अझहर आणि कांबळीच्या चैनीचे किस्से..

हौसेला मोल नाही असं कुठले तरी संतमहंत म्हणून गेलेत. आणि जर तुम्ही फॉर्मात असलेले क्रिकेटर असाल तर मग हौसच हौस आणि चैनीच चैनी. आजकाल आयपीएल नंतर भारतीय क्रिकेटमध्ये दारूसारखा पैसा वाहतो. हार्दिक पांड्या, विराट कोहली सारखे कार्यकर्ते ग्राउंडवर मेहनत करून पैसे कमवतात आणि ग्राउंडबाहेर व्यवस्थित एन्जॉय पण करतात.
पण गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली.

तेव्हा नुकताच क्रिकेटमध्ये पैसा आला होता. प्लेयर्सचे जर्सी रंगीत झाले होते, त्यावर वेगवेगळ्या जाहिराती सुद्धा रंगत होत्या. याशिवाय केबलवाली कलर टीव्ही प्रत्येक घरात पोहचलेली. मग त्यावर झळकणाऱ्या पेप्सी कोकच्या जाहिरातीतून हे सुपरस्टार क्रिकेटर्स सुद्धा रग्गड पैसा कमवत होते. असेच काही किस्से जेष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांनी सांगितले आहेत.

आता कोणाला कशाची आवड असेल सांगता येत नाही. भारताचा कप्तान अझरूद्दीनला आपले ब्रँडेड कपडे मिरवण्याचा शौक होता.  त्याकाळात मोठे मोठे ब्रँड भारतात मिळायचे नाहीत. त्यासाठी फॉरेनची वारी करावी लागायची. बरेच खेळाडू आपल्या परदेशी दौऱ्यातून येताना शॉपिंगच्या बगा भरून यायचे. यात अझहर सगळ्यात आघाडीवर असायचा.

एकदा अझरूद्दीन माजी कसोटीपट्टू रमाकांत देसाई आणि संझगिरी वानखेडेवर गप्पा मारत बसले होते. रमाकांत देसाई यांना काही तरी लिहायचं होतं. ते पेन शोधत होते. तेवढ्यात अझहरने त्यांना आपल्या खिशाचा पेन काढून दिला.

तो पेन हातात आल्या आल्या देसाई चाट पडले. संपूर्ण सोन्याचा असा तो पेन होता. अगदी निबही सोन्याची होती. वरून त्यावर एक हिरा मढवला होता. आपसूक देसाईंच्या तोंडून उद्गार बाहेर पडले,

“बढीया”

अझहर खुश झाला. तो त्यांना म्हणाला,

“रखलो”

लाखो रुपये किंमतीचा पेन अझरूद्दीन अगदी सहज त्यांना भेट म्हणून देत होता. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या संझगिरी आणि देसाई यांना चक्कर यायचीच बाकी राहिली असावी. अझहरला मोठ्या मोठ्या ब्रांडच्या वस्तू वापरायचा आणि मिरवायचा शौक होता. त्याहूनही आपला दिलदारपणा मिरवायची आणखी जास्त हौस होती.

ही झाली तेव्हाच्या कप्तानाची गोष्ट. पण शौक पाळण्यात आपला मराठमोळा विनोद कांबळी काही कमी नव्हता.

संझगिरी त्याच्या शॉपिंगच्या आवडीचा एक खूप गंमतीशीर किस्सा सांगतात. एकदा काय झालं एका परदेशी दौऱ्यावरून येताना विनोद कांबळीने साडेसहाशे डॉलर किंमतीचा कंबरेचा पट्टा विकत घेतला. त्याला सोन्याचं बक्कल होतं. आजच्या डॉलर आणि रुपयाचा हिशोब घातला तर जवळपास पन्नास हजार रुपये किंमत होईल. आजची महागाई वगैरे गणिते वेगळीच.

पट्ट्याचा ब्रँड होता व्हर्साची.

त्या काळात एवढ्या महागड्या किंमतीचा व्हर्साचीचा कंबरेचा पट्टा विकत घेणे हे फक्त अरब देशातल्या तेलवाल्या शेखांनाच परवडणार होतं.  या पट्ट्यावरून बाकीच्या प्लेयर्सनी विनोद कांबळीची भरपूर टांग खेचली होती.

काही दिवसांनी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. कुठल्यातरी वर्तमानपत्रातर्फे स्पर्धेच वार्तांकन करायला द्वारकानाथ संझगिरी सुद्धा आले होते.सकाळी ब्रेकफास्टला गेल्यावर त्यांना दिसल की अख्खा संघ विनोद कांबळीच सांत्वन करतोय. संझगिरीनां कळेना की नेमक काय झालं? त्यांनी कोणाला तरी विचारल तेव्हा तो खेळाडू म्हणाला,

“विनोदने ज्या कंपनीचा पट्टा घेतला होता त्या कंपनीचा मालक व्हर्साची गेला. म्हणून त्याचं सगळे सांत्वन करत आहेत.”

काही खेळाडुंच असंही म्हणन पडल की विनोदने सहाशे डॉलर किंमतीत तो पट्टा घेतला हा धक्का व्हर्साची ला सहन झाला नाही आणि त्यातच त्याच निधन झालं. अख्ख टीम या जोक वर खो खो हसत होती आणि विनोद बिचारा तोंड खाली घालून बसला होता.

काही वर्षांनी विनोदचा फॉर्म गेला. त्याचे अच्छे दिन गेले. इंटरनशनल टीम मधून त्याची गच्छन्ति झाली. त्याच्यावर खेळाला गंभीरपणे घेतला नसल्याचे आरोप झाले. टलेंट असूनही वाया गेला असं अजूनही सगळ्यांच कांबळीबद्दलच मत आहे. पुढे एकदा संझगिरीनी त्याला त्या पट्ट्याच काय झालं हे विचारलं. तो गंमतीने म्हणाला,

“देव्हार्यात ठेवलय. पूजा करतोय”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.