राजेश टोपेंना अपशब्द वापरणारे बबनराव लोणीकर नाय म्हणलं तरी चारपाचदा वादात घावलेत
राजकारणी म्हंटल कि अघळपघळ आणि वादग्रस्त बोलणं ओघानं आलच. त्यांचा तो स्वभाव असतो का आणि काय ह्याचा शोध अजून काही लागला नाही. मात्र अशा राजकारण्यांची लिस्ट मोठी असतीय भिडू. आणि याच लिस्टीत बबनराव लोणीकर येतात बरं का.
आता तुम्ही म्हणाल काय केलं त्यांनी ? तर भिडूंनो,
लोणीकर यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या मांडत आंदोलन केले. अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पिकविम्याची मदत मिळावी यासाठी हे आंदोलन सुरु होत. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ते म्हंटले,
टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का ? हरामखोर
मग काय.. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते झाले ना आक्रमक. असो तो विषय आपला नाही. आपण बबनराव लोणीकरांवर फोकस करूया. यापूर्वी ही लोणीकर यांची महिला अधिकाऱ्यांबद्दलची वक्तव्ये चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला हिरोईन, तर एका महिला तहसिलदारास हेमामालिनी म्हंटल होत.
बबनरावांचा जीवनपट एकदम सविस्तर बघूया.
बबनराव दत्तात्रय यादव-लोणीकर हे त्यांचं संपूर्ण नाव. ते ५७ वर्षाचे आहेत. जालना जिल्ह्यातील परतूर हा त्यांचा मतदारसंघ. परतूर तालुक्यातील लोणीमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे.
लोणीकरांच्या राजकारणाची सुरुवात पंचायत समितीपासून झाली. पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. नंतर १९९९ ते २००४ या कालावधीत ते विधानसभेचे सदस्य होते. २०१४ मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांची फडणवीस सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री म्हणून वर्णी लागली.
लोणीकरांनी आतापर्यंत पाच विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी तीन वेळा ते विजयी झाले आहेत. तर दोन वेळा त्यांचा पराभव झालाय.
वाद क्रमांक १ – आता त्यांच्या वादग्रस्त आयुष्याची सुरुवात त्यांच्या घरातूनच झालीय. म्हणजे दोन बायकांच्या वादात बबनरावांचं अवघड झालं ओ.
जेव्हा लोणीकर फडणवीस सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री होते तेव्हा त्यांच्या डिग्रीचा वाद मिटत नव्हता. आणि त्यात भर पडली दुसऱ्या वादाची. लोणीकरांना दोन बायका असताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे एकाच बायकोची माहिती का दिली ? असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला होता.
लोणीकरांच्या मतदारसंघातील मतदार यादीत मंदाकिनी आणि वंदना या दोन्ही बायकांची नावे आहेत. या दोघीही लोणीकरांच्या पत्नी असल्याचं नमूद करम्यात आलं असताना, लोणीकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र त्यांची पत्नी मंदाकिनी यांचंच नाव असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा आरोप केला होता. त्यामुळे लोणीकर चांगलेच अडचणीत आले होते.
वाद क्रमांक २ – पण बायकांच्या वादापेक्षा तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात हा वाद चांगलाच गाजला होता.
परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हंटले होते,
अधिवेशनाआधी शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. या मोर्चाला ५० हजार लोक यावेत. तुम्ही सांगा कुणाला आणायचं ? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील की सुधीर मुनगंटीवार यांना आणायचं ? तुम्हाला कोण वाटतंय ते सांगा, नाहीतर एखादी हिरोईन आणायची असंल तर हिरोईन पण आणू. जर कुणी हिरोईन नाहीच भेटली, तर तहसिलदार मॅडम आहेतच की.
हे प्रकरण त्यांच्या चांगलंच अंगलट आलं होत.
वाद क्रमांक ३ – लोणीकरांच्या पदवीवरूनही वाद सुरु झाला होता. त्यांची पदवी बनावट असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. परतुर येथील लालबहाद्दूर शात्री महाविद्यालयाच्या केंद्रावरून आपण बी. ए. प्रथम वर्षांची मुक्त विद्यापीठाची परीक्षा दिली. त्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या केंद्रावरून दुसऱ्या वर्षीची परीक्षा दिली. परंतु तेथे आपण उत्तीर्ण होऊ शकलो नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.
वाद क्रमांक ४ – लोणीकर पुन्हा एकदा चर्चेत आले होते ते त्यांच्या धमकीप्रकरणावरून.
त्यांनी परतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना फोनवरून धमकावले होते. ते म्हंटले होते,
आमचे शंभर आमदार आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन,
त्यांची ही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. या पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. त्यांनी ओमप्रकाश मोर नावाच्या व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकला होता. मोर हे प्रामाणिक व्यक्ति असतानाही त्यांच्या घरावर छापा टाकल्याने लोणीकर भडकले होते.
मोर प्रामाणिक माणूस आहे. ते साधा गुटखा सुद्धा खात नाही. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर धाड टाकताय, सापडलं का काही ? असा सवाल करतानाच साहेब, आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही ? तुम्ही काय रझाकारी लावली आहे का ? विधानसभेत उलटा टांगेन तुम्हा सगळ्यांना, आयपीएस अधिकारी झाला म्हणून लय मोठा झाला आहे का ? असं लोणीकर म्हंटले होते.
त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफीही मागितली होती.
त्यांचे वाद बरेच असतील भिडू लोग. पण आम्हाला घावलेत ते गाजलेले वाद. आणि काल राजेश टोपेंना अपशब्द वापरून त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलय ते म्हणजे,
आपण वादग्रस्त पण बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी आहोत.
हे ही वाच भिडू
- जसे सोनिया गांधींसाठी अहमद पटेल त्याप्रमाणे राहुल गांधींसाठी राजीव सातव महत्वाचे होते..
- फ्रेंच गव्हर्नरच्या डायरीतून दिसलेला साडेतीनशे वर्षांपूर्वीचा मराठवाडा
- प. महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडण्याचं खरं काम तर आफ्रिकेतून आलेल्या माशानं केलय