अझरूद्दीनने शिवी देण्याची चूक केली म्हणून गांगुलीला चान्स मिळाला.

१९९६ चे साल होतं. भारतीय क्रिकेट इतिहासातील विवादित वर्ष म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यावर्षी झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारताला श्रीलंकाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हा क्रिकेट पंडित, रसिक मंडळीसह देशभरातून भारतीय क्रिकेट टीमवर टीकेची झोड उठवली होती.

यात सर्वाधिक टीका झाली होती ती कप्तान अझहरुद्दीनवर. कारण या मॅचमध्ये तो एक रनही न काढता तीन बॉल्स खेळून आऊट झाला होता. काहींनी या १९९६ च्या वर्ल्डकपची सेमीफायनल मध्ये अझहरने फिक्सिंग केल्याचे आरोप देखील केले होते. एकेकाळी भारतीय क्रिकेट टीमचा तारणहार समजला जाणारा अझहर टिकाकरांचे लक्ष्य बनला होता.

१९९६ च्या वर्ल्डकप पूर्वी त्याच्या संगीता बिजलानी आली होती. त्यामुळे तो खेळापेक्षा अधिक तिच्याकडे लक्ष देऊ लागला होता. याचाच असर त्याच्या खेळण्यावर दिसून येऊ लागला. आणि वर्ल्डकप मध्ये त्याच्याकडून अत्यंत सुमार कामगिरी झाली. तेव्हा अनेकांनी संगीता बिजलानी त्याच्या जीवनात आल्याने त्याची कामगिरी ढासळली म्हणत तिच्यावरही टीका केली होती.

मार्च मध्ये वर्ल्डकप संपला. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर भारताची टीम इंग्लड दौऱ्यावर गेली होती. तीन टेस्ट ही सिरीज होती. पहिल्याच टेस्ट मध्ये यजमानांनी ८ विकेट्सने भारताचा दणकून पराभव केला. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये काय झालं कुणास ठाऊक, भारताचा आघाडीचा फलंदाज सिद्धूने कुणालाही काहीच न सांगता थेट भारत गाठलं. काय झाले म्हणून बीसीसीआयने अनेकदा सिद्धूशी संपर्क साधाण्याचा प्रयत्न केला पण सिद्धू काय केल्या असे अचानकपणे परतण्याच कारण सांगायला तयार नव्हता.

या किस्स्याचे बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनी ‛आय वाज देअर – मेमोरीज ऑफ अ क्रिकेट अडमिनिस्टर’ आपल्या आत्मचरित्रात मोठे मजेदार वर्णन केले आहे.

ते सांगतात की, या घटनेबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबईत एक स्पेशल किमिटीची मीटिंग घेतली होती. यात तत्कालीन बीसीसीआयचे अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर, आयएस बिंद्रा, माजी कर्णधार सुनील गावस्कर, मी आणि सिद्धू असे पाचच जण होतो. आम्ही सिद्धूला परत येण्याचे कारण विचारण्यासाठी हरेक प्रकारे प्रयत्न केला पण तो एकाने शब्दाने काही बोलला नाही.

त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावरून परत आली. तेव्हा मॅनेजर नागराज, कॅप्टन अझहर आणि बाकी टीम मेंबर्सना सिद्धूच्या अशा वागण्याबद्दल विचारले असता त्यांनाही ठाऊक नव्हतं सिद्धूला नेमक काय झालेलं.

त्यानंतर लेले यांनी विचार केला की, एखाद्या पंजाबी बोलता येणाऱ्याची मदत घ्यावी जेणेकरून त्याच्याशी बोलतांना सिद्धूला आपुलकी जाणवेल आणि तो त्याच्याजवळ मन मोकळे करेल. तेव्हा ही जबाबदारी जेष्ठ खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांच्यावर सोपण्यात आली.

दिल्लीतील ताज पॅलेस मधील एका हॉटेल मध्ये पुन्हा एक मीटिंग घेण्यात आली. मीटिंग चालू असताना ठरल्याप्रमाणे राजसिंग यांनी थोडा वेळ ब्रेक घेऊ म्हणून म्हणत मोहिंदर यांना इशारा केला. तेवढ्यात सिद्धू आपल्या जागेवरून उठून बाहेर गेला त्याच्या मागोमाग मोहिंदरही गेला. मोहिंदरने त्याचा हात पकडून सहानुभूती देत बोलायला बोलायला लागला. आता सिद्धूला राहवलं नाही आणि तो सांगू लागला,

“सिरीज के पेहले तो सब ठीक था. जब भी सुबह अझरूद्दीन मुझे मिलता तब हंस कर गुड मॉर्निंग केहता.”

मोहिंदर म्हणाला,

“फिर क्या गल है? ये तो अच्छी बात है.”

सिद्धू म्हणाला,

“अच्छी बात कहां पाजी? वो गुड मॉर्निंग तो केहता था मगर उसके बाद गंदी गंदी गालिया देता था. जब भी मिलते बार बार उसकी गालियां सुननी पड़तीं. मेरे बरदाश्त के बाहर हो गया था. “

यावर मोहिंदर अमरनाथचा काय विश्वास बसेना.  त्यानं विचारलं काय शिव्या दिल्या जरा सांग तर. त्यावर सिद्धू बोलला ‛माँ के..’

बस एवढं ऐकून मोहिंदरला हसू आवरलं नाही अन तोमोक्कार हसायला लागला. त्याचं अस हसणं बघून सिद्धू जरा बिचकला, त्याला वाटलं आपण काहीतरी चुकीचं तर नाही ना बोललो. तेव्हा मोहिंदर हसू आवरत त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणला,

“अरे ‛माँ के..’ ही आपल्याकडे उत्तर भारतात जरी शिवी असली तरी हैद्राबाद कडच्या तो शब्द आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी व्यक्त करण्यासाठी वापरतात. इतकंच काय तर तिथल्या आया-बाया पण तो शब्द अगदी बिनधास्तपणे बोलतात. त्याचा अर्थ होतो ‛माँ के प्यारे बच्चे’.”

आता हे किती खरंय ते एखादा हैद्राबादीच सांगू शकतो. का मोहिंदरने सिद्धूला मनवायला शब्दाची फिरकी घेतली हे ही सांगता येत नाही. ते काहीही असो पण सिद्धूला मनवण्यात यश आलं होतं. त्याची आणि अझरूद्दीनची दोस्ती त्यांनंतर आजही टिकून आहे.

हे झालं सिद्धूचं. पण यात गांगुलीचा काय संबंध?

तर झालं असं की गांगुलीसुद्धा त्या सिरीजसाठी निवडला गेला होता पण प्लेयिंग इलेव्हन मध्ये त्याला चान्सचं मिळत नव्हता. यापूर्वी १९९२ मध्ये असाच राखीव म्हणून दौरा करून परत आला होता आणि त्याला परत खेळवल नव्हत. गांगुलीसाठी हा दौरा म्हणजे शेवटचा चान्स होता.

अझहर शिव्या देतो म्हणून रागाच्या भरात सिद्धू सिरीज अर्ध्यात टाकून भारतात परत आला खरा पण त्याच्या जागी संधी मिळाली सौरव गांगुलीला. तेही थेट लॉर्डस टेस्टमध्ये. गांगुलीने देखील या सुवर्णसंधीचा फायदा उठवला आणि आपल्या पहिल्याच कसोटीत शतक मारल. आपली टीममधली जागा कायमची पक्की केली. याच सामन्यात द्रविडने देखील पदार्पण केलं होतं. त्याच शतक मात्र थोडक्यात हुकल होतं. या मचने या दोघांचही आयुष्य बदलून टाकलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.