इंग्रजाच्याही आधी एका बाबाने भारताला कॉफी प्यायला शिकवलं….

आपल्या रांगड्या चहाच कितीपण कौतुक करा प्रेमात पडलं की माणसं कॉफीकडे वळत्यात. मस्त रोमँटिक कॉफी शॉप, तिथले खास मग, तिथल्या कॉफीचा खास घमघमाट, हातात हात घालून बसलेली कपल्स बघितलं की आपल्याला पण जरा हायफाय झाल्या सारखं वाटतंय. पोरींना इम्प्रेस करायसाठी हू दे खर्च स्टारबक्स हाय घरचं हे ब्रीद वाक्य मनात घेऊन भिडू लोक पॉकेटमनी उडवत असत्यात.

व्हॅलेंटाईन वीक काहीही असू दे कॉफी डे कायमचा असतोय.

जगभरात कित्येकांचा दिवस सकाळच्या वाफाळत्या कॉफीने सुरु होतो. भारतात पण साऊथ वाली माणसं एक कप कापीशिवाय हलत नाहीत. म्हणूनच तिथं प्रोडक्शन पण भरपूर आहे. गंमत म्हणजे भारतात पिकणाऱ्या कॉफीपैकी ८० टक्के माल एक्स्पोर्ट केला जातो. युरोप, जर्मनी, रशिया, अमेरिका इथे भारतीय कॉफी वर लोकांच्या उड्या पडतात. यातली तब्बल ३० % कॉफी तर एकटा इटली उडवतो.

आपल्या देशाला जगात मानाचं स्थान चहा-कॉफीच्या निर्यातीने मिळवून दिलंय हे नक्की.

पण अगदी लहानपणापासून चहा म्हणा किंवा कॉफी म्हणा हे इंग्रजांनी आणलेलं पेय आहे हे ऐकत आलोय. त्यातल्या त्या चहा आता पक्का इंडियन झालाय पण कोफी अजून जरा फॉरेनर वाटते. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या देशवासीयांनी राष्ट्रभक्तीच्या प्रेमात या दोन्ही पेयांना बॅन करून टाकलेलं.

असं असलं तरी एक सिक्रेट गोष्ट सांगू? कॉफी भारतात इंग्रजांनी आणलीच नाही. आपल्याला कॉफी प्यायला शिकवणारा माणूस भारतीयच होता.

नाव बाबा बुदान

गोष्ट आहे सोळाव्या शतकातली. उत्तर भारतात मुघलांचं राज्य होतं. व्यापारासाठी आलेले इंग्रज, पोर्तुगीज अजून बस्तान बसवत होते. दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांचा राडा सुरु होता. महाराष्ट्र मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली स्वराज्याच्या स्वाभिमानाची लढाई लढत होता.

बाबा बुदान जन्मले कर्नाटकात. चिकमंगळूर जिल्ह्यात. बाबा सुफी संप्रदायाचे.  प्रेम देणे आणि प्रेम वाटणे यावरच त्यांचा विश्वास. एकदा बाबांच्या मनात आलं की मक्केला जावं. भाकऱ्या गाठीशी बांधल्या आणि निघाला गडी हजारो किलोमीटरचा प्रवास करायला. गावातली लोक खुळ्यात काढली पण बाबा होते महा जिद्दी. मजलदरमजल करत, महिनोंमहिने प्रवास करत अरबी वाळवंटात वसलेल्या मक्केला जाऊन पोहचले.हजच दर्शन घेतलं.

बाबा धार्मिक होते पण बुद्धी चौकस होती. तिथं अरबस्थान मध्ये फिरताना त्यांना दिसलं की काही लोकं उकळत्या पाण्यात कसल्या तरी बिया टाकून ते पीत आहेत.

चौकशी केल्यावर कळलं की हि दारू नाही काही तरी वेगळंच पेय आहे. ते पिलं की माणूस ताजातवाना होतो. विशेषतः हज मधले धर्मगुरू याचे सेवन करत होते. इस्लाममध्ये दारूला पिण्यास परवानगी नाही पण हे ड्रिंक पिऊन लोक तासनतास  आणि कोणतीही नशा न चढता प्रार्थना करतात हे पाहून तिथल्या सुलतानांनी देखील त्याच्या सेवनास उत्तेजन दिलेलं.

इस्लाम धर्म जिथे जिथे गेला तिथे तिथे हे पेय देखील गेलं. 

ते ड्रिंक म्हणजे आपली कॉफी.

साधारण बाराव्या शतकात इथियोपिया येमेन वगैरे भागात तिचा शोध लागलेला. नैसर्गिक रित्या तिथे पिकणारी कॉफी व्यापारी डोकं असणाऱ्या अरबांनी सौदीमध्ये आणली. त्यांनी युरोपला ती विकण्यास सुरवात केली. कॉफी हे नाव डचांनी दिलं.

विसाव्या शतकात तेलाच्या बाबतीत गंडणारे अरब तेव्हा मात्र महा चाप्टर होते. त्यांनी कॉफीच्या बिजनेस मध्ये मोनोपॉली बनवलेली. कॉफीच्या मळ्यांना प्रचंड संरक्षण असायचं. तिथे कोणालाही घुसू दिले जायचे नाही. थेट भाजलेल्या बियाचं बाहेर यायच्या. युरोपियन लोक या कॉफीच्या सिक्रेटसाठी तडफडत होती पण उंटावर बसणाऱ्या या अरब शेखनि त्यांना कॉफीचा वास देखील लागू दिला नव्हता.

आपले बाबा बुदान मात्र अरबांच्या पेक्षा महा चाप्टर निघाले. सुफी संत माणूस असल्यामुळे त्यांची जास्त झडती वगैरे कोणी घेतली नाही. बाबांनी आपल्या झोळीत या बिया लपवल्या आणि थेट गावाकडं घेऊन आले.

असं म्हणतात की कर्नाटकातल्या चिकमंगळूरच्या डोंगरावर बाबा बुदान यांनी कॉफीच्या सात बिया पेरल्या. हि भारतातल्या कॉफी लागवडीची सुरवात होती. या सात बियांपासून तयार झालेल्या कॉफीने सर्वत्र हातपाय पसरण्यास सुरवात केली.

युरोपच्याही आधी कॉफीच सिक्रेट भारतीयांना सापडलं होतं.  

बघता बघता तो डोंगर कॉफीच्या मळ्यांनी भरून गेला. त्याला बाबा बुदान गिरी म्हणून ओळखलं जातं. आजही चिकमंगळूर भारताचे कॉफी कॅपिटल म्हणून ओळखले जाते.असं म्हणतात की बाबा बुदानच्या कॉफीने मुघल बादशाह जहांगीरला देखील वेडं केलं होतं. हीच कॉफी आज युरोप अमेरिकेला खुळी करते.

एक म्हातारा सुफी संत अरबस्थानमधून स्मगलिंग करून भारतात कॉफी आणतो काय आणि त्याच अरबांना मागे टाकून भारत जगाचा एक कॉफी सम्राट बनतो काय हे सगळंच एक आक्रीत आहे म्हणायचं..

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.