जमीनदाराच्या बिघडलेल्या मुलाचा अभयसाधक बाबा आमटे बनला.

२६ डिसेंबर १९१४ खानदानी जमीनदार देविदास आमटेच्या घरी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवण्यात आलं मुरलीधर पण सगळे लाडाने बाबाच म्हणायचे.

बाबा घरातला पहिला मुलगा असल्यामुळे अति लाडात वाढला होता. वडील ब्रिटीश सरकारमध्ये मोठे अधिकारी होते. घरची साडेचारशे एकर शेती. प्रचंड पैसा अडका यामुळे राहणीमान अगदी एका राजासारख. पण पोरगा अगदी हूड होता.

लहानपणीच्या लाडाने बाबा अगदी बंडखोर बनले होते. त्यांचे सगळे शौक रांगडे होते.

अगदी छोट्या वयात त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली होती. मल्लखांब कुस्ती करणाऱ्या या छोट्या जमीनदाराला लोक कौतुकाने छोटा बजरंग म्हणायचे. गावतल्या जत्रेत एकदा त्यांनी आपल्या पेक्षा मोठ्या पहिलवानाला हरवल्यावर मिळालेलं चांदीच पदक उघड्या छातीवर टोचून घेतलं होत.

त्याचं असं हे रानटी वागण, आपल्यापेक्षा खालच्या पायरीच्या लोकांच्यात मिसळण त्याच्या वडीलांना आवडायचं नाही. पण बाबा आपल्या वडीलांना पण घाबरायचे नाही.

वयाच्या तेराव्या वर्षी त्यांना बंदुक मिळाली होती. तेव्हा त्यांनी रानडुकराची शिकार केली होती.

कॉलेजमध्ये गेल्यावर तर बाबाच्या शौकीनपणावर धरबंधच उरला नाही. उंची कपडे, उंची मद्य याची त्यांना आवड होती. याकाळात ते कार रेसिंग करायचे. त्यांनी स्वतःची सिंगर स्पोर्ट्स कार घेतली होती. त्या कारच्या कुशनवर बिबट्याची कातडी अंथरली होती. एकदा तर फक्त  मुमताज नावाच्या पॉप गायिकेचं गाण ऐकायसाठी ते ८०० किमी स्वतः गाडी चालवत गेले.

असा हा जमीनदाराचा बिघडलेला मुलगा. याच काळात त्याची मैत्री हिंदुस्तान सोशालीस्ट रिपब्लिक आर्मीचे क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्याशी झाली. क्रांतीकारकांची शस्त्रे दडवणे, त्यांची गुप्त संदेश एकमेकांना पोहचवणे अशा छोट्या मोठ्या मदती ते करत असत.

ज्यावेळी भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स नावाच्या अधिकाऱ्याची हत्या केली तेव्हा भूमिगत झालेल्या राजगुरूला त्यांनी आपल्या घरात लपवले.

त्यांच्या वडिलाना जेव्हा हे कळले तेव्हा आपली नोकरी जाईल म्हणून  त्यांनी याचा विरोध केला. पण यावेळी बाबा आमटेची आई त्यांच्या मदतीला धावून आली. तिने आपल्या नवऱ्याला निक्षून सांगितलं,

“ब्रिटीश सरकारची चाकरी करणारे तुम्ही आमटे घराण्यातील पहिले आणि शेवटचे गुलाम असाल. “

बाबा आमटेंचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता. याच मार्गाने आपल्या देशाला स्वातंन्त्र्य मिळेल याची त्यांना खात्री होती. पण भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या फाशी नंतर हिंदुस्तान रिपब्लिक आर्मीचा कोणी नेता उरला नाही. चन्द्रशेखर आझाद यांनी पोलिसांना शरण न जाता स्वतःवर गोळी झाडून घेतली. अनेक क्रांतिकारकांची धरपकड झाली.क्रांतिकारी चळवळ निर्नायकी झाली.

अशातच बाबा आमटेंची ओळख गांधीवादाशी झाली.

त्यांच्या वरोरा गावाजवळच वर्ध्याला गांधीजीनी आपला सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली होती. बाबांना या कर्मयोग्याच्या कार्याचं आकर्षण वाटलं. त्यांच्या सारख्या वर्ध्याला वाऱ्या होऊ लागल्या. गांधीजींचं बोलन आणि आचरण यात अंतर नाही आहे हे त्यांना कळाल होत. गांधीजीच्या आश्रमात त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

वरोरयाच्या या ढाण्या वाघाचा सगळा रगेलपणा जाऊन त्याला गांधीजीनी माणसाळवला.

जमीनदारीची श्रीमंती टाकून अंगावर गांधीवादी खादी आली. अहिंसावादी आंदोलन करूनच स्वराज्य मिळवू हे बाबांना मान्य होते. चलेजाव चळवळीत तुरुंगवासही स्वीकारला पण वाघ मारणाऱ्या या शिकाऱ्यानं हातात शस्त्र उचललं नाही.

तरीही एकदा एका रेल्वेप्रवासात ब्रिटीश सोजीरानी एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर बाबा आमटे धावून गेले. नंतर आपल्या हातून हिंसा झाल्यामुळे गांधीजींची माफी मागितली. पण गांधीजी त्यांना म्हणाले,

” तुम्हने जो किया है वो ठीक ही किया है. इसे शुरोंकी अहिंसा केहते है. तुम सच मै अभयसाधक हो”

याच गांधीवादामुळे हा एकेकाळचा जमीनदार गावतला मैला उचलू लागला. अशाच एका पावसाळी संध्याकाळी त्यांना एकदा गटारीत पडलेला कुष्टरोगी दिसला. पण त्यांना त्याचा किळस वाटला. ते तिथून निघून आले पण नंतर त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. गांधीवाद हा आचरणात आणण्याची शिकवण त्यांना झोपू देईना. बाबांनी त्या कुष्टरोग्याला घरी आणल, त्याची सुश्रुषा केली पण त्याला ते वाचवू शकले नाहीत.

पण या घटनेने त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी पुढे समाजाने वाळीत टाकलेल्या या कुष्ठरोग्याच्या साठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतल. १५ ऑगस्ट १९४९ रोजी आनंदवन येथे पहिलं हॉस्पिटल बनवलं.

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.