अडचणीतल्या भाजपच्या मदतीला धावून आले ‘बाबा रामदेव’…!!!

 

२०१९ निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसलेली बघायला मिळतेय. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २०१९ सालातील निवडणुकांसाठी भाजपला समर्थन देण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाची सुरुवात केली असून या अभियानात त्यांना बाबा रामदेव यांची मदत होणार आहे. या यादीत अनेक नवीन सेलिब्रिटीजच्या नावाची भर पडण्याची देखील शक्यता आहे. कारण पुढच्या काळात भाजपकडून ही मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे.

२०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यानंतरच्या ४ वर्षांच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती या अभियानामार्फात लोकांपर्यंत पोहचविली जाणार आहे. त्यासाठी समाजातील ५० प्रतिष्ठित मान्यवरांशी संपर्क करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत अमित शहा यांनी आतापर्यंत माजी सैन्यप्रमुख दलबीर सिंह सुहाग, संविधान तज्ञ सुभाष कश्यप, भारतीय संघाचा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव आणि बाबा रामदेव यांची भेट घेतली असून त्यापैकी बाबा रामदेव यांनी भाजपला समर्थन देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती समोर येतेय. इतर मान्यवरांची भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही.

अमित शहा यांनी बाबा रामदेव यांची भेट घेऊन भाजपला समर्थन देण्याची विनंती केली. अमित शहांच्या या विनंतीचा स्वीकार करत बाबा रामदेव यांनी अमित शहा यांच्याबरोबर पत्रकारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले तसेच नरेंद्र मोदी यांच्याइतका मान-सन्मान देशाच्या इतर कुठल्याही पंतप्रधानांना मिळाला नसल्याचे सांगत त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. भारताच्या नवनिर्मितीत आपला आशीर्वाद पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असल्याचेही रामदेव बाबांनी  सांगितले.

ज्या ज्या लोकांनी २०१४ साली नरेंद्र मोदी आणि भाजप यांना समर्थन दिलं होतं, त्यांच्याकडे जाऊन आम्ही आमच्या कामाची माहिती त्यांना देत आहोत. रामदेव बाबांना भेटणं म्हणजे देशभरातील करोडो लोकांपर्यंत पोहोचणं, असं मला वाटतं.या भेटीत पुन्हा एकदा बाबा रामदेव यांनी आम्हाला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिली.

राष्ट्रीय स्तरावर राबविल्या जाणाऱ्या या अभियानच्या धरतीवर वेगवेगळ्या राज्यात देखील अशाच प्रकारची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी भाजपचे ५ हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते राबणार आहेत. हे कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन सरकारच्या कामाची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.