या मुख्यमंत्र्यामुळे भिवंडीमध्ये तब्बल १२ वर्षांनी शिवजयंती साजरी होऊ शकली..

७ मे १९७० रोजी भिवंडी शहरात शिवजयंती निमित्ताने शहरात प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली होती. नव्यानेच स्थापन झालेल्या शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

भिवंडी हे यंत्रमागाच्या मागे धावणार शहर. अस सांगतात की जेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी मुंबईत गिरणी कामगारांचा संप घडवून आणला तेव्हा एकट्या भिवंडीने देशभरातल्या कापडाची गरज पुर्ण केली. सर्वसाधारण गरिब, मजूर, कष्टकरी वर्ग भिवंडीत मोठ्या प्रमाणात आहे.

ज्याप्रमाणे उल्हासनगरमध्ये सिंधी लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्याचप्रमाणे भिवंडीत मुस्लीम मोठ्या प्रमाणात. साहजिक देशभर मुस्लीम समाजाबद्दल काही वाईट गोष्टी घडल्या तर त्याचा उद्रेक भिवंडीत पहिला उमटायचां अस चित्र होतं.

असंच काहीसं त्या दिवशीच्या शिव जयंतीला घडलं. किरकोळ कारणाने वाद झाले आणि ही शिवजयंतीची रॅली सौदागर मोहल्ला या ठिकाणी पोहोचली तर तिथल्या तरुणांनी रॅलीवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्बचा मारा सुरू झाला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भडकले.

भिवंडीत प्रचंड मोठी दंगल होऊन अनेक ठिकाणी जाळपोळ देखील झाली. कित्येकांचा रक्त सांडलं . घरे दुकाने उद्धवस्त झाली. यामध्ये झालेल्या वित्तहानी आणि जीवितहानीची चौकशी करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी स्वतः भिवंडीमध्ये आले होते.

या दौऱ्यानंतर लोकसभेत अटलबिहारी वाजपेयींनी भिवंडीचा प्रश्न उपस्थित करत “अब हिंदू मार नही खायेगा” असे ठणकावून सांगितलं.

वाजपेयी यांच्या त्या सुप्रसिद्ध वाक्यानंतर भिवंडीची दंगल संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. भिवंडी हा संवेदनशील भाग असं ठरवून तिथे शिवजयंती साजरी करण्यास बंदी घालण्यात आली. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत त्यांचीच जयंती साजरी करण्यास बंदी घातली जाते हे पहिल्यांदाच घडत होतं.

हि बंदी तब्बल १२ वर्षे चालली.

या दरम्यानच्या काळात शिवजयंती साजरी करू देण्याबद्दल अनेकांनी प्रयत्न केले मात्र तेव्हाच्या राज्यसरकारने याची दखल घेतली नाही. पुन्हा दंगली होतील या भीतीने हे पाऊल उचलण्यात आले होते आणि कोणत्याही मुख्यमंत्र्याला हि रिस्क घ्यायची नव्हती.

१९८२ हे साल उजाडलं. सिमेंट घोटाळ्यात अडकल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना पायउतार व्हावे लागले. त्यांच्या जागी अनपेक्षितपणे बाबासाहेब भोसलेंची निवड झाली. मुख्यमंत्री होईपर्यंत महाराष्ट्रात अनेकांना बाबासाहेब भोसले हे नाव सुद्धा ठाऊक नव्हतं.

त्यांची या पदावर निवड ते सातारच्या छत्रपती घराण्यातील आहेत या गैरसमजातून  कशी झाली याच्या अनेक सुरस कहाण्या रंगवून रंगवून सांगितल्या गेल्या.

बाबासाहेब भोसले लोकनेते नव्हते. मात्र त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठं काम केलं होतं.

काँग्रेसच्या विचारांचे पक्के पाईक होते. त्यांच्याबद्दल कोणताही वाद विवाद नव्हता. उत्तम वक्ते, कुशाग्र आणि हजरजबाबी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना राजकीय वर्तुळात ओळखलं जायचं. पण तरीही मोठा लोकसंग्रह, आमदारांचा पाठिंबा या पैकी काहीही नसून दिल्लीच्या श्रेष्ठींची इच्छा म्हणून बाबासाहेब भोसलेंची निवड लादली गेली.

असं म्हणतात कि बाबासाहेब भोसलेंना आपल्याला यावेळी मंत्रिपद तरी मिळेल का याची खात्री नव्हती. मागच्या वेळी ते थोड्या फरकाने निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांची आणि शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंची घनिष्ट मैत्री होती. शिवसेनेने त्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. याचा फायदा उठवत बाबासाहेब भोसले साताऱ्यातून थेट मुंबईमध्ये कुर्ला नेहरूनगर या मतदारसंघातून उभे राहिले.

