बाबरी मशीद पडत होती तेव्हा पंतप्रधान नरसिंह राव काय करत होते?

लालकृष्ण डवाणी भाजपा ला एवढे प्रामाणिक असूनही त्यांना पक्षाकडून अशी वागणूक का मिळाली अशी चर्चा मागील काही वर्षात रंगली मात्र असेच एक अडवाणी काँग्रेस मध्ये सुद्धा होऊन गेले ज्यांना मार्गदर्शकमंडळात सुध्दा ठेवण्याची गरज काँग्रेसला वाटली नाही. त्यांचे नाव पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव !!

ज्यांचा इतिहास काँग्रेसने पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. ज्यांच्यावर बाबरी मस्जीद पाडताना शांत राहिल्याचा आरोप सुद्धा झाला. इतकच काय?? तर कुलदीप नय्यर सारख्या लेखकांनी ‘बियाँड द लाईन्स’ या पुस्तकात लिहिले आहे कि ,

“मला माहिती होतं राव यांची बाबरी मशीद विध्वंसात भूमिका होती. जेव्हा कारसेवक मशीद पाडत होते तेव्हा ते आपल्या घरी पूजा करत होते.”

अशा अफवा तर होत्याच सोबतच राव धोतरा खाली खाकी चड्डी घालतात असे आरोप ज्या नेत्याला पचवावे लागले. खरच राव अस काही करत होते का? तर त्यांच्या “द इनसायडर या आत्मचरित्रात” ते त्या दिवशी नक्की काय करत होते याचा प्रसंग सांगितला आहे.

त्यांनी हा दिनक्रम बाहेर सांगण्यास मनाई केली होती. त्या दिवशी राव इतके अस्वस्थ होते कि त्यांच्या डॉक्टरांना त्यांना शांत कराव लागल होत. काय करत होते राव त्या दिवशी ? 

6 डिसेंबर 1992ला तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव सकाळी 7 वाजता झोपून उठले. दिनचर्येनुसार ते या वेळेआधीच उठत असत. पण त्यादिवशी उशीर झाला कारण त्यादिवशी रविवार होता. वर्तमानपत्र वाचून ते अर्धा तास ट्रेड मिलवर चालले.

त्यानंतर त्यांचे खासगी डॉक्टर के. श्रीनाथ रेड्डी आले. त्यांनी राव यांचे रक्त आणि लघवीचे नमुने घेतले. त्यादरम्यान ते इंग्रजी आणि तेलुगू वर्तमानपत्र वाचत होते.

त्यानंतर रेड्डी आपल्या घरी गेले. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी त्यांनी टीव्ही लावला. टीव्हीवर त्यांनी पाहिले की, हजारो कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले होते.

1 वाजून 55 मिनिटांनी पहिला घुमट कोसळला होता. अचानक रेड्डी यांना लक्षात आले की, नरसिंह राव यांना हृदयविकाराचा त्रास आहे. काही वर्षा पूर्वी याच विकरामुळे झालेल्या शस्त्रक्रियेमुळे नरसिंहराव राजकारणातून जवळजवळ निवृत्तच झाले होते. रेड्डींच्या लक्षात आले अशा या आणीबाणीच्या प्रसंगी आपण पंतप्रधानांच्यासोबत असणे गरजेचे आहे.

रेड्डी नरसिंह रावांचा रक्तदाब तपासण्यासाठी पुन्हा पंतप्रधान निवासस्थानी पोहोचले. तेव्हापर्यंत बाबरी मशिदीचा तिसरा घुमटसुद्धा कोसळला होता. डॉ. रेड्डी सांगतात, त्यांनी माझ्याकडे बघून रागानं विचारलं, “तुम्ही पुन्हा का आला आहात?” मी सांगितलं, मला तुमच्या आरोग्याची तपासाणी करायची आहे.

मी त्यांना जवळच्या लहान खोलीत घेऊन गेलो. माझ्या अंदाजानुसार त्यांच्या हृदयाचे आणि नाडीचे ठोके तसंच त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यांचा चेहरा लाल झाला होता आणि ते फारच अस्वस्थ झाले होते. मी त्यांना बीटा ब्लॉकरटचा अतिरिक्त डोज दिला. तेव्हा त्यांची स्थिती थोडी सुधारली. त्यांची प्रकृती चांगली वाटल्यानंतरच मी बाजूला झालो.

त्यांच्या तब्येतीचा या प्रकरणाशी संबंध होता, असं वाटलं कारण शरीर कधी खोटं बोलत नाही.

असं सांगितलं जातं की, त्यानंतर राव यांनी स्वत:ला एका खोलीत बंदिस्त करून घेतलं. संध्याकाळी सहा वाजता त्यांनी त्यांच्या घरीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली.

अर्जुन सिंह यांनी आपल्या ‘ए ग्रेन ऑफ सँड इन द अवरग्लास ऑफ टाईम’ या आत्मचरित्रात या मंत्रिमंडळ बैठकीचा उल्लेख केला आहे.

या प्रकारची मानसिकता मस्जिद पाडण्याच समर्थन असणाऱ्याची असू शकत नाही. नरसिंह राव यांचे चरित्रकार विनय सीतापती सांगतात,

“नोव्हेंबर 1992 साली दोन गोष्टीचा विध्वंस करण्याची योजना होती. एक बाबरी मशीद आणि दुसरं नरसिंहराव यांना. संघ परिवाराला बाबरी मशीद पाडायची होती. आणि काँग्रेसमधील अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांना नरसिंह राव यांना जमीनदोस्त करायचं होतं.”

२००४ मध्ये शेवटचे काही श्वास घेत असताना नरसिंह राव यांना या बाबतीत विचारल तर ते म्हणाले कि,

“चुका कोणाकडून होत नाहीत? मात्र मला अशा चुकीसाठी आरोपी केल जातय ज्यात माझा काहीही संबंध नाही. “

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात राव यांनी भाग घेतला होता. ते पंतप्रधान असताना पहिल्यांदाच मनमोहन सिंग या अर्थतज्ज्ञाला  राजकारणात घेऊन आले होते, अब्दुल कलाम यांना सगळ्यात जास्त पॉलिटिकल बॅकिंग नरसिंह राव यांनीचं  दिल. त्यांच्या काळात भारत इस्राईल संबंध मजबूत झाले,न्यूकलीयर बॉम्बच्या तयारीला गती दिली गेली, भारतात आर्थिक बदलाचे वारे यांच्याच काळात वाहू लागले.

अशा पॉलिटिकलमास्टर ला काँग्रेसनी आठवले नाही तरी भारतीय जनता इतिहासात त्यांना आठवत राहणार. बरोबर अठ्ठावीस वर्षापूर्वी आजच्या दिवशी पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार आपल्या हातात घेतला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.