अणुहल्ल्या वर पुस्तक लिहिण्यासाठी यशवंतरावांनी लेखकाला थेट जपानला पाठवलं होतं..

आज मराठी भाषेचं इतर भाषांच्या मानाने वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रात असलेली समृद्ध साहित्य परंपरा. मराठी भाषेला आजवर अनेक महान लेखक कवी नाटककार लाभले. संत महात्म्यांनी केलेल्या अभंगांपासून ते महाकादंबऱ्यापर्यंत विविध पद्धतीचं साहित्य मराठीत बनलं. जागतिक दर्जाच्या कलाकृती देखील मराठी तयार झाल्या.

महाराष्ट्रातली ही साहित्य चळवळ रुजण्यामागे इथल्या राज्यकर्त्यांचा तितकाच सिंहाचा वाटा आहे. यातील एक प्रमुख नाव म्हणजे कै.यशवंतराव चव्हाण.

यशवंतराव चव्हाण हे स्वतः एक सिद्धहस्त लेखक होते. भाषेवर त्यांची जबरदस्त पकड होती. त्यांची भाषणे, त्यांनी लिहिलेली पुस्तके, आत्मचरित्र हे आजही विद्यापीठांमधून अभ्यासले जातात. स्वतः लेखक असल्यामुळे रसिकता आणि गुणग्राहकता त्यांच्यात भिनली होती. आपली राजकीय झूल बाजूला ठेवून मराठी साहित्य संमेलनाचा प्रेक्षकांमध्ये बसून आस्वाद घेणे हे फक्त त्यांनाच जमलं होतं.

अनेक साहित्यिकांशी त्यांच मित्रत्वाचं नातं होतं. यापैकीच एक नाव म्हणजे भा.द.खेर 

भालचंद्र दत्तात्रय खेर हे मूळचे नगर जिल्ह्यातील कर्जत इथले. कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी वकिलीचे शिक्षणही घेतले. वयाच्याअवघ्या बाविसाव्या वर्षी त्यांचा पहिला कथासंग्रह ‘नादलहरी’ प्रकाशित झाला. त्यानंतर, सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी सातत्याने लेखन केले. याच दरम्यान त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. 

‘केसरी’ मध्ये तेवीस वर्षे सहसंपादक होते, तर दहा वर्षे त्यांनी ‘सह्याद्री’चे संपादक पद भूषविले. ‘समग्र लोकमान्य टिळक’ सप्तखंड प्रकल्पाचे ही ते एक संपादक होते.

भा.द.खेर यांना दुसरं महायुद्ध व त्याच्याशी निगडित घटना प्रचंड आकर्षित करायच्या. विशेषतः जपानवर झालेला अणुहल्ला. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झालेला अणुहल्ला हि जगाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात क्रूर घटना मानली पाहिजे. खरं तर याच बॉम्ब हल्ल्यामुळे दुसरं महायुद्ध संपलं पण हिटलरच्या नरसंहाराला दोष देत सुरु झालेल्या युद्धाचा शेवट अमेरिकेने याच नरसंहाराने केला यात कोणतीही शंका नाही. 

मानवतेच्या इतिहासात काळा डाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरोशिमा हल्ल्यावर एक पुस्तक लिहावं हि भा.द.खेर यांची अगदी तरुण वयापासूनची इच्छा होती. त्यासाठी एकदा जपानला जाऊन यावं असं त्यांना वाटत होतं. पण जवळपास तीस वर्षे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नव्हती.

अशातच एकदा धाडस करून त्यांनी यशवंतराव चव्हाणांना पत्र पाठवायचं ठरवलं. यशवंतराव तेव्हा केंद्रात परराष्ट्रमंत्री होते. खेर सांगतात,

 २२ जून १९७५ रोजी मी यशवंतरावांना पत्र पाठवलं. माझ्या मनात होती ती सगळी भावना त्या पत्रात रिक्त केली. 

पण गंमत म्हणजे पुढे अनेक महिने यशवंतराव चव्हाणांनी त्यांना उत्तरच पाठवलं नाही. जपानला जाऊन हिरोशिमावर पुस्तक लिहिणं हे स्वप्नच राहणार असं समजत भा.द.खेर ते पत्र विसरून देखील गेले. 

अचानक साधारण डिसेंबर महिन्यात त्यांना परराष्ट्र खात्यातून तार आली. यशवंतरावांनी एका मराठी साहित्यिकाला एक पुस्तक लिहिण्यासाठी थेट जपानला पाठवायचं नियोजन केलं होतं. यशवंतराव म्हणतात,

” खेरांच्या २२ जूनच्या पत्राला मी गप्प राहिलो हि गोष्ट अगदी खरी आहे. पण मी गप्प का बसलो होतो? त्यांना जपानला पाठवणं हि माझ्यासाठी अगदी सोपी गोष्ट होती. पण तिथली कामगिरी पार पाडणं हि तितकीच अवघड गोष्ट होती. भा.द.खेर हि जबाबदारी पार पाडतील याची खात्री पटल्यावर मी त्यांना जपानला पाठवायचं ठरवलं.”

यशवंतराव चव्हाणांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधींपर्यंत जाऊन भा.द.खेर यांच्या जपान प्रवासाची बातमी घातली. इंदिरा गांधींनी देखील त्यांचं कौतुक करून हिरवा झेंडा दाखवला. 

भा.द.खेर चक्क जपानला गेले. तिथे हिरोशिमा मध्ये राहून त्यांनी तिथला अनुभव घेतला. लोकांशी बोलले, स्थानिक ग्रंथालयात राहून अभ्यास केला. त्यातूनच हिरोशिमा  ग्रंथ साकारला. 

प्रकाशन देखील खुद्द यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झाले. त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना देखील लिहिलेली आहे. यशवंतराव त्यात म्हणतात,

श्री. खेरांची ‘हिरोशिमा’ हिंदुस्थानच्या परराष्ट्र-धोरणाचे अत्यंत परिणामकारक रीत्या दिग्दर्शन करीत आहे, असे मला वाटते. या तर्हेची ही कादंबरी जगातील सर्व भाषांत गेली तर ज्यांच्या हातात निर्णयशक्ती आहे त्यांच्यावर जनमानसाचे दडपण येण्याची आशा आहे.

“निव्वळ कादंबरीकरिता कादंबरी-लेखन न करता, काही मानवी आदर्श डोळ्यांपुढे ठेवून करुणेच्या प्रेरणेने उद्युक्त होऊन, भा.द. खेरांनी हिरोशिमा कादंबरी लिहिली आहे. मला आशा आहे, मराठी वाचक या कादंबरीचे तितक्याच प्रेमाने स्वागत करतील.”

हे ही वाच भिडू. 

    

Leave A Reply

Your email address will not be published.