तालुक्याला वीज मिळावी म्हणून विधानसभा गॅलरीतुन उडी मारणारा देशाचा ऊर्जा राज्यमंत्री झाला..

८ जुलै १९६८. महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होतं. मुंबईत सध्या पोलीस मुख्यालय आहे तिथे त्यावेळी विधानसभा भरायची. नेहमीप्रमाणे गर्दी भरली होती. खाली विधानसभेत आमदार तर प्रेक्षक गॅलरीमध्ये पत्रकार, कार्यकर्ते दाटीवाटीने बसले होते. सत्ताधारी विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी सुरु होती.

चर्चा सुरु होत्या, मुख्यमंत्री कुठल्यातरी महत्वाच्या विषयावर बोलत होते.  अचानक प्रेक्षक गॅलरीतून कसलासा आवाज झाला. खाली बसलेल्या आमदारांवर पत्रकांचा वर्षाव होऊ लागला. जोरदार घोषणाबाजी सुरु होती. गॅलरीतून खाली उडी मारायचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पकडलं होतं.

थोड्याच वेळात मार्शल आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला उचलून बाहेर नेलं. कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये त्याची रवानगी करण्यात आली.

पंचवीस तीस वर्षाच्या लहान चणीच्या या तरुणाचं नाव होतं, बबनराव ढाकणे.

अहमनगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी तालुक्यात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. घरातून कोणताही राजकीय वारसा नव्हता. शिक्षणासाठी पाथर्डीच्या हिंद वसतिगृहात राहताना चळवळीत ओढले गेले. गोवा स्वातंत्र्यमुक्ती संग्रामात भाग घेण्यासाठी शाळा नववीत असताना सोडून दिली.

नानासाहेब गोरे, सेनापती बापट, शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली. पुढे राजकीय जीवनात उतरायचं ठरवलं आणि काँग्रेसच्या विचारांकडे ओढले गेले. १९५८ साली यशवंतराव चव्हाण भगवानगडावर आले होते. त्यावेळी बाळासाहेब भारदे, नि-हाळी यांनी या उत्साही कार्यकर्त्याचा त्यांच्याशी परिचय करुन दिला होता.

साठच्या दशकात ते काँग्रेसचे जिल्हापरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. राजकीय जीवनात काम करत असताना जनतेचे प्रश्न सोडवायचे असेल तर कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असायची. 

त्याकाळी राज्यभरात विद्युतीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. प्रत्येक खेडोपाडी वीज पोहचवली जात होती. फक्त अहमदनगर मध्ये पाथर्डी तालुका सोडून सर्वत्र विद्युतीकरण झालं होतं. स्वातंत्र्याला वीस वर्षे उलटून देखील पाथर्डी तालुका अंधारातच होता.

बबनराव ढाकणे यांनी तीन महिने सतत गावोगावी जाऊन सभा, संमेलन, मोर्चे, आंदोलने याचे आयोजन करून विजेची मागणी लावून धरली. पण तत्कालीन प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं. 

अखेर बबनराव ढाकणे यांनी भगत सिंग यांनी ज्याप्रमाणे जनतेचा आवाज पोहचवण्यासाठी संसदेत पत्रके फेकून सरकारच लक्ष वेधलं होतं त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात एखादी धाडसी कृती करून सरकारच लक्ष वेधून घ्यायचं ठरवलं.

त्यांनी प्लॅन केला, प्रेक्षकांच्या गॅलरीतून थेट विधानसभेत उडी मारायची.

त्यावेळी वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. कै. बाळासाहेब भारदे हे विधानसभेत अध्यक्ष होते. बबनराव ढाकणे यांची त्यांचंही ओळख होती. मुंबईला गेल्यावर ते भारदेंच्याच सरकारी बंगल्यावर उतरायचे. मुंबईला जाताना त्यांनी आपल्या मागण्यांची २०० पत्रके बनवली. नेहमी प्रमाणे भारदेंच्या बंगल्यावर उतरले आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेला आले.

वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी पत्रके फेकली आणि विधानसभेत उडी मारायचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकले.

त्याकाळी ही उडी प्रचंड गाजली. सगळ्या वर्तमान पत्रात हेडलाईनला बबनराव ढाकणे हेच होते. वसंतराव नाईक यांनी विधानसभेत विशेषाधिकारभंगाची सूचना मांडली आणि ढाकणे याना ७ दिवसाची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांनी ७ दिवसाच्या ऐवजी १ दिवसाची शिक्षा व्हावी अशी उपसूचना मांडली.

या विषयावर त्याकाळचे अभ्यासू आमदार रामकृष्ण म्हाळगी, दत्ता पाटील, बाबासाहेब खंजिरे, निहाल अहमद, जाम्बुवंन्तराव धोटे, कृष्णा देसाई, बॅरिस्टर अंतुले, बी.के.देशमुख अशा अनेकांनी भाषणे केली. बराच काळ उलटसुलट चर्चा झाली. पण अखेर ढाकणेंना ७ दिवसांचीच शिक्षा करायचं नक्की झालं.

सात दिवसांनी बबनराव ढाकणे जेलच्या बाहेर आले ते हिरो बनूनच. त्यांची ती धाडसी कृती राज्यभरात प्रचंड लोकप्रिय झाली होती.

काही दिवसांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बबनराव ढाकणे यांना वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावून घेतलं. त्यांची विचारपूस केली. पाथर्डीला नक्की विद्युतीकरण सुरु करू असं आश्वासन दिलं. एवढंच नाही तर लगेच संबंधित अधिकाऱ्यांना तिथूनच आदेश देखील दिले. ढाकणेंना वाटलं कि नेहमी प्रमाणे हे राजकीय घोषणा असेल. पण तस नव्हतं.

पुढच्या चार महिन्यात पाथर्डी तालुक्यातील विद्यतीकरणाच्या उदघाटनाला स्वतः मुख्यमंत्री हजर झाले.

त्यावेळी त्यांनी या दुष्काळी भागातील रस्ते, पाझर तलावांची कामे यांची जातीने पाहणी केली, विविध विकासकामांचा आढावा घेतला. अनेक कामाला नारळ फोडून सुरवात देखील केली. हे करताना हा तालुका आपला आहे कि विरोधकांचा याचा विचार केला नाही. एका तरुणाच्या साध्या उडीमुळे तालुक्याचं भाग्य बदलून गेलं.

पुढे बबनराव ढाकणे राजकारणात मोठमोठ्या पायऱ्या चढत गेले. आमदार झाले, जिथे स्टंट केला त्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. केंद्रात राज्यमंत्री बनण्याची देखील संधी त्यांना मिळाली. ते ही ऊर्जा खात्याचा. जनतादलाच राज्याचं नेतृत्व देखील त्यांनी सांभाळलं. आपली अनोखी आंदोलने आणि चळवळी यामुळे बबनराव ढाकणे हे नाव देशभरात गाजत राहीलं.

आज इतकी वर्षे झाली मात्र अजूनही राजकारणात त्यांची ओळख तालुक्यात वीज यावी म्हणून विधानसभेत उडी टाकणारा गडी म्हणून आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.