टिकैत यांच्या वडिलांमुळे तर पंतप्रधान राजीव गांधीना देखील गुडघ्यावर यावं लागलं होतं..

आज  पंतप्रधान मोदींनी आपले बहुचर्चित कृषी कायदे मागे घेतले. त्यांनी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना परत फिरण्याचे आवाहन केले आहे. पण गेले वर्षभर आंदोलनाला ठाण मांडून बसलेले शेतकरी नेते कायदा पूर्ण रद्द झाल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही असं म्हणत आहेत.

नरेंद्र मोदी यांची देशावर मजबूत पकड आहे असं म्हणतो. लोकसभेत त्यांचं स्पष्ट बहुमत आहे, भाजपचे जवळपास तीनशेच्यावर खासदार लोकसभेत आहेत. विरोधात असलेली काँग्रेस जवळपास मृतप्राय झाल्यात जमा आहे.

मोदींजींच्या मनात आले तर ते कोणताही कायदा सहज मंजूर करून आणू शकतात. मात्र एक काळ होता जेव्हा मोदी सोडा पण नेहरू इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही जास्त खासदार निवडून आणण्याचा पराक्रम राजीव गांधी यांनी घडवून आणला होता.

त्यांचे तब्बल ४०४ खासदार लोकसभेत होते. आजच्या मोदींच्यापेक्षाही १०० ने जास्त. याचाच अर्थ त्यांची किती ताकद होती याचा सहज अंदाज येतो. राजीव गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. विरोधक प्रभाव हीन झाले होते.

अशावेळी येतो तो अतिआत्मविश्वास राजीव गांधी यांच्यातही दिसू लागला होता.

१९८८ सालचा ऑक्टोबर महिना. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी जवळ आली होती. काँग्रेसतर्फे दिल्लीच्या बोट क्लबवर मोठा कार्यक्रम होणार होता. त्याची तयारी सुरू होती. मैदानाच्या भिंती रंगवणे वगैरे चालू होतं. पंतप्रधान आपल्या आईला अभिवादन करणार म्हणून एक मोठा स्टेज उभा करण्यात आला होता.

एक दिवस अचानक कुठून तरी शेतकरी आपल्या गाई म्हैशी घेऊन या मैदानात ठाण मांडून बसू लागले. बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. प्रशासनाचे डोके हलले. लाखोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीत घुसले होते.

त्यांना आणणारा नेता होता चौधरी महेंद्रसिंह टिकैत उर्फ बाबा टिकैत.

उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर येथील सिसौली गावात बाबा टिकैत यांचा जन्म झाला. सम्राट हर्षवर्धन यांचे त्यांना वंशज मानले जाते. त्यांचे वडील गावचे मुखीया होते. पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे अवघ्या आठ वर्ष वय असताना महेंद्रसिंह टिकैत यांच्यावर चौधरी पणाची जबाबदारी येऊन पडली.

बलियान खाप पंचायतचे ते प्रमुख बनले.

स्वातंत्र्यापूर्वीची ही गोष्ट. स्वातंत्र्यानंतर जसा जसा अनुभव येत गेला तसा खेडेगावात काळ्या मातीत उगवलेला हा तरुण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना वाचा फोडणारा नेता बनला.

ऐंशीच्या दशकात त्यांनी उत्तरप्रदेशच्या शेतकऱ्यांना एकत्र करून भारतीय किसान युनियनची स्थापना केली.

करमूखेड़ी या गावच्या वीजकेंद्रावर त्यांनी विजबिलावरून आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी झाले, शेतकऱ्यांना त्यांची ताकद लक्षात आली. वेगवेगळ्या गावात आपली प्रश्ने मांडण्यासाठी त्यांना बोलावून घेतलं जाऊ लागलं.

