अब्दालीशी लढताना बाबा दीप सिंहाचं शीर तुटलं तरी तलवार चालत राहिली..

पंजाब ही रणधुरंधर लोकांची भूमी मानली जाते. पंजाबच्या भूमीत असे अनेक योद्धे आहेत ज्यांच्या शौर्याची गाथा आजही गायली जाते. 17 व्या शतकात पंजाबच्या शौर्यभूमीवर अशाच एका योध्याचा जन्म झाला ज्यांच नाव होतं बाबा दीप सिंग. हा योद्धा इतिहासात अजरामर झाला कारण रणभूमीवर शीर तुटलं तरी ते लढत होते. तुटलेलं शीर हातात घेऊन बाबा दीप सिंग यांनी अब्दालीशी लढा दिला होता. बाबा दीप सिंग यांच्या युद्धभूमीवरील शौर्याने अफगाणसुद्धा गांगरून गेले होते. बाबा दीप सिंग यांच्या नावानेच दुष्मन चळाचळा कापत असे.

17 व्या शतकातली ही गोष्ट. अमृतसरच्या पहुविंड भागात आपल्या शेतकरी परिवारासोबत भगतु भाई राहत होते. घरदार संपन्न होतं पण एका संतानाची कमी होती. एका महात्म्याच्या सांगण्यावरून त्यांना कळलं की त्यांना रक मुलगा होणार आहे आणि त्याचं नाव त्यांनी दीप ठेवावं. 26 जानेवारी 1682 रोजी बाबा दीप सिंह यांचा जन्म झाला. एकुलता एक असल्याने बाबा दीप सिंग मोठ्या लाडाकोडात वाढले.

जेव्हा दीप सिंह 12 वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे आईवडील त्यांना आनंदपूर साहिबला घेऊन गेले. तिथं गुरू गोविंदसिंग यांच्यासोबत त्यांची भेट झाली. या काळात बाबा दीप सिंग यांनी तिथं भरपूर सेवा केली. ज्यावेळी ते कुटुंबासोबत पुन्हा गावी जायला निघाले तेव्हा गुरू गोविंदसिंग यांनी बाबा दीप सिंग यांना तिथंच ठेवून घेतलं आणि त्यांच्या आईवडिलांना गावी पाठवून दिलं. आनंदपूर साहिबमध्ये गुरू गोविंदसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा दीप सिंग यांनी गुरू ग्रंथ साहिब याचं ज्ञान आत्मसात केलं. इथं त्यांनी बऱ्याच भाषा शिकल्या. गुरू गोविंदसिंग यांनी स्वतः बाबा दीप सिंग यांना घोडेस्वारी आणि हत्यारांचं प्रशिक्षण दिलं.

वयाच्या 18 व्या वर्षी बाबा दीप सिंग यांनी बैसाखीच्या पवित्र वेळी गुरू गोविंदसिंग यांच्या हातून अमृत सेवन केलं आणि शपथ घेतली. नंतर बाबा दीप सिंग हे गावी आले. एक दिवस गुरूंचा एक सेवक बाबा दीप सिंग यांच्याकडे आला. त्याने सांगितलं की गुरू गोविंदसिंग आनंदपूर साहिबचा किल्ला सोडून हिंदू पहाडीच्या राजांसोबत युद्धासाठी गेले आहे. हे ऐकताच ते तडक निघाले. बरच धुंडाळल्या नंतर तलवंडीच्या दमदमा साहिबमध्ये गुरूंसोबत त्यांची भेट झाली.

1755 मध्ये अहमदशाह अब्दालीचा आतंक वाढला होता. भारत लुटून त्याने बेचिराख करायचा सपाटा लावला होता. त्यामुळे बाबा दीप सिंग कळवळून उठायचे. बाबा दीप सिंग यांनी अब्दालीच्या गुप्त ठिकाणी जाऊन बंदी बनवलेल्या लोकांना सोडवलं आणि खजानासुद्धा लुटला. त्यामुळे अब्दाली चिडला आणि त्याने शपथ घेतली की सगळ्या शीख समुदायाची कत्तल करायची.

1757 मध्ये अब्दालीचा सेनापती जहाँ खान आपली फौज घेऊन हरिमंदिर साहिबची नासधूस करायला अमृतसरमध्ये येऊन पोहोचला. यात अनेक शीख सैनिक मारले गेले म्हणून तडक बाबा दीप सिंग तिथं येऊन पोहोचले. आपल्या सैन्याला त्यांनी अगोदर आदेश दिले की ज्या शिखांमध्ये आपलं शीर कापण्याचा गम नसेल तेच लोकं इथं लढू शकतील यामुळे सैनिकांमध्ये जोश आला.

13 नोव्हेंबर 1757 रोजी अब्दाली आणि बाबा दीप सिंह यांनी सेना समोरासमोर आली. 75 वर्षांचे बाबा दीप सिंह 15 किलो वजनाची तलवार घेऊन दुष्मनांवर तुटून पडले. अब्दालीचा सरदार जमाल खान आणि बाबा दीप सिंह यांच्यात घनघोर युद्ध झालं. दोघांनी त्वेषाने एकमेकांवर तलवार फिरवली आणि दोघांचं धड शिरावेगळ झालं. बाबा दीप सिंह यांचं शीर तुटलं पण शीर हातावर घेऊन ते तलवारीने लढत होते.

आपलं तुटलेलं शीर घेऊन आणि तलवारीने दुष्मन कापत हरीमंदिर साहिब मंदिरात ते पोहचले आणि आपलं शीर तिथं त्यांनी अर्पण केलं आणि प्राण त्यागला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.