त्याच बंडोबांमुळे मुख्यमंत्र्यांना विधानसभेत चप्पल सोडून पळून जावं लागलं

निवडणूक झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा दरवेळी उत्सुकतेचा विषय असतो. पण नेहमी शर्यतीत असलेल्या नावापैकी एक नाव निवडले जाते. फार मोठा धक्का बसत नाही. बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही मात्र आजवर सर्वात जास्त आश्चर्य वाटणारी बातमी होती.

ते मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा चुकून त्यांचे नाव निवडले गेले असं लोक म्हणायचे.

इंदिरा गांधीना छत्रपती घराण्यातील अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यांची ओळख कित्येकांना प्रसिध्द व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचे बंधू हीच आहे. 

अंतुलेंच्या जागी मराठा मुख्यमंत्री हवा अशी मागणी होत होती आणि म्हणून इंदिरा गांधींनी बाबासाहेब भोसले यांची निवड केली असं सांगितलं जात होतं. तस बाबासाहेब हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासूनचे काँग्रेसचे नेते, मंत्रीपदावर देखील राहिलेले मात्र वरच्या लेव्हलला काय राजकारण चालतं याचा त्यांना काहीच अंदाज नव्हता. विशेषतः दिल्ली त्यांच्यासाठी अनोळखी होती.

त्यांना मुख्यमंत्री पद कसं मिळालं याबद्दल खुद्द बाबासाहेब सांगतात की,

‘काँग्रेसला बॅ. अंतुल्यांमुळे झालेल्या बदनामीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील अब्रू राखण्यासाठी चांगल्या माणसाची गरज होती. मंत्री म्हणून मी केलेला सचोटीचा कारभार दिल्लीच्या दरबारी रुजू होताच. माझ्या नावाचा विचार चालू आहे. याची मला कल्पना होती, पण मी दिल्लीला गेलो नाही. कुणाला कपभर चहाही पाजला नाही. अंतुलेंच्या हातसफाईमुळे इंदिराजी अडचणीत आल्या होत्या.

अंतुल्यांच्या अगदी विरुद्ध प्रतिमा असलेला, पण आपल्या आज्ञेत राहणारा माणूस इंदिराजींना हवा होता. अंतुल्यांचाही माझ्या नावाला विरोध नव्हता. मला मुख्यमंत्रीपद कुशल नेतृत्वाबद्दल किंवा संघटनात्मक कार्याबद्दल मिळालेलं नाही, याची जाणीव होती. १७ जानेवारी १९८२ ला दुपारी साडेतीन वाजता खुद्द इंदिराजींनी फोन करून मला मुख्यमंत्री करीत असल्याचे सांगितले.’

२१ जानेवारी १९८२ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल ओ. पी. मेहरा यांनी बाबासाहेबांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

बाबासाहेब भोसले प्रशासनात अननुभवी होते पण ते कसलेले वकील आणि सिद्धहस्त वक्ते होते. त्यांनी अंतुलेंची छाया आपल्यावर पडू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली. विलासराव देशमुख श्रीकांत जिचकार असे अनेक तरुण अभ्यासू नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच स्थान दिलं.

दहावीपर्यंतच्या मुलींनी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच काळात झाला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना त्यांनी सुरू केली. मासेमारांसाठी विमा योजना सुरू झाली ती त्यांच्याच कार्यकाळात.

स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तसेच दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. भिवंडी येथे १२ वर्षानंतर शिवजयंती साजरी करायचा त्यांचा निर्णय देखील प्रचंड गाजला. बाळासाहेबांच्या या मिरवणुकीची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने चक्कर मारून गेले होते.

बाबासाहेब भोसले यांचा स्वभाव मिश्किल होता. अनेकदा ते स्वतःवर ही विनोद करत असत. त्यांची अनेक विधाने कधी कधी पदाला शोभत नाहीत असं लोकांचं मत असायचं. विशेषतः त्याकाळचा मीडिया बाबासाहेब भोसले यांना गंभीरपणे घेत नव्हता उलट त्यांना वेळ मिळेल तसे टीकेने घायाळ करण्यात समाधान मानायचा.

अशातच बॅ. अंतुल्यांशी बाबासाहेबांचा खटका उडणे अटळ, अपरिहार्य होते.

बॅ. अंतुल्यांना त्यांच्या रिमोट कंट्रोलने चालणारा मुख्यमंत्री हवा होता, पण इतरांप्रमाणेच अंतुलेही बाबासाहेबांना ओळखू शकले नव्हते. बाबासाहेबांना बॅ. अंतुल्यांना आवरायचे आणि वसंतदादांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर लॉबीला सावरायचे अशा दोन्ही बाजू सांभाळाव्या लागत होत्या.

