सत्यशोधक बाबा आढाव यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त बोल भिडूने घेतलेली मुलाखत

‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, कष्टकरी, माथाडी कामगार, श्रमिकांचे नेते सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांनी आज वयाची ९१ वर्षे पूर्ण केली. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेले बाबा विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे सच्चे अनुयायी आहेत. बाबांशी चर्चा करताना विषय कुठला ही असो त्यात महात्मा फुलेंचा विषय निघाला नाही तर नवलच. तरुणांशी संवाद करायला बाबांना खुप आवडतं. तरुणांच्या मनात काय चालु आहे याचा योग्य रीतीने बाबा ठाव घेतात व परत त्यांच्या मिश्किल स्वभावात म्हणतात की,

“अरे तुमच्या सारख्या तरुणांनी आमच्या सारख्या म्हाताऱ्यांकडे आल नाही पाहिजे. तुम्हीच दिशा ठरवून कार्य केल पाहिजे. हा देश तुमच्या विचारांवर चालतो.”

असाच एक योग आला सत्यशोधक चळवळीच्या माझ्या मित्रानी मला बाबांसोबत ओळख करुन दिली. तो म्हंटला बाबांना तुझ्याशी बोलायला आवडेल. आणि तसेच झाल बाबांशी गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांच रूपांतर मुलाखतीमध्ये झालं. बाबा म्हंटले विचार तुला काय विचारायचंय ते मी तुला सांगतो. आता बाबंसारख्या डोंगराएवढ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला प्रश्न विचारायचे म्हणजे, तरीपण हिंमत केली आणि बाबांना काही प्रश्न विचारले. खाली आपण ते सविस्तर पाहु.

कपिल जाधव :  आजचे राजकारण व तरुण याबद्दल काय सांगाल ?

बाबा आढाव : आजचे राजकारण दिशाहीन झालेले आहे. देशाचे चित्र, देशाचे भविष्यात घडवायचे चित्र त्याची स्पष्टता तरुण पिढीच्या पुढे नाही. तरुणांना हेच कळत नाही की आपलं पुढे काय होणार आहे.ज्या देशात असं चित्र असतं त्या देशातल्या राजकारणात बालिश प्रकार चालू होतात. त्याचं कारण असं की, जे महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे बेरोजगारी आहे, महागाई आहे, टंचाई आहे, वाढती गुन्हेगारी आहे, उपासमार आहे, हे सर्व विषय असताना त्यावर भाष्य न करता एकमेकांना बोचकारे काढण्याच्या पलीकडे आपल्या राजकारणात दुसरं सध्या काही चालु नाही.

कपिल जाधव : आजघडीच्या भारतीय व्यवस्थेबद्दल काय सांगाल ?

बाबा आढाव : आपल्या देशाने मुक्त अर्थव्यवस्थेचा सिद्धांत स्वीकारलेला आहे. तुम्ही समाजवाद सुद्धा मान्य केलेला आहे. समाजवादी स्वरूपाचा भारत निर्माण करायचा काँग्रेसने ठरवलं. आज माझा प्रश्‍न सर्व पक्षांना असा आहे की, तुम्ही मुक्त अर्थव्यवस्थेचा सिद्धांत मान्य केला आहे. जर तुम्ही मान्य केला आहे तर तुम्ही समाजवाद्यांच काय करणार आहात ? संविधानाने जो भारत सांगितला आहे तशी या देशाची जडणघडण होत आहे का ? नीट ऐक कपिल मी काय सांगतोय ते,

“भारतीय संविधानामध्ये ज्या पद्धतीचा भारत घडविण्याचा संकल्प केलेला आहे. आणि साऱ्या दुनियेला जो शब्द दिला आहे की उद्याचा भारत कसा असेल तो संकल्प राजकारण्यांना पुरा करता येत नाहीये. त्यामुळे भारतीय व्यवस्थेची ओढाताण सुरू आहे. या देशाने लोकशाही मान्य केलेली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे सर्व मान्य केलेल आहे. तुम्ही धर्मनिरपेक्षता मान्य करायची आणि हिंदुत्व पुढे कसे जाईल हे पाहायचं. म्हणजे घटनेची मोडतोड तुम्ही करताय.”

कपिल जाधव : बाबा जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्या देशाने लोकशाही व धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे. पण आज आपला देश कट्टरवादाकडे झुकला आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणे आहे. ?

