नेताजींच्या आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद भोसलेंकडे होते

आझाद हिंद सेना म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगतं पान. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली यांनी परकीय इंग्रजी सत्तेला धडक दिली. बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे त्यांना विजय मिळवता आला नाही पण याच आझाद हिंद सेनेच्या धडकेमुळे ब्रिटीशांना लक्षात आलं की भारतातलं आपलं साम्राज्य खिळखिळे झालेले आहे.

पुढे इंग्रज भारत सोडून गेले यात आझाद हिंद सेनेच्या युद्धाचा सिंहाचा वाटा आहे.

अशा या प्रेरणादायी पराक्रमी आझाद हिंद सेनेचे सेनापतीपद एका मराठी माणसाकडे होते. जनरल जगन्नाथ राव भोसले.

ते मुळचे कोकणातले. २० एप्रिल १९०६ यांचा जन्म सावंतवाडीजवळच्या तिरोडा या गावी भोसले राजघराण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण सावंतवाडी, वेंगुर्ला या भागात झाले. लहानपणापासून त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं, ते खेळायचे देखील उत्तम मात्र घरातल्या वडीलधाऱ्यांची इच्छा होती जगन्नाथनी लष्करात जाव व भोसले घराण्याच्या शौर्याची परंपरा पुढे न्यावी.

वयाच्या १६व्या वर्षी जगन्नाथराव डेहराडूनच्या लष्करी शाळेत भरती झाले. येथे त्यांनी दाखवलेलं कौशल्य, त्यांच्यातील नेतृत्व गुण पाहून तत्कालीन सरकारने त्यांची इंग्लंडच्या रॉयल मिलिटरी कॉलेज सँडहर्स्ट येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली.

१९२६ ते  १९२८ जगन्नाथराव भोसले यांनी जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेतलं. तेथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्लंडमध्येच ब्रिटीश आर्मीमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर रुजू करण्यात आले.

इंग्लंडमध्ये एक वर्ष शाही सैन्यात काम केल्यावर भोसले भारतात परत आले व १२ एप्रिल १९२९ रोजी ५व्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाले.

पुढे त्यांची लेफ्टनंट व काही वर्षांनी कॅप्टन पदावर बढती मिळाली.

मे १९३७ मध्ये इंग्लंडच्या राजाच्या राज्यरोहन प्रसंगी संबंध भारतातून तीन अधिकाऱ्यांची निवड झाली यात जगन्नाथराव भोसले यांचा समावेश होता. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कर्तबगार ऑफिसर्समध्ये त्यांचा समावेश केला जायचा. त्यांचे रणांगणातील शौर्य, वाघाची शिकार करण्याचे धाडस, त्यांचं रणनिती कौशल्य याची कायम चर्चा सुरु असायची.

अशातच १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले. ब्रिटीशांचे अंकित असल्यामुळे भारतीय आर्मीला देखील या युद्धात भाग घ्यावा लागला. जगन्नाथराव भोसले यांना युद्धआघाडीवर नेमणूक करण्यात आली.

मे १९४१ रोजी भोसले सिंगापूरला हवाई व पायदळाची पाहणी करण्यासाठी नियुक्त झाले.

सिंगापूर इंग्रजांच्या ताब्यात होते व जपानचा त्यावर डोळा होता. भारतीय जवान प्राणाची बाजी लावून सिंगापूरचे रक्षण करत होते.

डिसेंबर महिन्यात जपानने अचानक सिंगापूर वर हल्ला केला. अनेक लष्करी तळावर बॉम्बिंग करण्यात आली. याच हल्ल्यात सिंगापूर येथील ब्रिटीश आर्मीचे मुख्य अधिकारी कर्नल स्मिथ हे धारातीर्थी पडले. त्यांच्या जागी आकस्मितपणे जगन्नाथराव भोसले यांची निवड झाली व त्यांना कर्नलपदी बढती देण्यात आली.

कॅप्टनवरून कर्नलपदावर थेट बढती मिळणारे ते पहिलेच भारतीय लष्करी अधिकारी होते. सिंगापूर येथील युरोपियन अधिकारीदेखील त्यांचा आदेश पाळू लागले.

जपानच्या आक्रमकतेपुढे तुटपुंज्या ब्रिटीश सेनेचा फार काळ निभाव लागला नाही. हजारो शूरवीर जवानांसह कर्नल जगन्नाथराव भोसले जपानी लष्कराच्या हाती सापडले. त्यांची रवानगी युद्धकैदी म्हणून करण्यात आली.

या दरम्यान क्रांतिकारी रासबिहारी बोस यांनी जपान्यांच्या हाती सापडलेल्या युद्धकैद्यांना एकत्र करून एक संघटना स्थापन सुरु करायचे प्रयत्न चालवले होते. ब्रिटिश सेनेतील भारतीय सैन्याधिकारी कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने जपान्यांच्या आश्रयाखाली भारतीय राष्ट्र सेना स्थापन केली.

त्याच वेळी स्वातंत्र्य चळवळीची कार्यवाही त्वरित व्हावी, म्हणून भारतीय स्वतंत्रता लीग स्थापून राशबिहारी बोस यांची  अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

अगदी याच काळात सुभाषबाबू भारतातून निसटून जर्मनीला गेले होते व इंग्लंडच्या शत्रू राष्ट्रांकडून भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही मदत होते का याची चाचपणी करत होते. त्यांना जपानमधल्या भारतीय राष्ट्र सेनेबद्दल कळाले.