सुरवातीला तरी बाबासाहेब भोसले यात यशस्वी ठरले. मात्र ही तारेवरची कसरत त्यांना फार काळ झेपली नाही. त्यांच्या विरुद्धच्या तक्रारी दिल्ली पर्यंत जाऊ लागल्या. अशातच एकदा मंत्रिमंडळ विस्तारावरून त्यांचं आणि इतर काही नेत्यांचं वाजलं.

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बाबासाहेब पाटील यांना हटवण्यासाठी सहीमोहीम सुरु झाली. काँग्रेसच्या २३६ आमदारांपैकी १११ आमदारांनी त्यांच्या विरुद्ध सही केली. मात्र इतकं असूनही बाबासाहेब भोसले अविचलित होते. जरी सगळेच्या सगळे आमदार विरुद्ध गेले आणि फक्त इंदिरा गांधी माझ्या पाठीशी उभ्या रहायला तरीही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला धोका नाही असं ते थेट म्हणायचे.

त्यांच्या विरुद्ध उठलेलं बंड इंदिरा गांधींनी दिल्लीवरून कानपिचक्या दिल्यावर शांत झाले. तेव्हा बाबासाहेब भोसले आपल्या नेहमीच्या अफाट शैलीत म्हणाले,

“बंडोबा थंडोबा झाले.”

पुन्हा त्यांच्या या वाक्यावरून वादंग निर्माण झाले. कधी नव्हे ते अंतुले समर्थक आणि वसंतदादा पाटील समर्थक नेते एकत्र आले. आपले वाद नंतर आधी  काहीही करून बाबासाहेब भोसलेंना पदावरून काढले पाहिजे यावर सगळ्यांचं एक मत झालं. वसंतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सांगलीला जमलेल्या सगळ्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली.

नागपूर अधिवेशनात तर वेगळाच गोंधळ बघायला मिळाला. स्वपक्षीय विरोधकांवर बेफाम चिडलेल्या बाबासाहेब भोसले यांनी विधानसभेत बोलताना आपले फेमस उद्गार काढले,

“आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची आहे.”

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच आमदारांचं केलेलं हे “व्यक्तीपरीक्षण” सर्वसामान्यांसाठी कमालीचं मजेदार आणि काँग्रेस आमदारांसाठी संतापजनक ठरलं. ‘षंढ’ असल्याचा बाबासाहेबांनी लावलेला शोध काँग्रेस आमदारांसाठी जास्त दुखावणारा ठरला.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपल्याच मुख्यमंत्र्याविरुद्ध हक्कभंगाचा ठराव आणला. आ. नानाभाऊ एंबडवार आणि आ. सुशिलकुमार शिंदे हे यात आघाडीवर होते. १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी विधानसभेत काँग्रेस आमदारांची बैठक बोलवण्यात आली.

या बैठकीत बरीच खडाजंगी झाली. बाबासाहेब भोसले यांचा पुरेपूर अपमान करायचा म्हणून आमदार ठरवूनच आले होते. त्या पैकी अनेकांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरले. प्रचंड मोठी वादावादी झाली. बाबासाहेब भोसले विरोधकांच्या खिंडीत  सापडले होते. मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ होत आहे हे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं.

हा वाद बराच पुढे जात आहे आणि मिटिंग थांबत नाही हे पाहून विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणचे दिवे विझवण्यात आले. पण काही उपयोग झाला नाही. अखेर मुख्यमंत्र्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न सुरु झाल्यावर मात्र त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या गडबडीत त्यांचे चप्पल तिथेच राहिले.

आमदारांच्या धक्काबुकीतून सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले व मुख्यमंत्री निवासस्थानी सुरक्षितपणे पोहचवले. मुखमंत्र्यांवर केलेल्या हल्ल्याची शिक्षा म्हणून भाऊराव पाटील, सूर्यकांता पाटील, सतीश चतुर्वेदी,अशोक पाटील, प्रेमानंद आवळे, राम पेंडागळे या सहा आमदारांना बडतर्फ करण्यात आलं.

हे बंड शांत झालं मात्र मुख्यमंत्र्यांचं आपल्याच पक्षातील नेत्यांवर वर्चस्व नाही हा संदेश काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहचला. पुढच्या काही दिवसातच बाबासाहेब भोसले यांची गच्छंती करण्यात आली. लोकनेते वसंतदादा पाटील यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रे सोपवण्यात आली.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.