ते बाबासाहेबांना म्हणाले, “एवढे कायदेपंडित असताना हा खेडवळ व्यक्ती तुमचा वारसदार कसा?”

एकदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समाजवादी पक्षाशी राजकीय बोलणी सुरु होती. दोन्ही पक्षांच्या बैठका सुरु होत्या. एकदा बाबासाहेबांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना निरोप पाठवला की,

“मी या बैठकीला येऊ शकत नाही. माझे प्रतिनिधी व विश्वासू सहकारी येतील. त्यांचे व माझे विचार एकच आहेत. मला जे सांगायचे आहे तेच ते देखील सांगतील. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.”

ठरल्याप्रमाणे बैठक बसली. समाजवादी नेते जमले. अजूनही बाबासाहेबांचा प्रतिनिधी आला नाही याची चर्चा सुरु झाली. सर्वांचे डोळे दरवाजा कडे लागले होते. आपापसात कुजबुज सुरु झाली. अचानक मागच्या रांगेत बसलेला एक व्यक्ती उठला आणि म्हणाला,

“मीच आलोय बाबासाहेबांच्या वतीने.”

मळलेलं धोतर, धुळीने भरलेला सदरा, डोक्यावर निळी टोपी. बैठकीतल्या नेत्यांना पटेचना की हा खेडवळ दिसणारा माणूस बाबासाहेबांचा प्रतिनिधी आहे.

बाबासाहेब स्वतः नखशिखांत इंग्रजी पोशाखात असतात. जगातल्या दिग्गज विद्यापीठात मोठमोठ्या पदव्या मिळवलेला तो प्रकांड पंडित, त्यांचे आणि यांचे विचार मिळतेजुळते कसे असतील. त्यांनी या माणसाला चर्चेसाठी का पाठवलं असावं ? असे अनेक प्रश्न त्या नेते मंडळींना पडले होते.

त्यांच्या बोलण्याने जराही विचलित न होता त्या माणसाने शांत पणे आपल्या खांद्याकरच्या पिशवीतून कागदपत्रे काढली, मुद्दे मांडून बोलण्यास सुरवात केली. तिथल्या नेत्यांच्या शंकांना उत्तरे दिली. बाबासाहेबांची बाजू शुद्ध व ओघवत्या भाषेत समर्पकपणे मांडली.

एका कमी शिक्षण झालेल्या माणसाने बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांची वकिली केली होती. ते होते कर्मवीर भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड.

भाऊराव गायकवाड यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९०२ रोजी नाशिकपासून १२ मैलावर असणाऱ्या आंबे दिंडोरी या खेडेगावात झाला. शेतकरी कुटुंब असल्यामुळे घरची परिस्थिती तशी बरी होती. पण दलित समाजातील असल्यामुळे सर्वत्र भेदभाव केला जाई. अगदी शाळेत देखील त्यांना सर्वात मागच्या रांगेत बसवलं जाई. मास्तर त्यांच्या पाटीला देखील स्पर्श करत नसत.

शाळेत त्यांचं नाव देखील भावड्या किसन महार असे नोंदवण्यात आले होते. पुढील शिक्षणासाठी ते नाशिकला आले. तिथे पाठक गुरुजींनी त्यांचं नाव बदलून भाऊराव किसन गायकवाड असे केले. नाव बददल मात्र दलितांच्या साठी अवघड परिस्थिती तशीच होती. अशातच त्यांचं शिक्षण सुरु होत. भाऊरावांना व्यायामाची व कुस्तीची देखील आवड होती.

१९१४ साली पहिले महायुद्ध पेटले. याचकाळात नाशिकमध्ये प्लेगची मोठी साथ आली होती. शाळा बंद झाल्या म्हणून भाऊराव परत गावी आले. घरच्या शेतात काम करू लागले. पुन्हा शाळा सुरु झाल्यावर नाशिकला परतले. पण दुर्दैवाने प्लेगने पुन्हा उचल खाल्ली.

