मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आणि निंबकरांनी शेळीची नवी जातंच तयार केली

बी. व्ही. निंबकर. एक प्रसिद्ध भारतीय कृषी शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते, ज्यांना पशुसंवर्धन आणि कृषी क्षेत्रात त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी ओळखलं जातं. जुन्या पिढीतील शेती, बियाणे आणि शेळ्या-मेंढ्यांच्या नव्या संकर जाती तयार करण्यामागचं त्यांच संशोधन अफलातून आहे.

त्यातल्यात्यात त्यांची बोअर शेळी ही  जगभरात फेमस.  दरम्यान, या शेळीवर संशोधन करण्यामागचा किस्साही तितकाच इंटरेस्टिंग आहे.

तर गोव्यात जन्मलेल्या बनबिहार विष्णू निंबकर यांचं संपूर्ण शिक्षण हे विदेशातलं. पेनसिल्व्हेनियातल्या जॉर्ज स्कुलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या अॅरिझोना युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स डिग्री घेतली.  ज्यांनंतर ते भारतात परतले.

 त्यांची जन्मभूमी जरी गोवा असलं तरी त्यांनी आपल्या शेतीविषयक संशोधनासाठी महाराष्ट्रातल्या फलटणची निवड केली. १९५६ मध्ये त्यांनी तिथं शेतीवर, शेतीसाठी उपयुक्त बियाणांवर काम करायला सुरुवात केली. 

शेतीसाठी उपयुक्त शेत बियाणांवर संशोधन केल्यांनतर त्यांनी ‘निंबकर सीड्स’ मार्केटमध्ये आणल्या. यासाठी रॉकफेलर फाउंडेशनने आर्थिक मदत केली.

त्यांच्या सगळ्या संशोधित बियाणांमध्ये कापूस बियाणांना चांगलीच प्रसिद्ध मिळाली.  

‘नारी’

त्यांनतर निंबकरांनी १९६८ साली फलटणमध्ये निंबकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. या इन्स्टिटयूटच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला शेती बियाणं आणि मेंढी पालन व्यवसायात भरीव काम केलं.

या दरम्यान संशोधन करत असताना त्यांनी बंगाल दौरा केला. तिथल्या सुंदरबनातील बूरूला या मेंढीच्या जातीची जनुक लोणंदच्या मेंढीच्या जनुकामध्ये रुजवली. ज्यामुळे ‘नारी सुवर्णा’ नावाची मेंढीची नवी जात निर्माण झाली. या मेंढीची खासियत म्हणजे ही मेंढी इतर जातीच्या मेंढीपेक्षा जास्त उंच असते आणि  दखनी मेंढीपेक्षाही तिची वाढ वेगाने होते. विशेष बाब म्हणजे तिला जुळं होण्याची शक्यता दुपटीने वाढते. 

मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून शेळीची नवीन जात निर्माण केली.

मेंढीच्या या संशोधनानंतर निंबकर आणि त्यांच्या कामाला महाराष्ट्रातच काय तर जगभरातून प्रसिद्धी मिळत होती. खरं तर, मेंढ्यांवर काम करणं हे निंबकरांचं स्वप्न असल्याचं म्हंटल जात. यावरून महाराष्ट्रात काय काम करता येईल हे ठरवायचं होत. 

दरम्यान,  १९९० साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी निंबकरांना म्हंटल कि, तुम्ही फक्त मेंढ्यांवर काम करू नका तर त्याबरोबर शेळ्यांचं देखील काम करा. त्यांनतर पवारांनी एका आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाच्या अध्यक्षपदी निंबकरांची निवड केली. 

निंबकरानी या आयोगाच्या अनुषंगानं काम करण्यासाठी खूप अभ्यास केला. यासाठी त्यांननी संपूर्ण भारतभर दौरा देखील केला. या दौऱ्यात त्यांनी देशभरात कुठल्या प्रकारच्या शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, यावर सगळं अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आलं कि, भारतात शेळ्या- मेंढ्यांवर फारच कमी काम झालंय.

हे लक्षात घेऊन त्यांनी विदेश दौरा केला. या दरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलीया, न्यूझीलंड, आफ्रिका इथल्या पशुपालनाचा अभ्यास  केला.  या अभ्यासात त्यांनी ठरवलं कि, भारतात बोअरची शेळीची जात आणायची, जी जगात सगळ्यात उत्कृष्ट वाढीचा दर असलेली शेळी आहे. 

निंबकरांनी या बोअर शेळीवर काम करायला सुरुवात केली.  जगात सगळ्यात जास्त वाढणारी बोअर ही शेळी मूळची दाक्षिक आफ्रिकेची.

बोअर हा मूळचा स्पॅनिश शब्द. ज्याचा स्पॅनिश भाषेत फार्म असा अर्थ होतो. म्हणजेच शेतीवर ठेवलेल्या शेळयांच्या अभ्यास करून त्याच्यातून निवड पद्धत करून तयार केलेली जात म्हणजे बोअर जात.

खरं तर या शेळीवर दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांनीच संशोधन केलं. त्यांनी बोअर ब्रीडर असोशिएशनची स्थापना करून जवळपास २५ वर्ष त्यांनी त्या शेळीचा रंग, वजन वाढीच्या दर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. आणि ही बोअर जातीच्या शेळीची निर्मिती केली. या शेळ्या सध्या संपूर्ण जगभरात आढळतात. 

निंबकरांच्या इन्स्टिट्यूटने या बोअर शेळीची जात आणण्यासाठी सुरुवातीला जिवंत जनावर आणायची असं ठरवलं होत. पण त्यावेळी जिवंत जनावर आणणं फार खर्चिक असल्याकारणाने इन्स्टिट्यूटने या शेळीचे गर्भ आणले. १९९२ साली  निंबकरांच्या इन्स्टिट्यूटने २० गोठवलेले गर्भ भारतात आणले.

त्यानंतर हे गर्भ टेस्ट ट्यूब प्रक्रियेच्या मदतीनं सिरोई जातीच्या शेळ्यांमध्ये हे गर्भ टाकले. ज्यांनंतर सुरुवातीला ८ बोअर जातीच्या पिलांचा जन्म झाला. आणि या ८ पिलांच्या मदतीनेच सध्याचा हा कळप उभा राहिलाय.

आज सगळ्या भारतात ह्या बोअर जातीच्या शेळ्या आढळतात. या शेळ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या उत्पनातही मोठया प्रमाणात वाढ झालीये.

निंबकरांच्या या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना २००६ मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलंय. त्यांच्या संस्थेलाही २००९ मध्ये जागतिक शाश्वत संशोधन पुरस्कार देण्यात आला होता.  त्यांनतर २०१६ मध्येही जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आलाय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.