खुद्द बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रचाराला आले आणि भोसले निवडून आले.

पुढे इंदिरा गांधींच्या कृपेने ते मुख्यमंत्री देखील बनले.

बाबासाहेब भोसले यांना रिमोट कंट्रोलवर चालणार मुख्यमंत्री असं बोललं गेलं. दिल्लीतून येणाऱ्या आदेशावर ते कारभार करतात अशी टीका विरोधक करत असत. काही अंशी ते खरं देखील होतं. आमदारांचा पाठिंबा नसल्यामुळे बाबासाहेबांना दिल्लीचा सहारा घ्यावा लागत असे.

त्यांची कारकीर्द अल्पकाळ म्हणजे फक्त १३ महिने टिकली. पण त्याकाळातही त्यांनी दहावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, स्वातंत्रसैनिकांसाठी पेन्शन, औरंगाबाद येथील खंडपीठाची निर्मिती,गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती असे काही नजरेत भरण्यासारखे निर्णय घेतले.

पण त्यांचा सगळ्यात गाजलेला निर्णय म्हणजे भिवंडी येथे बारा वर्षानंतर शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी देणे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांचे आणि शिवसेनाप्रमुखांचे संबंध तसे मित्रत्वाचे होते. अंतुलेंच्या पेक्षा भोसले कधीही चांगले असं बाळासाहेब खुलेआम म्हणायचे. त्यांनी मुख्यमंत्र्याना भिवंडीमधील मिरवणुकीवर घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली.

प्रत्येक निर्णयासाठी दिल्लीकडे पाहणाऱ्या बाबासाहेब भोसलेंनी यावेळी मात्र कोणाचीही सल्लामसलत न करता माथाडी कामगारांच्या भरलेल्या सभेत अचानक भिवंडीच्या शिव जयंतीची घोषणा केली. इतकंच नाही तर मी स्वतः या मिरवणुकीत सहभागी होईन व आपण सगळे मिळून शांततेत व निर्विघपणे हि शिवजयंती पार पाडूया असे आवाहन केले.

बाबासाहेबांच्या या निर्णयामुळे राज्यभरात खळबळ उडाली.

कित्येक शिष्टमंडळे येऊन त्यांना हि निरवणूक रद्द करा नाही तर दंगली उसळतील, याचे परिणाम चांगले होणार नाहीत असे सांगून गेले. पण बाबासाहेबांनी खंबीर भूमिका घेत यंदाची शिवजयंती भिवंडीत जल्लोषाने साजरी होणारच असे ठणकावून सांगितले.

शिवजयंतीचा दिवस उजाडला. स्वतः बाळासाहेब ठाकरे या भिवंडीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. शिवसेनेचा वाघ म्हणून ओळखला जाणारे शिवसैनिक साबीर शेख छत्रपतींच्या मिरवणुकीत भिवंडीच्या मोहल्ल्यात सगळ्यात अग्रभागी होते.

बाळासाहेबांच्या सोबत त्यांचा लहानगा पुतण्या राज ठाकरे देखील सोबत होता. काही कारणांनी बाबासाहेब भोसलेंना या मिरवणुकीत पोहचण्यासाठी उशीर झाला. राज ठाकरे सांगतात,

“त्या दिवशी पायी आम्ही लाखो लोक शिवरायांच्या जयघोषात भिवंडीच्या मिरवणुकीतून चाललो होतो. वरून मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचं हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या मारत होतं .”

कोणतही विघ्न न येता हि शिवजयंती उत्साहात साजरी झाली. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा, शरद पवार या दिग्गज मुख्यमंत्र्याना जे जमलं नव्हतं ते बाबासाहेब भोसले यांनी सहज करून दाखवलं. या निमित्ताने ते दिल्लीच्या दबावाने निर्णय घेतात हा शिक्का देखिल पुसला गेला.

ज्या अनपेक्षितपणे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, त्याच अनपेक्षितपणे पुढे त्यांचं हे पद काढून देखील घेतलं गेलं. दिलखुलास बाबासाहेब भोसले यांनी याचे कधी वैषम्य बाळगले नाही. मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यावर त्यांची प्रतिक्रिया होती,

“माझं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं. पण माझ्या नावामागं ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद कायमचं लागलंय. ते कोण काढू शकतो?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.