ते तेव्हा मॅट्रिकला होते पण या रोगाच्या साथीने भाऊरावांची शाळा कायमची सुटली. पती पुस्तक सोडून हातात नांगर धरला. पुढे आईच्या मृत्यूनंतर गावात करमेना म्हणून नाशिकला नोकरी पकडली. याच काळात तिथल्या दलित विद्यार्थ्यांसाठी शाहू बोर्डिंगची सुरवात झाली होती. भाऊराव या संस्थेत सुप्रीटेंडेंट म्हणून लागले. तिथून त्यांचं आयुष्य कायमच बदलून गेलं.

शाहू बोर्डिंगमध्ये असताना गरीब दलित मुलांची दुःख, त्यांची प्रश्ने भाऊरावांना कळाली. तिथल्या वाचनालयात बसून महात्मा गांधींपासून ते मार्क्स पर्यंत सर्वांचे विचार वाचून काढले. इथेच त्यांची इंग्रजी भाषा समृद्ध झाली.

यातूनच ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली उभे राहत असलेल्या दलितोध्दाराच्या चळवळीशी ते जोडले गेले. 

डॉ. बाबासाहेब १९२६ साली एका कोर्ट केसच्या निमित्ताने नाशिकला आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था श्री शाहु छत्रपती बोर्डिग येथे केली होती. या बोर्डिगच्या व्यवस्थापक पदावर असलेले भाऊराव त्यांची बॅग घेण्यासाठी व त्यांना दालनात घेवुन जाण्यासाठी उभे होते. पहिल्या नजरेतच  हा धिप्पाड उंच मोठया डोळयांचा व करारी नजरेचा तरुण व्यक्तिपारखी असणाऱ्या बाबासाहेबांच्या चाणाक्ष नजरेने हेरला. त्यांची भाषणे ऐकून भाऊराव देखील त्यांना गुरु मानू लागले.

पुढे ही गुरू-शिष्याची जोडी सामाजिक व राजकीय क्षितिजावर दलितांच्या उद्धारासाठी जवळपास ३० वर्षे संघर्ष करीत राहिली व दलितांच्या संघर्षमय इतिहासात अजरामर झाली. बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीत ते आघाडीवर राहून काम करणारे कार्यकर्ते होते.

दलितांच्या उद्धारार्थ त्यांनी आपले सर्व आयुष्य वेचले. महाडच्या सत्याग्रहात (१९२७) व नासिकच्या काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रहात (१९३०) ते सर्वात पुढे होते. त्यावेळी त्यांना निर्दय मारपीट सहन करावी लागली व तुरुंगातही जावे लागले.

सामाजिक कार्य करताना खेडय़ापाडय़ांतून फिरताना आपल्या गोरगरीब बांधवांना जेवणाचा बोजा नको म्हणून ‘‘मागच्या गावांहून जेवून आलोय’’ असे खोटेच सांगून पुढे प्रवासात वेळ मिळाल्यावर कुठे तरी नदीकाठी जेवून घेत. अथवा कोटाच्या खिशात असलेले गूळ शेंगदाणे खाऊन वेळ मारून नेत. पैसे खर्च होऊ नयेत किंवा इतरांना भुर्दंड पडू नये, म्हणून दादासाहेब हे कधी पायी तर कधी सायकल, घोडागाडी किंवा बैलगाडीतून प्रवास करीत.

बाबासाहेब सहजासहजी कुणाची स्तुती करणारे नव्हते तावून सुलाखुन ते माणसांची पारख करणारे होते. एका सभेत बाबासाहेब म्हणाले की 

हा माझा भाऊराव गायकवाड या प्रत्येक कसोटीवर शंभर नंबरी सोनयासारखा उतरला आहे. हे सोने अतिशय शुध्द आहे. तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे हाच माझा उजवा हात आहे

पण बाबासाहेब भाऊरावांना आपला जीवलग मित्र, सच्चा अनुयायी आणि आपला खरा सल्लागार मानत होते. ही बाब त्यांच्या भोवती घिरटया घालणा-या उच्चशिक्षीत सहका-यांना सहन होत नसे. ही सुटा – बुटातील , कोट टायमधील कायद्वाची पदवीधर मंडळी दादासाहेबासारख्या अर्धवट शिकलेल्या व्यक्तीला आपला नेता म्हणून मान्य करत नव्हती.

