त्या दिवशी सुभाषबाबूंनी आझाद हिंदच्या रुपात देशाचं पहिलं सरकार स्थापण केलं

२१ ऑक्टोबर १९४३ हा दिवस भारतीय स्वतंत्रलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. याचं दिवशी भारतीय स्वातंत्र्यसंघाचे उभ्या पूर्व आशियातले प्रतिनिधी सुभाषबाबूंनी केलेली स्वतंत्र भारताच्या अस्थायी हंगामी शासनाच्या स्थापनेची घोषणा ऐकण्यासाठी सिंगापुरातल्या कॅथे चित्रपटगृहात जमा झाले होते.

प्रसंग पवित्रगंभीर होत. सभागृह तुडुब भरलेले,  उभे राहता येण्याजोगा इंचन इंच व्यापला गेला होता. ताणलेल्या अपेक्षांचे साम्राज्य सगळीकडे पसरले होते. घड्याळाने साडेचारचा ठोका दिला. व्यासपीठावरच्या आपल्या जाग्यावर नेताजी उभे राहिले आणि त्यांनी संथ आणि लयबद्ध स्वरात ती घोषणा वाचली.

त्या भावनेने भारावलेल्या सभागृहातल्या प्रेक्षकांनी सुई पडली तर ऐकू यावी इतक्या शांततेने नेताजींचा शब्द न शब्द टिपला. १५०० शब्दांची ती घोषणा दोन दिवसांपूर्वी सारी रात्र जागून नेताजींनी एका बैठकीत लिहून काढली होती. १८५७ पासूनच्या स्वातंत्र्यलढ्याचे ते सिद्धहस्त
सिंहावलोकन होते. त्यात म्हटले होते :

“भारताच्या भूमीवरून ब्रिटिशांना आणि त्यांच्या मित्रराष्ट्राना काढून लावण्यासाठी लढा मांडून तो चालवणं हे अस्थायी शासनाचं काम असेल. हे शासन भारतीय जनतेच्या इच्छेनुसार प्रस्थापित झालं असून तिचा परिपूर्ण विश्वास त्याला लाभलेला आहे.”

घोषणेच्या शेवटी स्फूर्तिदायक आवाहन केले होते

“परमेश्वराच्या नावानं, भारतीय लोकांना एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेनं निगडित करून ठेवणाऱ्या भूतपर्व पिढ्यांच्या नावानं आणि शौ्याच्या व आत्मयज्ञाच्या परंपरेचा उत्तराधिकार आपल्या हाती सोपविणाऱ्या दिवंगत  वीरांच्या नावानं आम्ही भारतीय जनतेला असे आवाहन करत आहोत की, त्यांनी या ध्वजाभोवती एकजुटीनं जमुन भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्र चालवावं.”

आझाद हिंदच्या अस्थायी शासनाच्या वतीने सुभाषचंद्र बोस, कॅप्टन श्रीमती लक्ष्मी, एस. ए. अय्यर, लेफ्टनंट कर्नल ए. सी. चॅटर्जी, लेफ्टनंट कर्नल अझीझ अहमद, लेफ्टनंट कर्नल एन. एस. भगत, लेफ्टनंट कर्नल उगन्नाथराव भोसले, लेफ्टनंट कर्नल गुलझारासिंग, लेपटनंट कर्नल ए. डी. लोकनादन, लेफ्टनट कर्नेल एहसान कादिर, लेफ्टनंट कर्नल शहानवाझ, ए. एम. सहाय, रासबिहारी बोस, करीम गनी, देवनाथ दास, डी. एम. खान, ए. यल्लप्पा, जे. थिवी, सरदार, ईश्वरसिंग, ए. एन. सरकार यांनी या घोषणेवर पुढील व्यक्तींनी सह्या केल्या.

आझाद हिंदच्या अस्थायी शासनाच्या स्थापनेची प्रकट घोषणा जगात केल्यानंतर नेताजी भारताशी एकनिष्ठ राहण्याची शपथ उच्चारू लागले. या प्रसंगी केंथे सभागृहाला त्या ठिकाणी आजवर साजऱ्या झालेल्यांतल्या सर्वांत हृदयस्पर्शी सोहोळ्याचे दर्शन घडले. नेताजीनी शपथ वाचून दाखवायला प्रारंभ केला, तेव्हा वातावरण ताणलेले होते.

“परमेश्वराचे नाव घेऊन मी अशी शपथ घेतो की भारताला आणि माझ्या अडतीस कोटी देशबांधवांना मुक्त करण्यासाठी..”

मग मात्र नेताजी थांबले. त्यांना पढ़े वाचताच येईना. त्यांचा आवाज भावनांमुळे दाटून आला, गालांवरून आसवं ओघळायला  लागली, त्यांनी आपला हातरुमाल बाहेर काढून अश्रू टिपले आणि सारे सभागृह निःस्तब्ध होऊन गेले. त्यांची मनोवेदना श्रोत्त्यांमधल्या काहींच्या काहींच्या हदयाला जाऊन भिडली आणि तेही एकाएकी अश्रू ढाळू लागले.

तेवढ्या क्षणापुरता नेताजींना आपल्यापूढच्या श्रोत्यांचा विसर पडला. मागील काळातल्या क्रांतिकारकांच्या लांबच लांब रांगा आणि नेमक्या त्याच क्षणाला शास्त्रसंभाराने सुसज्ज अशा विदेही राज्यकर्त्यांशी शौर्याने झुंज देणारे भारतातले कोट्यवधी निशस्त्र स्वतंत्रसैनिक तेवढंच त्यांच्यासमोर दिसायला लागलं.

नेताजींना भावनांचा वेग अनावर झाला. त्यांना शपथ पुढे वाचता येईना.  पण काही वेळानंतर त्यांनी स्वतःचा तोल सावरला आणि शपथ वाचायला सुरुवात केली.

“मी सुभाषचंद्र बोस, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत पवित्र स्वातंत्र्यसंग्राम चालू ठेवीन. मी सदैव भारताचा सेवक बनून राहीन आणि आपल्या ३८ कोटी भारतीय भावंडांच्या हितसबंधाची काळजी वाहणे है माझ्या दृष्टीनं माझे परमोच्च कर्तव्य राहील. स्वातंत्र्य संपादन केल्यानंतरदेखील भारताच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा शेवटचा बिंदू सांडण्यासही मी सदैव सज्ज राहीन.’

नेताजींनी शपथ वाचून संपविली मात्र, लगेच ताणलेल्या वृत्ती एकदम मोकळ्या झाल्या आणि श्रोत्यांच्या दडपून ठेवलेल्या भावनांचा स्फोट टाळ्यांच्या भरमसाट गजरात होऊन त्यांचे नादनिनाद कित्येक वेळ दुमदमत राहिला. ‘इन्किलाब झिंदाबाद आणि ‘आझाद हिंद झिंदाबाद’च्या मुक्तकंठ गर्जना तर वातावरण भेदून निनादत राहिल्या.

दरम्यान या अस्थायी सरकारमध्ये सुभाषचंद्र बोस पंतप्रधान झाले आणि युद्ध आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रीही झाले. याशिवाय या सरकारमध्ये आणखी तीन मंत्री होते. तसेच १६ सदस्यीय मंत्रीस्तरीय समिती. अस्थायी सरकारची घोषणा केल्यानंतर भारताशी निष्ठेची शपथ घेण्यात आली.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.