मास्तरांनी लास्ट बेंचवरच्या पोराला पुढं बसवलं, त्यांच्याच समोर बाबासाहेबांनी गोलमेज गाजवली

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. एका महामानवाची जयंती. गरिबीचे, जातीचे चटके बसत होते तरी आंबेडकरांनी मॅट्रिकची परिक्षा पास केली.. त्यानंतरचा इतिहास आपणाला माहितच आहे.. 

असाच त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा… 

नारायण मल्हार जोशी अर्थात नाम जोशी. हे पुण्यातील चार वर्षांची न्यू इंग्लिश स्कूलमधील नोकरी सोडून मुंबईत आले. मुंबईच्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये पुन्हा त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. नाम जोशी हे एल्फिस्टन हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षक होते. 

एके दिवशी नाम यांनी शाळेतील मुलांची हजेरी घेण्यास सुरवात केली. हजेरी घेतल्यानंतर विषय गृहपाठाकडे आला. कालचा गृहपाठ कोणी कोणी करून आणला आहे याची विचारणा झाला. तेव्हा निवडक मुलांनीच हात वर केला. या हात वर करणाऱ्यांमध्ये वर्गाच्या शेवटच्या बाकावर एकटाच बसणारा विद्यार्थी होता. हा मुलगा एकटाच शेवटच्या बाकावर बसतो हे नाम यांना खटकत होतं. 

त्यानंतर नाम यांनी फळ्यावर गणिताचे प्रमेय मांडले. ते प्रमेय आहे असे कोण सोडवून दाखवेल यांची विचारणा केली. तेव्हा सर्व मुले शांत बसली. पण एका मुलाने हळुच दबकत दबकतच हात वर केला. तो हाच शेवटच्या बाकावर बसणारा मुलगा.. 

वा छान..! गुरूजींनी त्या मुलाकडे पाहतच उत्तर दिले आणि म्हणाले, बाळा पुढे ये आणि फळ्यावरचे गणित सोडवून दाखव.. 

शेवटच्या बाकावरचा तो विद्यार्थी उठला आणि फळ्याजवळ जावू लागला.. तसा विद्यार्थांचा गोंगाट सुरू झाला… 

विद्यार्थांचा गोंधळ पाहून नाम जोशींनी हातातली छडी टेबलवर आपटली आणि दरडावून विद्यार्थांना विचारलं, काय झालंय गोंधळ करायला ते ही गुरूजी वर्गात असताना… 

यावर दोन तीन विद्यार्थी म्हणाले,

फळ्याच्या पाठीमागे आमचे जेवणाचे डबे आहेत.. गुरूजी हा फळ्याला शिवला तर आमचे डबे बाटतील.. 

तसे गुरूजी चिडले, गप्प बसा. काही बाटत नाहीत. शाळेत तुम्ही हेच शिकण्यासाठी येता का रे? 

गुरूजींनी त्या मुलाकडे पहात त्याला खडू देत गणित सोडवण्यास सांगितले. 

त्या मिळाले फळ्यावरचे गणित अचूक सोडवले. गणित सोडवलेले पाहून गुरूजी म्हणाले, 

भीमा तू हुशार विद्यार्थी आहेस.. उद्यापासून तू मागच्या बाकावर बसायचे नाही. पहिल्या बाकावर बसत जा. अन् दूसऱ्या दिवसापासून तो भिमा अर्थात “भिमराव रामजी आंबेडकर” हा विद्यार्थी पहिल्या बाकावर बसू लागला. 

पण ही गोष्ट इथेच संपत नाही… 

या गोष्टीचा दूसरा भाग सुरू होतो तो १९३० च्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने. इंग्लडला झालेल्या गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. डॉ. बाबासाहेबांना प्रथम श्रेणीच्या प्रतिनिधींमध्ये बसवण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत आपले भाषण देण्यास सुरवात केली. सुमारे दिड तास डॉ. बाबासाहेबांचे भाषण सुरू होते..उपस्थित ते अभ्यासपुर्ण भाषण ऐकत होते… याच उपस्थितांमध्ये कॉमन लॉबीमध्ये बसून कामगारांचे प्रतिनिधी नाम जोशी बाबासाहेबांचे ते भाषण ऐकत होते.

एकेकाळचा आपला विद्यार्थी आज माझ्या पुढे बसून दिड तास भाषण देत आहे, नाम जोशींची छाती तेव्हा अभिमानाने भरून गेली होती..पुढे बाबासाहेब आंबेडकरांची १९४२ च्या मध्यवर्ती मंत्रीमंडळात कामगार खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली. तेव्हा कामगारांचे प्रतिनिधी म्हणून एकेकाळचे त्यांचे शिक्षक नाम जोशीचं होते हा देखील एक योगायोग.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.