एकदा हि सगळी वकील मंडळी बाबासाहेबांच्या कडे आली व दादासाहेब गायकवाडांचं नेतृत्व आमच्यासारख्या उच्चशिक्षीतांनी मान्य नसल्याच प्रत्यक्ष बाबासाहेबांना बोलुन दाखवलं. त्यांच्याबद्दलच्या तक्रारीचा पाढा देखील वाचून दाखवला.

तेव्हा दुखावलेले बाबासाहेब त्यांना म्हणाले,

 “भाऊरावासारखे ,खेडयापाडयात उपाशीतापाशी भटकण्याचे सामर्थ्य तुम्हापाशी आहे काय ? जन्मभर त्याने जिवाचे रान केले. तुम्ही शहरात  वकीली करता, प्रतिष्ठा मिळविता आणि पुढारी म्हणुन मिरविता भाऊरावांशी स्पर्धा करु नका. उन्हातान्हातुन , डोगरद-यातुन , कधी पायी कधी सायकलवर कधी टांग्यातुन कधी मोटरीतुन संबध महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला आहे. प्रत्येक जिल्हात प्रत्येक खेडयात प्रत्येक झोपडयात भाऊराव माहित नाही असा मनुष्य सापडणे कठीण . काही ठिकाणी आंबेडकर कोण हे कदाचित माहित नसेल , परतु भाऊरावांना सगळे गोरगरीब ओळखतात”

बाबासाहेब नेहमी म्हणायचे,

“भाऊराव म्हणजे ऐंशी टक्के फेडरेशन व वकील पुढारी म्हणजे फेडरेशन बरखास्त 

बाबासाहेबांच्या पश्चातही दलित चळवळीचा वारसा दादासाहेब गायकवाड यांनी चालवला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. आयुष्यभर संघर्ष करून जनहिताची व दलितोद्धाराची कामे केली. अनेकांना रोजगार मिळवून देऊन त्यांचे संसार थाटून दिले. अनेकांना बढत्या देऊन त्यांना मोक्याच्या जागा मिळवून दिल्यात. गरीब मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शिक्षणसंस्था व वसतिगृह सुरू केली.

१९६७मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर राजकीय समझोता करून संबंध देशात महाराष्ट्रात पहिल्यांदा बौद्धांना सवलती मिळवून दिल्यात.

दिल्लीत १५ वर्षे दादासाहेब खासदार होते; परंतु आयुष्यात स्वत:च्या मालकीचे घर केले नाही. आलेले सर्व वेतन त्यांनी नाशिकच्या रमाबाई विद्यार्थी वसतिगृहास न चुकता दर महिन्याला पाठवले. एवढेच नव्हे तर आयुष्याच्या शेवटी बँकेतील जमा रु. ६००० रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहास दान देऊन शिल्लक शून्य ठेवली.

त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून भारत सरकारने त्यांना पदमश्री हा ‘किताब दिला. 

बाबासाहेबांच्या अढळ स्थानाला स्पर्श करण्याची त्याकाळातही त्यांच्या अनेक सहका-यांमध्ये होती. अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना कुणालाही बाबासाहेबांचा महाअनुयायी होणे जमले नाही. ही पात्रता व योग्यता जेमतेम मॅट्रीक झालेल्या धोतर टोपीतल्या साध्या सरळ दादासाहेबांच्या मध्येच होती आणि ही बाब काळाच्या कसोटीवर खरी देखील ठरली.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.