इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावरून केली.

प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक असामान्य प्रतिभावंत, कायदा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक शास्त्रांचे अभ्यासक.

अस्पृश्यता निवारणासाठी झटणारे महानायक, घटनाकर्ते, राजकारण, धर्मकारण, पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी बजवली असली तरी ते मूळचे थोर अर्थशास्त्रज्ञ.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातुन त्यांनी १९१५ साली अर्थशास्त्रातील एमए व १९१७ साली पीएचडी ही पदवी संपादन केली. यानंतर १९२१ साली इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑ सायन्स ही पदवी मिळवली ती सुद्धा अर्थशास्त्र या विषयात.

परदेशात त्यांनी आर्थिक विचारांवर तीन ग्रंथ लिहिले जे आजही भारतीय अर्थकारणाला दिशा देण्यासाठी उपयोगी आहेत.

यातला तिसरा व सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे १९२३ साली इंग्लंडमध्ये लिहिलेला

“दि प्रॉब्लेम ऑफ रुपी: इट्स ओरिजिन अँड सोल्युशन”

या ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकर भारतीय रुपयाच्या उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा सादर करून, ‘भारतासाठी आदर्श चलनपद्धती कोणती?’ या त्यावेळच्या ज्वलंत प्रश्नावर आपले मूलगामी विचार मांडतात.

या पुस्तकाच्या निर्माणावेळी बाबासाहेबांनी जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ केन्स याच्याशी सुवर्णविनिमय यावर आधारित चलनव्यवस्थेच्या योग्ययोग्यतेसाठी वाद घातला होता.

त्यांची मते आज सत्तर वर्षांनंतरही कालातीत ठरली. केन्स जर आज जिवंत असता तर त्याला आपली मते बदलावी लागली असती.

बाबासाहेबांचे अर्थविषयक विचार प्रखर आणि द्रष्टे होते.

१९२६ साली भारतात असलेल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतीय चलन विषयक नियमावली आणि आर्थिकनीती वर नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक असावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

याच प्रयत्नाचा भाग म्हणून हिल्टन यंग कमिशनची स्थापना केली होती.

त्याकाळात जगभरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोडीचा भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यासक कोणी नव्हता. हिल्टन यंग कमिशनने त्यांना रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीसाठी आपली साक्ष देण्यासाठी पाचारण केले.

त्यावेळी बाबासाहेबांनी आपली परखड मते तिथे स्पष्टपणे मांडली.

“रिझर्व्ह बँकेसारख्या चलननिर्मिती करणाऱ्या संस्थेच्या चलनपुरवठा करण्याच्या क्षमतेवर परिणामकारक अंकुश असण्याची आवश्यकता आहे. नपेक्षा, अनिर्बंध चलननिर्मिती आणि त्यातून भरमसाठ भाववाढ होऊन आर्थिक स्थैर्य धोक्यात येईल.”

बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हिल्टन यंग आयोगाला पटले. त्यांनी बाबासाहेबांच्या दि प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाला आधार मानून भारतीय रिझर्व्ह बँकेची उभारणी केली.

१ एप्रिल इ.स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली.

नेमकं त्याकाळात बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते, मोर्चे,आंदोलने पक्ष बांधणी अशी धावपळ सुरु होती मात्र तरी रिझर्व्ह बँकेची शैली आणि दृष्टीकोन बाबासाहेबांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँक च्या स्थापनेत जरी बाबासाहेब नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिलेली आहे.

त्यांनी रिझर्व्ह बँकेचा पाया रचला यामुळे कितीही मोठी संकटे आली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत राहिला आहे. त्यांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली कठोरपणे पाळली तर यापुढे देखील जगात सर्वोत्तम इकॉनॉमी म्हणून उभा राहील हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.