हुक्का गुडगुडी ओढणारा चौधरीपणाच्या अधिकारातून प्रसंगी प्रशासनाचं कान पकडणारा म्हातारा बाबा वेगानं फेमस होऊ लागला. आपल्या भाषेत बोलनारा, लोकांची नस पकडणारा हा नेता शेतकऱ्यांना आपलासा वाटू लागला.

पश्चिमी उत्तरप्रदेश मधल्या जाटांपासून ते हरियाणा पंजाब पर्यंत त्यांचा दमदार आवाज घुमू लागला.

१९८७ साली त्यांनी शेतीपंपाच्या विजबिलावरून पहिली किसान यात्रा सुरू केली. राजीव गांधी यांच्या सरकारची धोरणे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे असं त्यांचं मत होतं. मेरठ मध्ये त्यांनी केलेलं ४० दिवस केलेलं आंदोलन देशभर गाजलं.

पहिल्यांदा मेरठ मग यूपीची राजधानी लखनौ येथे आंदोलन झाले. तिथून बाबा टिकैत यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला. शेतकऱ्यांच्या ३५ मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या. राष्ट्रपतींना भेटून आपल्या आंदोलनाची कल्पना दिली.

पण बाबा टिकैत यांचे आंदोलन विक्राळ रूप घेईल हे सरकारला ठाऊक नव्हते.

वर सांगितल्याप्रमाणे युपी मधून शेतकरी मोठ्या संख्येने आपली गुरे, जनावरे, ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत येऊ लागले. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीची सभा होणार आहे त्या बोट क्लबवर आपला डेरा टाकू लागले.वाढती संख्या बघून सरकार हादरले.

दिल्लीत येणारे रस्ते बंद करण्यात आले. शेतकऱ्यांच्यावर लाठीहल्ला झाला, एकेठिकाणी तर गोळीबार देखील करण्यात आला. यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रसंगानंतर तर शेतकरी आणखी खवळले.

टिकैत यांच्या किसान मोर्चाची लाट देशभर पसरली.

२५ ऑक्टोबर १९८८ रोजी चौदा राज्यातून पाच लाख शेतकरी दिल्लीमध्ये आले होते. इंडिया गेट समोरील राजपथ त्यांच्या ताब्यात होते. जवळपास आठवडाभर दिल्ली ठप्प होती.

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी बोट क्लब रिकामा करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा लाठी हल्ला केला पण शेतकरी हलले नाहीत. बाबा म्हणाले,

किसान बदला नहीं लेता, वह सब सह जाता है, वह तो जीने का अधिकार भर चाहता है, पुलिस ने जो ज़ुल्म किया है, उससे किसानों का हौसला और बढ़ा है. प्रधानमंत्री ने दुश्मन सा व्यवहार किया है. किसानों की नाराजगी सरकार को सस्ती नहीं पड़ेगी.

राजीव गांधी यांची तुलना त्यांनी थेट नादिरशहा बरोबर केली. शेतकऱ्यांचे आंदोलन सरकारला प्रचंड महागात पडले. देशभर नाचक्की झाली. राजीव गांधी यांच्या लोकप्रियतेला आहोटी लागली आहे याचं हे प्रमुख लक्षण होत.

अखेर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसमोर गुडघे टेकले. त्यांच्या मागण्या मान्य केल्या. महेंद्रसिंह टिकत यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

पण तरीही राजीव गांधी यांना ३१ ऑक्टोबरची इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी धुमडाक्यात साजरी करता आली नाही. शेतकरी मोर्चामुळे काँग्रेसला रॅलीचा मार्ग बदलावा लागला, सभेचे ठिकाण देखील बदलावे लागले. आजवर शेतकऱ्यांच्या यशस्वी ठरलेल्या आंदोलनात या आंदोलनाचा उल्लेख केला जातो.

बाबा महेंद्रसिंह टिकैत यांना किसानो का मसिहा ही उपाधी मिळाली. ज्यांच्या हुक्क्याच्या गुडगुडीने सरकारे हलत होती त्या बाबा टिकैत यांची आठवण आज ३२ वर्षांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे काढली जात आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.