कॅ. मोहनसिंग यांच्या निमंत्रणावरून बँकॉक येथील परिषदेस हजर राहण्यासाठी जर्मन व जपानी सरकारच्या मदतीने महत्प्रयासाने नेताजी जून १९४३ मध्ये सिंगापूरला जाण्यासाठी टोकिओत दाखल झाले.

परंतु दरम्यान मोहनसिंग यांचे जपानशी मतभेद होऊन जपान्यांनी ही भारतीय राष्ट्र सेना बरखास्त केली परंतु भारतीय स्वातंत्र्य-संघ ही संस्था तेथे अस्तित्वात होती. नेताजींनी जपान्यांच्या मदतीने मोहनसिंगांच्या लष्करी संघटनेचे पुनरुज्‍जीवन करून

तिला ‘आझाद हिंद सेना’ हे नाव देण्याचे ठरविले.

२ जुलै १९४३ रोजी नेताजी सिंगापूरला गेले व लागलीच त्यांनी राशबिहारी बोस यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य-संघाची धुरा आपल्या हाती घेतली आणि ५ जुलै १९४३ रोजी औपचारिक रीत्या आपल्या आधिपत्याखाली आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याचे घोषित करून ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्यही प्रसृत केले.

जपानच्या कैदेतील भारतीय युद्धबंदी, सामान्य भारतीय नागरिक व असंख्य स्रिया देशसेवेसाठी स्वेच्छेने ह्या सेनेत दाखल झाल्या. दोन लष्करी विभाग भरतील एवढे खडे सैन्य, जपानच्या हाती लागलेल्या ब्रिटीश शस्त्रसामग्रीच्या आधाराने सुसज्‍ज करण्यात आले.

कर्नल जगन्नाथराव भोसले, शाहनवाजखान व मेजर सैगल या भारतीय युद्धबंदी लष्करी अधिकाऱ्यांना मेजर जनरल हा हुद्दा देण्यात आला व त्यांच्या अनुक्रमे चीफ ऑफ जनरल स्टाफ व विभागीय सेनाप्रमुख म्हणून नेमणुका केल्या.

आझाद हिंद सेनेच्या सेनापतीपदाचा सन्मान एका मराठी माणसाला मिळाला.

थोड्याच दिवसांत आझाद हिंद सेनेस जपानी सेनेचा दर्जा प्राप्त झाला व ती कार्यन्वित झाली. नेताजीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे व स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयामुळे भारतीय सैनिकांची संख्या तीस हजारांच्या वर गेली. पुढे त्या सेनेची गांधी, नेहरू, आझाद अशी तीन पथकांत विभागणी करण्यात आली. स्त्रियांचे ‘झाशीची राणी पथक’ तयार करण्यात आले, त्याचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं.

१९४४ च्या मार्च महिन्यात आझाद हिंद सेनेने भारताच्या ईशान्य सीमेवरील इंफाळ येथे  हल्ला चढवला. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले,

जनरल जगन्नाथराव बर्मा व सिंगापूर येथून नेताजींना युद्धनिती तयार करण्यास मदत करत होते. आझाद हिंद सेनेने पराक्रमाची पराकाष्ठा केली.

परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री यापुढे आझाद हिंद सेनेची ताकद कमी ओद्त होती. त्यातच हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यामुळे जपानने आपला पराभव मान्य करू शस्त्रे टाकली.

पुढच्या दहाच दिवसात सुभाषबाबूंचा विमान अपघातात संशयास्पद रीतीने मृत्यू झाला.

युद्धबंदी जाहीर झाल्यावर टोकियोशी बोलणी करायला निघालेल्या नेताजींची विमानतळावर शेवटची भेट जनरल भोसले यांच्याशी झाली होती. सेनापतींनी नेताजींना आझाद हिंद सेनेची मालमत्ता सोपवली होती. फक्त सुभाषबाबुनी त्यांचं सोन्याचं घड्याळ जनरल भोसलेंकडे दिले व भारतात परत गेल्यावर मला त्याची आवश्यकता आहे अस सांगितल.

पण दुर्दैवाने ही वेळ आलीच नाही. सुभाषबाबूंना अखेरची सलामी सर्वात विश्वासू साथीदार जनरल भोसले यांनीच दिली होती.

या सगळ्या घडामोडीमुळे आझाद हिंद सेनेला शरण यावे लागले. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला. जनरल भोसले ,शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले.

पंडीत जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई यासारख्या दिग्गज वकिलांनी त्यांची केस लढली. आझाद हिंद सेनेच्या जवानांना मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता आहे हे कळताच भारतभरात आक्रोश निर्माण झाला. आंदोलने उभारली.

अखेर जनमताचा रेटा पाहून घाबरलेल्या ब्रिटीश सरकारने या आझाद हिंद सेनेवरील सर्व शिक्षा माफ केली.

जनरल जगन्नाथराव भोसले  यांचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांचा व महाराष्ट्रातील इतर आझाद हिंद सैनिकांचा पुण्यात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मोठा सत्कार सोहळा संपन्न झाला.

पुढे स्वातंत्र्यानंतर जनरल भोसले यांनी राजकारणात उडी घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रत्नागिरी मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. महाविद्यालयातील तरुणांना देशसेवेची आवड निर्माण करणारी NSS उर्फ राष्ट्रीय सेवा योजना ही त्यांचीच कल्पना मात्र ती प्रत्यक्षात येण्या पूर्वी म्हणजे १९६३ साली त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. रवीन्द्र द खडपेकर. says

    फार सुंदर माहिती.

Leave A Reply

Your email address will not be published.