महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकेकाळी दूरदर्शनच्या टीव्ही शो मध्ये अँकरिंग करायचे..

महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले मात्र ज्यांचे फक्त एका वर्षाच्या कारकिर्दीत अनेक किस्से फेमस आहेत असे अतरंगी मुख्यमंत्री म्हणजे बाबासाहेब भोसले. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं. त्यांच्यावर निर्णय घेण्यासाठी दिल्लीची वाट बघतात अशी टीका व्हायची. बाबासाहेब भोसलेंच्या बद्दल त्याकाळी देखील अनेक टीका व्हायच्या, आजही होतात.

पण बाबासाहेब भोसलेंची विनोदबुद्धी मात्र आजवरच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सरस होती. त्यांनी कोणते निर्णय घेतले हे कुणी सांगू शकत नाही पण त्यांचे विनोद मात्र आजही जुने लोक चवीने सांगतात.

ते मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा चुकून त्यांचे नाव निवडले गेले असं लोक म्हणायचे.

इंदिरा गांधीना अभयसिंहराजे भोसलेंना मुख्यमंत्री करायचं होतं पण नावात चूक झाली आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले असं लोक छातीठोकपणे सांगायचे. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की अजूनही त्यांची ओळख कित्येकांना प्रसिध्द व्याख्याते शिवाजीराव भोसले यांचे बंधू हीच आहे. 

बाबासाहेब भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या तारळे येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंतराव प्राथमिक शिक्षक आणि सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण कलेढोण, वीटा येथे आणि माध्यमिक शिक्षण सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं.

बाबासाहेब भोसले यांना सुरवातीपासून राजकारणात रस होता. ते कोल्हापुरात कॉलेजमध्ये असताना हुशार म्हणून ओळखले जायचे. तिथल्या विद्यार्थिसंघटनेचे ते मुख्य सचिव होते. तिथूनच ते स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत उतरले.

एकोणिसशे बेचाळीसच्या ‘छोडो भारत आंदोलना’त त्यांनी सक्रिय भाग घेतल्यामुळे त्यांना दीड वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. त्या आधी वर्षभर भूमिगत राहून त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत काम केले. परिणामतः ब्रिटिश सरकारने त्यांची सर्व खाजगी मालमत्ता जप्त केली होती.

जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव हे त्यांचे सासरे होते. तुळशीदास जाधव जेल मध्ये असताना येरवडा तुरुंगात बाबासाहेब भोसले आणि कलावती जाधव यांचा साखरपुडा झाला होता.

जेल मध्ये साखरपुडा झालेले बाबासाहेब भोसले एकमेव मुख्यमंत्री असतील.

पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपलं राहिलेलं उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे वृत्तपत्रविद्या व कायदा या विषयांच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं व बार ॲट लॉ होऊन परतले.

भारतात परतल्यावर त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. अल्पावधीतच ते या व्यवसायात यशस्वी झाले. एक हुशार आणि कर्तबगार वकील अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख झाली. मुंबईच्या उच्च न्यायालयातदेखील त्यांनी नाव कमावलं. याच सोबत दैनिक नेता (सांगली) व उषा (औंध) या दैनिकांच्या संपादक मंडळावरही ते काम करत होते. काँग्रेसचा इतिहास नावाचे पुस्तक देखील लिहिलं.

१९६० साली महाराष्ट्र महसूल न्यायाधिकारणाचे ते सदस्य बनले. महाराष्ट्र बार कौन्सिलवर ते दोन वेळा निवडून आले.  १९७० पर्यंत त्यांनी या न्यायाधिकरणावर काम केले. या क्षेत्रातून अधिक व्यापक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला व ते मुंबई येथे उच्च न्यायालयात वकिली करू लागले. १९७५ मध्ये त्यांची साहाय्य्क सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.

या सोबतच त्यांचं राजकीय कार्य सुरूच होतं. काँग्रेसचे खटाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम सुरु केलं. सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये कार्यकर्ता नेता म्हणून त्यांची ओळख बनली होती.

सत्तरच्या दशकात मुंबई दूरदर्शनची स्थापना झाली होती. अनेक नवनवे कार्यक्रम सुरु करण्यात आले होते. यात चिमणराव गुंड्याभाऊ सारखे विनोदी कार्यक्रम तर होतेच शिवाय शेतकऱ्यांसाठी आमची माती आमची माणसं असे समाज प्रबोधनात्म्क कार्यक्रम देखील होते.

या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये होता कोर्टाची पायरी हा कार्यक्रम.

कोर्टाची पायरीमध्ये कायद्याची ओळख एका विनोदी शैलीत सादर केली जायची. या कार्यक्रमाची संकल्पना होती ऍडव्होकेट बाबासाहेब भोसले यांची. त्यांनी फक्त संकल्पना मंडळी नाही तर आपल्या खास शैलीत त्यांनी याच सूत्रसंचालन देखील केलं. दर आठवड्याला त्यांचं खुमासदार भाषेत रंगणारी कोर्टाची पायरी पाहण्यासाठी अनेक जण वाट बघायचे.

ते या शोचं अँकरिंग तर करायचेच शिवाय त्यांनी यातील अनेक एपिसोडचं लिखाणदेखील केलं होतं.अनेक दिवस हा कार्यक्रम चालला. दूरदर्शन मुंबईच्या सुरवातीच्या यशात बाबासाहेब भोसले यांच्या शोचा सिंहाचा वाटा होता.

पुढे बाबासाहेब भोसले राजकारणात व्यस्त झाले आणि त्यांनी कोर्टाची पायरी मध्ये काम करायचं बंद केलं. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालेल्या बाबासाहेब भोसलेंचा अनपेक्षित टीव्ही शो मात्र फक्त जुन्या जाणत्या लोकांच्या लक्षात राहिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.