंदन अग्रवाल यांनी रामलल्लाचा मित्र म्हणून हा खटला लढवला होता. 

त्यांच्या मृत्यूनंतर विश्व हिंदू परिषदेचे त्रिलोकीनाथ पांडे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात के. पारासरण यांनी युक्तिवाद केले. 

रामलल्ला यांच्या वतीने जेंव्हा पहिला अर्ज करण्यात आला तेव्हा त्याला विरोध झाला नव्हता. त्याचदरम्यान जुलै १९८९ मध्ये निवृत्त न्यायाधीश देवकीनंदन अग्रवाल न्यायालयात पोहोचले होते.

२०१० मध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा रामलल्ला यांना वादग्रस्त जमिनीचा एक भाग देण्यास सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर रामलल्ला यांचा विजय झाला आणि संपूर्ण जमीन त्यांच्या ताब्यात देण्यात आली आणि आता भव्य राम मंदिर बांधले जात आहे.

आता मुद्दा येतो देव कसे काय याचिका दाखल करू शकतात?

देवांच्या वतीने अशी याचिका दाखल करता येते आणि हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला होता.

देवाचा पक्षकार होण्याचे किंवा खटला लढण्याचे कारण तसे खूप इंटरेस्टिंग आहे.

हे तुम्हाला कदाचित माहितीच असेल की, हिंदू धर्मानुसार, ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते म्हणजेच देवाच्या मूर्तीची पंचोपचार पूजा केली जाते. जेव्हा जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते, मूर्तीची स्थापना केली जाते तेव्हा मंत्रजप, विधी, मूर्तीचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर त्या मूर्तीचे जिवंत अस्तित्व आहे असे समजले जाते. 

प्राण-प्रतिष्ठेचा साधा अर्थ प्राण पणाला लावून त्या मूर्तीला जिवंत करणे. मंदिरातील मूर्तीमध्ये निवास करण्यासाठी, त्या मूर्तींची स्थापना केली जाते.

“थोडक्यात या सगळ्या पूजा-विधी करून ती मूर्ती केवळ मूर्ती राहत नाही तर श्रद्धेनुसार जिवंत देवताच  त्या मूर्तीमध्ये वास करते असं हिंदू धर्माची मान्यता आहे”.

अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अयोध्या प्रकरणाचे उदाहरण दिले जात होते त्यात आता मथुरा आणि कुतुबमिनारच्या प्रकरणाचा समावेश होतो.

या प्रकरणाबाबत अधिक आकलन होण्यासाठी बोल भिडूने हाय कोर्टात प्रॅक्टिस करणारे वकील रोहन नहार यांच्याशी चर्चा केली. ते सांगतात की, 

“आता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर त्यावर पुन्हा काही बोलता येणार नाही. मात्र वास्तविकपणे एखादा व्यक्ती ज्यांच्या वतीने वकील कोर्टात बाजू मांडतो. तक्रारकर्त्यावर अन्याय झालेला आहे म्हणून वकील त्यांच्यावतीने याचिका दाखल करतो. 

पण वरील प्रकरणात असं झालेले नाहीये की, देव असं म्हणाले नाहीयेत की, माझ्यावतीने याचिका दाखल करा वैगेरे. मात्र सुप्रीम कोर्टानेच त्या युक्तिवादाला मान्यता दिली त्यामुळे आपल्याला या मुद्द्याला डिवचता येणार नाही.

आता देवतांची मूर्ती ही फक्त मूर्ती नाही तर जिवंत देवता आहे ही आपली मान्यता आहे. विश्वासाचा आणि भावनेचा मुद्दा आहे. मात्र यानंतरही आपण असं म्हणू शकत नाही की मला देवाने त्याच्या वतीने बाजू मांडण्याची सूचना केली का ? तर त्याला उत्तर नाही असच येतं.

हे मुद्दे धार्मिक-राजकीय आहेतच, मात्र कायद्याच्या प्रक्रिेये-अंतर्गत माझ्या ते चुकीचं आहे – Adv रोहन नहार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापुढे जाऊन आपल्याला बोलता येत नाही, मात्र देवाला व्यक्ती म्हणून कोर्टासमोर उभे करणे आणि बाजू मांडणे हे योग्य की अयोग्य ? हा सगळा विषय चर्चेचा नक्कीच आहे.

देवाला एखाद्या जागी कोंडून ठेवणे, अमुक जागाच त्याच्या प्रार्थनेची आहे वैगेरे मुद्दे चुकीचे आहेत.  देवाच्या नावावर एखादी बाजू रेटण्याच्या मुद्द्यावर राजकारण चालू असते यावर चर्चा होणे गरजेचं आहे असं मत रोहन नाहार यांनी व्यक्त केलं जे निश्चितच विचार करायला भाग पाडते.

बाकी तुम्ही यावर नक्कीच चर्चा आणि त्या चर्चेतून काय मतं येतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.