एक्सरे गॉगलच्या अफवेमुळे बाबासाहेबांना आमदारकीचा पराभव स्वीकारावा लागला.

निवडणूक म्हणजे एकप्रकारचं युद्ध आहे असं म्हणतात. अनेक निवडणुकीचे चाणक्य लढाई मारायसाठी आपली डोकी लढवत असतात. प्रचारात डाव आणि प्रतिडाव लढणे तशी कॉमन गोष्ट आहे. आणि हा प्रचार कुणी कसा करेल सांगता येत नाही.

असाच एक रंजक किस्सा आहे कारंजा विधानसभा निवडणुकीचा आणि काळ्या चष्म्याचा. आता तुम्ही म्हणाल कि प्रचाराचा आणि चष्म्याचा काय संबंध तर भिडुनो या चष्म्यामुळे निडवणूक हि हरू शकते याचाच हा किस्सा आहे. 

तर झालं असं कि १९९० च्या विधानसभा निवडणूका जवळ आल्या होत्या. शरद पवारांनी आपले पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यापासून महाराष्ट्रात त्यांचं वजन वाढलं होतं. महाराष्ट्रात विरोधी पक्षच उरला नव्हता. शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन निवडणूक लढवत होते. पण भाजप अजूनही चाचपडत होता आणि शिवसेनेला फक्त मुंबई पुरता मर्यादित पक्ष असं ओळखलं जायचं.

विदर्भाच्या ग्रामीण भागात तर शिवसेनेच्या शाखा आताशा कुठे सुरु होत होत्या. बाळासाहेबांच्या भाषणांनी पेटून उठलेले तरुण या शाखा चालवत होते.

कारंजांच्या निवडणुकीत युतीच्या वाटणी मध्ये हि जागा शिवसेनेला सुटली. 

काँग्रेसकडून तेव्हा तिकीट मिळालं होतं बाबासाहेब धाबेकर यांना.अकोला जिल्ह्यातील धाबा गावातील ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती असा त्यांचा प्रवास झाला होता. संपूर्ण अकोला जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क मोठा होता.

ज्यात त्यावेळी अगदी किरकोळ आणि पोराटोरांची वाटणारी शिवसेना आणि सेनेचे त्यावेळेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव गावंडे हे जिल्ह्यात प्रस्थ असलेले बाबासाहेब धाबेकर यांच्यासमोर उमेदवार म्हणून उभे राहिले. विदर्भ म्हणजे काँग्रेसचा हुकमी एक्का त्यात उमेदवार तगडा त्यामुळे गुलाबरावांसाठी निवडणुकीत तग धरणे हेच एक आव्हान होते.

उत्साही शिवसैनिकांनी ते आव्हान स्वीकारले आणि प्रचारासाठी एक मिश्किल आयडिया वापरली.

बाबासाहेब धाबेकर नेहमी काळ्या रंगाचा चष्मा घालायचे. जो या निवडणुकीत खास करून गाजला. प्रचारादरम्यान एक पुडी विशेषतः बाया बापड्यांमध्ये, बुजुर्ग मतदारांत अशी सोडण्यात आली कि बाबासाहेब प्रचार करतांना डोळ्यावर सतत जो काळा गॉगल घालतात त्यातून समोरची व्यक्ती नागडी दिसते.

म्हणता म्हणता ही चावट अफवा अख्ख्या मतदारसंघात पसरली आणि मतदारांनी बाबासाहेबांकडे किंवा त्यांच्या सभांकडे पाठ फिरवली. त्या निवडणुकी दरम्यान बाबासाहेब समोर यायचा अवकाश, बायका धूम ठोकून आत पाळायच्या,कडी लावून दार आतून बंद करून घ्यायच्या, अगदी म्हाताऱ्या बायका सुद्धा पिटी उषाच्या वेगाने धावत आत जायच्या, नजरेआड व्हायच्या.

सुरवातीला बाबासाहेब धाबेकरांनी या अफवेकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही पण नंतर त्यांना आवर घालण्याच्या पलीकडे हि अफवा पोहचली.

या गॉगलमुळे बाबासाहेबांची अकोला वाशीम भागात प्रतिमा तशी रंगेल नेता म्हणून चर्चली गेली आणि त्यावर भोळ्या भाबड्या विदर्भातल्या मतदारांनी विश्वास ठेवला. या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाली आणि एवढं तगड प्रस्थ असूनही बाबासाहेब निवडणुकीत साफ उताणे झाले आणि गुलाबराव गावंडे तब्बल १० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.

शिवसेनेच्या पोरांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं पण त्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग थोडासा चुकीचा ठरला.

धाबेकरांना त्यांचा काळा चष्मा बराच महागात पडला होता. पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारले म्हणून बाबासाहेबानी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात ते काँग्रेसच्या उमेदवाराला पाडून विजयी सुद्धा झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला.

शिवसेनेच्याच कोट्यातून त्यांना राज्य परिवहनमंत्री, जलसंधारण मंत्रीपद मिळाले.  त्यांनी जलसंधारणाच्या कामांना गती दिली. तसंच सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले. पुढे १९९९ साली बाबासाहेब धाबेकर काँग्रेसमध्ये परतले. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय देखील मिळवला.

बाबासाहेबांच्या गॉगलमुळे त्यांचा पराभव  झाला होता या गोष्टीला आता जवळपास ३० वर्षे उलटून गेली. बाबासाहेब धाबेकर देखील आता राहिले नाहीत. पण प्रत्येक वेळी निवडणूक आल्या कि अकोला कारंजा भागात त्यांच्या या गॉगलचा किस्सा निघतोच. एका अभद्र अफवेमुळे मोठ्या नेत्याचा पराभव कसा झाला होता याचे किस्से रंगवून रंगवून सांगितले जातात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.