डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी  शाहू महाराज व डॉ. आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक व वैचारिक ऋणानुबंध निर्माण झाले होते. राजर्षि शाहूंच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात डॉ. आंबेडकर यांचा उदय झाला. दोघांमध्ये भावनिक नाते होतेच. त्याशिवाय दलितांविषयीची कणव व सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यासाठीचा संघर्ष हा समान धागा होता.

छत्रपती शाहू महाराजांनी वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला मदत केली हे आपण सारे जाणतोच. पण या दोन महापुरुषांची भेट कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो.

बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच गाजत होतं. सुप्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतलेले पहिले दलित समाजातील विद्यार्थी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.

त्यांची प्रसिद्धी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या कानावर पडली. त्यांनी बाबासाहेबांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी स्कॉलरशिप दिली. जवळपास तीन वर्षे या स्कॉलरशिप वर बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकले.

अमेरिकेला शिकायला गेलेला अस्पृश्य समाजातील पहिला विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची चर्चा संपूर्ण राज्यभरात होऊ लागली. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांचा बोलबाला जाणे साहजिकच होते. शाहू महाराजांना आंबेडकरांची ओळख करवीर संस्थानचे चित्रतपस्वी दत्तोबा दळवी यांनी करून दिली.

कोण होते दत्तोबा दळवी ?

दत्तोबा दळवी हे शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार होते. त्यांचे वडिलदेखील करवीर संस्थानात नोकरीला होते. दत्तोबा जेव्हा मुंबईमध्ये जे जे स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिकायला होते तेव्हा त्यांच्या राहण्याची, शिक्षणाची सोय शाहू महाराजांनी केली होती. कोल्हापूरला परतल्यावर त्यांना आपल्या दरबारात नोकरी दिली. 

चित्रकलेच्या सोबतच शाहू महाराजांनी दत्तोबांवर आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवली होती. ती जबाबदारी म्हणजे कोल्हापूरचा इतर संस्थानांशी संपर्क करणे .

दत्तोबा दळवी समर्थपणे हि जबादारी पार पडत होते.

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबासाहेबांनी इंग्लंडमध्ये लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन घेतलं. पण बडोद्याची स्कॉलरशिप संपल्यामुळे बाबासाहेबांना पुढील शिक्षणासाठी बऱ्याच अडचणी समोर उभ्या राहिल्या.

पुढे बाबासाहेब भारतात परत आले तेव्हा त्यांचा एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या बातम्या दत्तोबा दळवींच्या वाचनात आल्या. त्यांनी बाबासाहेबांना आंबेडकरांच्या बद्दल सांगितलं. एक गरीब दलित कुटूंबातील तरुण शिक्षणासाठी एवढी धडपड करत आहे हे ऐकून महाराजांना आश्चर्य व सोबतच कौतुक देखील वाटलं.

१९१८ साली शाहू महाराज स्वतः मुंबईला आंबेडकरांच्या घरी गेले व त्यांची भेट घेतली. 

बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व व विचार पाहून महाराज त्यांच्या प्रेमातच पडले. त्यानंतर ते वरचेवर मुंबईत येऊन बाबासाहेबांना भेटत होते. या दरम्यान बाबासाहेबांनी अस्पृश्यता अंताची चळवळ उभी करण्याचा मनोदय व्यक्त केला व समाजात जागृती निर्माण करण्यासाठी वर्तमानपत्र चालवण्याची संकल्पना मांडली असताना महाराजांनी तत्काळ २,७०० रुपयांची मदत केली. या मदतीतूनच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ नावाचे पाक्षिक सुरू केले.

पुढे शाहू महाराजांच्या प्रेरणेतूनच कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे बाबासाहेब आंबेडकरांनी दक्षिण भारतातील बहिष्कृत परिषद भरवली. स्वतः शाहू महाराज या माणगाव परिषदेला उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी बाबासाहेबांचे कौतुक केले. ते म्हणाले,

“माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशा मनोदेवता मला सांगते…!”

हि माणगाव परिषद संबंध दलित चळवळीसाठी ऐतिहासिक ठरली.

पुढच्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कुल ऑफ इकोनॉमिक्समधील राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला गेले. त्यांच्या या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मोठी मदत केली.

या काळात दोघांमधील दुवा म्हणून दत्तोबांनी काम केलं. इंग्लंडमध्ये येणाऱ्या सर्व अडचणींबद्दल बाबासाहेब दत्तोबांना पत्रातून कळवत असत. दत्तोबा त्या अडचणी शाहू महाराजांच्या कानावर घालून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करत. यासंदर्भातील दत्तोबा आणि बाबासाहेब यांच्यातील पत्रं अलीकडेच प्रकाशात आली आहेत. बाबासाहेब लंडनहून परतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांचं चित्र दत्तोबांकडून काढून घेतल्याचा उल्लेख एका पत्रात आढळतो.

तर एका पत्रात बाबासाहेब इंग्लंडमधील चलनाचा भाव घसरल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे आणि २०० पौंड इतकी मदत पाठवून द्यावी अशी विनंती करतात. तसेच शाहू महाराजांनी प्रकृतीची काळजी घ्यावी ते सामाजिक लोकशाही चळवळीचे आधारस्तंभ असल्याचं बाबासाहेब बोलतात.

असेच एक पत्र १० ऑगस्ट १९२१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी दत्तोबा दळवींना पाठवले होते. आज या पत्रव्यवहाराला शंभर वर्षे पूर्ण झाली. छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे ऋणानुबंध नेमके कसे होते हे या पत्रव्यवहारातून समजते.

लवकरच शाहू महाराजांचे निधन झाले. पण त्यानंतरही दत्तोबा दळवी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील मैत्री तशीच कायम राहिली. बाबासाहेब कोल्हापूरला आल्यावर दत्तोबा दळवींच्या घरी उतरत असत. दत्तोबा दळवी एक महान कलावंत तर होतेच पण त्यांनी आपलं आयुष्य कोल्हापुरात विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवण्यात खर्ची केलं. आजही चित्रकलेतील कोल्हापूर स्कूलमध्ये ‘दळवीज्’ हे एक आदरार्थी संबोधन आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.