महाभारत बनवणाऱ्या चोप्रांची वारसदार नेपोटीजम मोडून टीव्ही शोमध्ये छोट मोठं काम करते ..

बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा फॅक्टर किती कामाचा असतो याचं महत्व फक्त त्याच लोकांना माहिती आहे ज्यांना खतरनाक स्ट्रगल करावा लागला तेव्हा कुठं एखादा पिच्चर मिळाला आणि दुसरे ते ज्यांना विशेष मेहनत न करताही सिनेमे मिळत गेले. पण आजचा किस्सा जरा वेगळाय कारण इथं घरचे सिनेमाशी संबंधित असूनही या अभिनेत्रीने वेगळी वाट धरून सक्सेसफुल होऊन दाखवलं.

रोशनी चोप्रा

रोशनी चोप्राला आपण बऱ्याच टीव्ही सिरीयल, रियालिटी शो अशा अनेक कार्यक्रमांमध्ये बघितलं असेल. पण रोशनी चोप्राला घरून असलेला सपोर्ट तिने नाकारून स्वतः च्या हिमतीवर काम मिळवून नाव मिळवलं. आता जरा सविस्तरपणे हा काय विषय आहे जाणून घेऊया.

चोप्रा आडनावावरून तरी कल्पना आलीच असेल कि फॅमिली हि बॉलिवूडशी निगडित आहे. तर रोशनी चोप्राचे आजोबा बी.आर. चोप्रा हे नाव सगळ्यांनाच माहिती असेल ज्यांनी भारतातली सगळ्यात मोठी टीव्ही सिरीयल म्हणजे महाभारत बनवलं. बी.आर. चोप्रा हे बॉलिवूडमधले सगळ्यात महत्वाचे फिल्म मेकर आणि डायरेक्टर- प्रोड्युसर होते. सिनेमे आणि टीव्ही सिरीयल्समध्ये त्यांचा दबदबा होता.

यश चोप्रा हे नाव सुद्धा त्यांच्या रोमँटिक सिनेमांसाठी प्रसिद्ध होते. ते रोशनी चोप्रा यांच्या आजोबांचे म्हणजे बी आर चोप्रांचे सख्खे बंधू. या नात्याने रोशनी चोप्रा ही यशराज बॅनरच्या आदित्य चोप्रा यांची पुतणी. इतकं मोठं फॅमिली बॅकग्राउंड असल्यामुळे ती त्यांच्याद्वारे सिनेमात येण्याची शक्यता होती पण बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापेक्षा छोट्या पडद्यावरून आपली चमक रोशनी चोप्राने दाखवून दिली.

इतकं चांगलं बॅकिंग असताना रोशनी चोप्राने स्वतःच करियर स्वतः घडवलं.

रोशनी चोप्राला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ती कसम से या मालिकेतून. त्यावेळी टीव्ही मालिका या सिनेमांपेक्षा जास्त पाहिल्या जायच्या.

कसम से या मालिकेतून रोशनी चोप्राने साकारलेली पिया हि भूमिका प्रचंड गाजली. तेव्हा या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या नजरेसमोर आली.

त्यानंतर क्रिकेटप्रेमी लोकं तर रोशनी चोप्राला विसरू शकत नाही कारण दूरदर्शनवर तेव्हा क्रिकेटच्या सामन्याआधी फोर्थ अंपायर लागायचं त्याचं होस्टिंगसुद्धा रोशनी चोप्रा करत असे. भारतातल्या सर्वोत्तम होस्ट लोकांपैकी रोशनी चोप्रा हि एक होती. तिने होस्ट केलेला अमेरिका गॉट टॅलेंटच्या धर्तीवर भारतात सुरु झालेल्या इंडिया’ज गॉट टॅलेंटची निवेदिका म्हणून सुद्धा ती लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

२००४ मध्ये तिला पहिला सिनेमा मिळाला तो होता लेट्स एन्जॉय, त्यानंतर भ्रम हाही सिनेमा आला पण ते फारसे यशस्वी ठरले नाही. त्यामुळे तिने पुन्हा मोर्चा टीव्ही शोजकडे वळवला. कॉमेडी सर्कस या सोनी टीव्ही वाहिनीच्या कार्यक्रमात तिने सहभाग ही नोंदवला आणि काही एपिसोडचं सूत्रसंचालनही केलं. 

छोट्या पडद्यावर जितके चॅनल्स आहेत त्या सगळ्या चॅनलवर रोशनी चोप्राने काम केलं आहे. सगळ्या वाहिन्यांसोबत तिने काम केलं आणि ते सगळे शो सुपरहिट झाले. पुढे तिने कलर्स वाहिनीच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल, सोनी टीव्हीची सिरीयल मौत का खेल आणि आहट या हॉरर शोजमधेही तिने काम केलं.

रोशनी चोप्रा हि एकमेव अभिनेत्री आहे जिने छोट्या पडद्यावरच्या सगळ्या शो आणि टीव्ही सिरियल्समध्ये काम केलेलं आहे.

विक्रम भट यांच्या फिर या सिनेमातही ती दिसून आली होती. पण बॉलिवूडमध्ये जादु तिला दाखवता आली नाही मात्र छोट्या पडद्यावर तिच्याइतकं सुपरहिट कोणी नव्हतं. चोप्रा फॅमिलीतून आलेली असतानाही तिने तिची वेगळी स्वतंत्र ओळख बनवली.

कसम से, चक दे बच्चे, इंडियाज गॉट टॅलेंट, अकबर बिरबल, नागीण, आहट, दिल जीतेगी देसी गर्ल अशा अनेक मालिकांमधून आणि विविध वाहिन्यांवर ती दिसत राहिली.   

एनडीटीव्ही इमॅजिन या रियालिटी शोची रोशनी चोप्रा हि विजेती होती. पण ती खऱ्या अर्थाने लक्षात राहिली ती कॉमेडी सर्कस आणि कसम से या मालिकांमधून. बी आर चोप्रा यांची नातं असूनही तिने घराणेशाहीचा आधार न घेता स्वतःला सिद्ध करून कामं मिळवली आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.