गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीत जळणारं गाव एका विद्यार्थ्यानं शांत केलं होतं .

गांधीहत्या ही एक भारताच्या इतिहासावरील डाग आहे. तो एक दहशतवादी आणि भ्याड हल्ला होता. पण गांधींजींच्या हत्येनंतर देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात झालेल्या दंगली हा सुद्धा भारताच्या इतिहासावरील एक कधिही न पुसला जाणारा डाग आहे. आयुष्यभर स्वत:ला गांधीवादी अहिंसावादी म्हणवून घेणाऱ्या कित्येकांचे मुखवटे त्या वेळी गळून पडले आणि अहिंसेवर असणारी आपली श्रद्धा हि निव्वळ गांधीभक्तीतून आली असून तत्व म्हणून अहिंसेपासून आपण कोसो दूर केले.

गांधीवाद हे एक शिवधनुष्य आहे हेच खरे. ते ज्यांना पेलवलं असे लोक खूपच कमी आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगतोय. अशाच एका सच्चा गांधीवादी कॉंग्रेस कार्यकर्त्याची गोष्ट. ज्याने आपल्या डोक्यावरच्या गांधी टोपीशी आणि गांधींच्या तत्वाशी इमान राखले. ती व्यक्ती म्हणजे देशभक्त बाबासाहेब खंजीरे. 

इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटसं संस्थान. देशात जसं  ४२ च्या क्रांन्तीच वार घूमू लागलं तस छोट्या मोठ्या सर्वच संस्थांनांमधून आत्तापर्यन्त शांत असलेल्या अखिल भारतीय संस्थाने प्रजापरिषदेने उचल खालली. ब्रिटीश भारतात तीव्र होत चाललेल्या लढ्याबरोबर संस्थानातूनही स्वातंत्र्याचा जयघोष चालू होता. कोल्हापूर आणि इचलकरंजी संस्थानात देशभक्त रत्नाप्पा कुंभार, देशभक्त बाबासाहेब खंजीरे, ए.पी.पाटील, दिनकरराव मुर्देडे यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला. ब्रिटीशांना देश चालवू न देणे आणि त्यांना भारत सोडायला भाग पाडणे हा त्यांचा उद्देश होता. 

१२ डिसेंबर १९४२ च्या रात्री एकाच वेळी रुकडी आणि हातकणंगले या दोन रेल्वे स्टेशनवर क्रांन्तीकारकांनी हल्ला चढवला. बाबासाहेब खंजीरे आणि चंदुरकर पाटील यांनी हातकणंगले रेल्वे स्टेशन जाळून भस्मसात केले. शिवाय आसपासच्या सर्व टेलिग्राफच्या तारा तोडल्या. त्याच वेळी दिनकरराव मुर्देडे यांनी रुकडी स्टेशन जाळले. आपल्या शालेय जिवनापासून अतिशय लोकप्रिय असलेले बाबासाहेब अतिशय घातक अशा क्रांन्तीकारकांपैकी असल्याने पुढे त्यांना अटक होवून त्यांची रवानगी चार वर्षासाठी येरवड्यात झाली. 

१९४६ च्या प्रांतिक निवडणुकात कॉंग्रेस विजयी झाल्यानंतर इतर सर्व क्रांन्तीकारकांबरोबर बाबासाहेबवरील वॉरंट देखील रद्द झाले. 

नेत्यांच्या नेतृत्वगुणांची परिक्षा अत्यंत अवघड काळातच होते. स्वातंत्र्यानंतर आपले राहिलेलेल शिक्षण पुर्ण करण्यासाठी बाबासाहेब खंजीरे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होते. तोच नथुराम गोडसे नावाचा एक माथेफिरूने महात्मा गांधींची हत्या केली. राष्ट्रपित्याच्या अचानक झालेल्या खुनामुळे जनते मध्ये आक्रोश निर्माण झाला. नथुराम गोडसेने केलेल्या या चुकीचं खापर त्याच्या जातीवर म्हणजेच ब्राम्हण समाजावर फोडण्याची चूक काही जणांनी केली .

नथुराम मराठी असल्याने महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात नथुराम ज्या संघटनेमध्ये काम करत होता त्याच्याशी संबंधित लोकांच्या घरावर दगड फेक करण्यात आली. यातून सुरु झालेल्या दंगलीच्या वणव्यात नंतर नंतर अख्या ब्राम्हण समाजाला लक्ष्य करण्यात येऊ लागले. त्यांची घरे पेटवण्यात आली .

इचलकरंजी मध्येही या जातीय दंगलीचे लोण पसरले. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये एकमेकांसोबत लढलेले जातीच्या नावाखाली एकमेकांच्या जीवावर उठले.घरे जाळण्यात येऊ लागली. हा वणवा शांत कोण करणार??

अखेर गावातल्या जाणत्या लोकांनी एकत्र येऊन ठरवले बाबासाहेब खंजिरेंला परत बोलवू , तोच हि दंगल शांत करू शकतो. जमवाला पेटवणे सोपे आहे पण पेटलेल्या जमावाला शांत करणे तेवढेच अवघड .कॉलेजमध्ये शिकत असलेल्या या विद्यार्थ्याला ही अवघड जबाबदारी देण्यात आली होती.

निरोप मिळताच बाबासाहेबांनी तडक इचलकरंजी गाठली . महात्मा गांधीच्या हत्येकडे जातीय चष्म्यातून पाहण्याची चूक संतप्त लोक करत आहेत याची त्यांना जाणिव झाली. स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या आपल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह शहरातून एक मार्च काढला. अतंत्य करारी आणि तत्वनिष्ठ अशा बाबासाहेबांकडे नजर उचलून बघण्याची कुणाची बिशाद नव्हती. त्यांनी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाने लोकांना विनंती करुन तर कधी खडसावून गावभर पेटलेल्या आगडोंब शांत केला.

एक जळणारे शहर काही तासात शांत झाले. जणू काही घडलेच नाही. बघता बघता बाबासाहेब खंजीरे इचलकरंजी करांच्या मनाचे राजे झाले.

पुढे बाबासाहेबांनी भरपूर राजकिय यश मिळवले. इचलकरंजीचा पहिला आमदार बनण्याचा मान देखील त्यांना मिळाला  . बाबासाहेबांनी यशाप्रमाणे काही वेळा अपयशही पचवले. पण कधीच तत्व:शी तडजोड  केली नाही. आजही बाबासाहेबांच्या तिनही पिढ्या निष्ठेने कॉंग्रेसच्या विचाराबरोबर आहेत.

दंगलीच्या राजकारणातून लोकांना पेटवून मोठ होवू पाहणाऱ्या आजकालच्या नेत्यांसमोर एक पेटलेली आग विझवून मन जिंकणाऱ्या बाबासाहेबांनी एक आदर्श घालून दिलाय. निवडणुका येतील जातील पण जे त्या आदर्शांवर चालतील समाज त्यांचा नेहमीच ऋणी राहिल. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.