महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला सुरुवात दोघा केरळी माणसांमुळं झाली

भारतात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्यांची कमी नाही. काळा – जादू, नरबळी, भूतप्रेताशी संबंधित कित्येक घटना दररोज पाहायला मिळतात. या अंधश्रद्धेविरूद्ध अनेक संघटना देखील कार्यरत आहेत, एवढचं नाही तर महाराष्ट्रात यासाठी कायदा देखील तयार करण्यात आलाय. पण तरीही लोकं या गोष्टींना बळी पडतात.

महाराष्ट्रात नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली अंनिस या घटनांना आळा घालण्यासाठी मोठ्या स्तरावर काम करतेय. पण तुम्हाला माहितेय आपल्या राज्यात या अंधश्रद्धेविरूद्ध चळवळ सुरू करण्याचं काम एका केरळी माणसानं केलयं. 

ती व्यक्ती म्हणजे अब्राहम कोवूर, ज्यांनी १९६० च्या दशकापासून केरळमध्ये जी बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ सुरू केलेली होती, त्यापासून प्रेरणा घेऊन बी. प्रेमानंद यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी १९७५ पासून संघटितरीत्या कार्य केलं आणि पुढे महाराष्ट्रासह देशभर लहान-मोठ्या अनेक संघटना स्थापन होऊन अंधश्रद्धा, चमत्कार, बुवाबाजी याविरोधात कार्य करण्यासाठी त्या संघटना कटिबद्ध झाल्या.

भारतात बुद्धिप्रामाण्यवादी विचारांची परंपरा जुनी असली, तरी तिला चळवळीची जोड देण्याचं काम अब्राहम कोवूर यांनी १९६० व १९७० च्या दशकात केलं.

त्यांच्यानंतर बी. प्रेमानंद यांनी या चळवळीला व्यापक रूप देऊन देशभर प्रबोधन केलं. त्यातून बुद्धिप्रामाण्यवादी विचारांची बैठक असलेली अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ देशभर सुरू झाली. आधुनिक शिक्षणाला बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीची साथ लाभल्यामुळे देशात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली नवी पिढी तयार व्हायला मदत झाली.

अब्राहम कोवूर हे मूळचे केरळमधले, परंतु त्यांनी श्रीलंकेत प्राध्यापक म्हणून आयुष्य घालवलं. निवृत्तीनंतर त्यांनी सिलोन रॅशनॅलिस्ट असोसिएशन या संघटनेची स्थापना १९६० मध्ये केली. त्यानंतर त्यांनी भारतात शेकडो भाषणं करून अंधश्रद्धेविरुद्ध मोहोळ उठवलं. त्यांचा मुख्य भर बुवा-बाबा- महाराज यांच्या चमत्कारी कृत्यांचा बुरखा फाडण्यावर होता. १९७६ साली कोवूर सत्यसाईबाबांच्या आश्रमात गेले होते आणि त्यांनी त्यांना आव्हान दिलं. हे आव्हान अर्थातच सत्यसाईबाबांनी फेटाळून लावलं. कोवूरांनी १९६३ मध्येच दैवी चमत्कार करून दाखवणाऱ्यास १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

१९७८ मध्ये अब्राहम कोवूर यांचं निधन झाल्यानंतर १९७५ पासून सक्रिय असलेल्या बसव अर्थात बी. प्रेमानंद यांनी त्यांचं काम पूढे नेलं. कोवूर यांचे प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर होते, मात्र प्रेमानंद यांनी बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीला सार्वजनिक रूप दिलं.

प्रेमानंद हेही मूळचे केरळातलेच. त्यामुळे त्यांनी आपलं काम केरळ व तमिळनाडू या भागात वाढवलं. १९७६ मध्ये त्यांनीही कोवूर यांच्याप्रमाणेच सत्यसाईबाबांच्या दैवी चमत्कारांना आव्हान दिलं. १९८६ मध्ये ५०० कार्यकर्त्यांसह ते सत्यसाईबाबांच्या पूट्टप्थी आश्रमाकडे कूच करत असताना त्यांना अटकही झाली, पण त्यांचं प्रबोधनकार्य सुरू राहिलं.

प्रबोधनासाठी ठिकठिकाणी संघटनांची स्थापना दरम्यानच्या काळात बी. प्रेमानंद यांनी फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली आणि भारतातील खेड्याखेड्यात जाऊन प्रबोधन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रबोधनदौर्यामुळे भारतातील विविध प्रांतांत मोठी जागृती झाली आणि राज्याराज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संस्था-संघटना स्थापन होऊ लागल्या.

१९८३ मधील त्यांचा महाराष्ट्रदौरा खूप गाजला. त्यांच्या भाषणांना जिकडे-तिकडे प्रचंड गर्दी झाली. त्यातून महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेनेही दैवी चमत्कार करणाऱ्या बुवा-बाबांचे बुरखे फाडण्यात सुरुवात केली.

प्रा. श्याम मानव आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोन प्रमुख कार्यकर्त्यांनी नंतरच्या काळात महाराष्ट्र ढवळून काढला. भूत, भानामती, चेटूक, जादूटोणा,अंगात येणं वगैरे अनेक अपप्रकारांबाबत प्रबोधन करण्यासाठी गावोगावी समित्या स्थापन केल्या आणि गोरगरीब अशिक्षित जनतेला अंधश्रद्धांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कोवूर आणि प्रेमानंद यांच्याप्रमाणेच दैवी चमत्कार करून दाखवणाऱ्यांना १ लाख रुपये देण्याचे आव्हान दिलं.

महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा केला जावा.यासाठीही या संघटनेने व्यापक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील दूरवर पोहोचलेल्या चळवळीपैकी ही एक चळवळ ठरली.

महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमध्ये मेघराज मित्तर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ मध्ये तर्कशील सोसायटीची स्थापना झाली. या सोसायटीने धर्मातील अपप्रथा, जातीप्रथा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि चमत्कार यांच्याविरोधात प्रचार केला. सुमारे शंभर पंजाबी पुस्तकं आणि वीस हिंदी पुस्तकं प्रकाशित केली.‘ भूतबाधा झाली आहे’ असं सांगितलं जाणाऱ्या हजारो मनोरुग्णांवर उपचार करण्याचं कामही त्यांनी केलं.

पुढे या संघटनेने हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि जम्मू- काश्मीर वगैरे राज्यांतही आपला विस्तार केला. बिहारमध्येही १९८५ मध्ये डॉ. कंवलजीत यांनी बिहार बुद्धिवादी समाज या संघटनेची स्थापना केली. त्याशिवाय कर्नाटक, बंगाल वरगैरे प्रांतांतही रॅशनॅलिस्ट असोसिएशन्स स्थापन झाल्या.

बी. प्रेमानंद यांच्या भारतदौऱ्यामुळे सुरू झालेल्या या संघटनांमार्फत भारतातील अंधश्रद्धांच्या विरोधात लढाई छेडली गेली. या माध्यमातूनचं आज हजारो संस्था देशभरात अंधश्रद्धेविरूद्ध काम करत आहेत. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.