बाबा आढाव : अगदी योग्य प्रश्न विचारला आहेस तु. त्याला कारण असे आहे की, ज्या देशात देशाच्या जडणघडणीवर लोकांची मने घडविण्याचे काम मुल्य संस्करापासून केले पाहिजे ते होत नाहीये. सनातनी वर्गाने आजही स्त्री पुरुष समानता मान्य केकेली नाही. पण देशाने ती मान्य केली आहे. म्हणजे संविधानाची मूल्य रुजवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. संविधानाच्या मूल्यावर आपापला धर्म टिकवण्याचा जो प्रयत्न सगळ्यांचा चाललाय हे थांबले पाहिजे. नवा भारत घडविण्यासाठी आवश्यक तत्वज्ञान संविधानाने स्वीकारले लोकशाही समाजवादाच. त्याच्याबद्दलची बांधिलकी आजचे राजकीय पक्ष जपत नाहीत. आणि आपण विज्ञानाची उपासना न केल्यामुळे अंधश्रद्धेचे व जुनाट विचारसरणीचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर त्याला फार निर्धार लागेल.

कपिल जाधव : सर्व शालेय व कॉलेज शिक्षण संविधान शिकवले गेले पाहिजेत ?

बाबा आढाव : संविधान शिकवले नाही तर संविधान रुजवले पाहिजे. संविधानातील मूल्य रुजवले गेली पाहिजे. अरे झाड टिकवायचं असेल तर आपण बाजूचा वसवा काढून टाकतो. तसेच ही झाडं टिकवायची असतील तर आजूबाजूच्या सनातनी विचारांचा, जुनाट विचारसरणीचा व अंधश्रद्धेचा वसवा काढायला लागेल तेव्हा ती मुल्य रुजतील. जोपर्यंत संविधानातला भारत घडविण्याची शपथ प्रत्येक राजकीय पक्ष घेत नाही तोपर्यंत अवघड आहे. म्हणजे शपथ घेताना सुद्धा तुम्ही गीतेची घ्यायची, कुराणाची घ्यायची, असं का रे बाबा ? तुम्ही संविधान मान्य केलं ना ? संविधानाच्या आधिकारात निवडून आलात ना ? मग असं का म्हणत नाही की, मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो. पण तुम्ही तुमच्या धर्माची शपथ घेता. हे चित्र बदललं पाहिजे.

कपिल जाधव : आज महापुरुष सांगण्यात आपण कमी पडतोय..?

बाबा आढाव : सगळे शिवाजी महाराज शिकवतात, संभाजी महाराज शिकवतात. आजचे राजकीय नेते शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्यापाशीच आपल्याला थांबून ठेवतात. पुढचा इतिहास का गाळतात ते ? संभाजी महाराजांनंतर तीनशे वर्षाचा खूप मोठा इतिहास आहे जो सावित्रीबाई फुले व बाबासाहेबांपर्यंत येऊन पोहोचतो. या इतिहासाचा काय ?माझं सरळ वाक्य असे आहे की, शिवाजी महाराजांनी आम्हाला लढायला तलवार दिली ती आम्हाला मान्य आहे. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंनी आम्हाला हातात लेखणी दीली व बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. हे आम्हाला मिळालं पण तलवारी पासून ते मतदानापर्यंतचा जो इतिहास आहे त्याबद्दल बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे ते शिकवलं पाहिजे. नुसतं इतिहासात रमून चालणार नाही. आज काल इतिहासाबद्दल दांभिकपणा खूप वाढलेला आहे. ज्या दांभिकतेचा विरोध महात्मा फुलेंनी आयुष्यभर केला. तेच दांभिक लोक आज महात्मा फुले यांच्या आजूबाजूला आहेत. तेच लोक आज महात्मा फुले यांना आपला आदर्श मानतात.

कपिल जाधव : बाबा शेवटचा प्रश्न विचारतो आजच्या कोरोना परिस्थितीबद्दल काय सांगाल ?

बाबा आढाव : कोरोना बद्दल मी एवढेच सांगेल की, आपण न स्वीकारलेलं विज्ञान हे याचं कारण आहे. मी परत एकदा सांगेल की, आपण विज्ञानाची उपासना न केल्यामुळे आजही आपल्याला परदेशातून संगणक आणावा लागतो. आम्ही तो आजही निर्माण करू शकत नाही. हे चित्र बदलण्यासाठी खूप मोठ्या निर्धाराची गरज आहे.

बाबांशी अजून खूप काही बोलायचे होते. पण बाबांच्या वयाची मर्यादा लक्षात घेता जास्त बोलणे टाळले. आजही बाबांच्या आवाजात ती स्पष्टता व मधुरता आहे. आजही बाबा आपल्या बोलण्यातून समोरच्याला तासंतास आपलस करुन ठेवतात. वयाची नव्वदी पार केली असली तरी बाबांचा नित्यक्रम चुकलेला नाही. बाबा आजही विविध चळवळीत, आंदोलनात तसेच विविध व्याख्यानमालेत सहभागी होतात. कष्टकऱ्यांच्या या लाडक्या बाबांस दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या जन्मदिनी सदिच्छा.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.