बाबू जगजीवन राम यांना थेट बांगलादेशने वॉर हिरोची उपाधी दिली होती.

या वर्षी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी बांगलादेश दौऱ्यावर गेले होते. प्रसंग होता तिथल्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा. म्हणजेच बांगलादेश स्वतंत्र होऊन पन्नास वर्षे झाली होती आणि त्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले होते.

आता भारताच्या पंतप्रधानांना बांगलादेशच्या सुवर्ण जयंतीचा पाहुणा म्हणून बोलवणे यामागे देखील एक विशेष कारण आहे. ते कारण म्हणजे पाकिस्तानपासून बांगलादेशला मुक्ती मिळवून देण्यात भारताचाच सिंहाचा वाटा आहे. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठामपणे निर्णय घेतला आणि पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. आजही बांगलादेश याबद्दल भारताचे उपकार मानतो.

जेव्हा आपले पत्रकार मोदीजींच्या बरोबर बांगलादेशला गेले होते तेव्हा तिथे भारताच्या पंतप्रधानांचं जोरदार स्वागत झालं. इंदिरा गांधींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांचं कौतुक केलं गेलं. मात्र त्यावेळी तिथला एक जाणता नेता भारताच्या पत्रकारांना म्हणाला,

“बाबु जगजीवनराम जी को याद नही करेंगे तो अधुरा होगा. रक्षा मंत्री रहते हुए अपनी कुशलता से, सीमा पर जाकर सेनाओ का मनोबल बढाते रहे, उत्साह वर्धन करते रहे. और एक कुशल रक्षा मंत्री का फर्ज निभाया. वास्तव में बिना बाबु जगजीवन राम जी को याद करे हुए, बांग्लादेश की स्वतन्त्रता को सेलिब्रेट करना अधूरा है.”

बाबू जगजीवन राम.

सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न शकलेले आणि त्यामुळेच पंतप्रधानपदासाठी आवश्यक असलेली संपूर्ण पात्रता जवळ असून देखील पंतप्रधानपदाने हुलकावणी दिलेले,

भारताचे न होऊ शकलेले पहिले दलित पंतप्रधान म्हणूनही ज्यांचं नाव घेतलं जातं, असे नेते म्हणजे बाबू जगजीवन राम.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसशी जोडले गेलेले बाबू जगजीवन राम काँग्रेसमधील सर्वात मोठे दलित नेते होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील काँग्रेसकडील सर्वात मोठा नेता अशी त्यांची ओळख होती.

१९४६ सालच्या नेहरूंच्या अंतरिम सरकारमधील पहिल्या मंत्रिमंडळातील ते सर्वात तरुण मंत्री होते.

या मंत्रिमंडळात त्यांच्यावर कामगार मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हापासून ते आपल्या निधनापर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. नेहरूंच्या काळात त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या  जगजीवन राम यांनी  १९६९ साली जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस फुटली त्यावेळी  इंदिरा गांधी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (आय) पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. 

१९७१ सालच्या बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी ते देशाच्या संरक्षणमंत्री पदावर विराजमान होते. पूर्वेच्या सीमेवर भारताचे जवान बांग्लादेशच्या मुक्तीसाठी प्राणपणाने लढत होते. लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या कुशल नेतृत्वाखाली या युद्धाचे प्लॅन बनवण्यात आले होते. इंदिरा गांधी यांनी स्वतः या युद्ध रणनीती मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

तर संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम यांनी युद्धभूमीवर जाऊन जवानांचा हौसला वाढवण्याचं काम केलं होतं. त्यांनी या युद्धात केलेलं कार्य वाखाणण्याजोगं होतं.     

या सर्वाचा परिपाक म्हणजे भारताने हे युद्ध सहज जिंकलं. पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडण्यात आलं. तेव्हा बाबू जगजीवनराम म्हणाले,

हमारी कोई प्रादेशिक महत्वाकांक्षा नहीं है। हमे  इस बात की संतुष्टि है कि हमने बांग्लादेश की आजादी और भारत की पूर्वी सीमा पर एक धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक देश के प्रादुर्भाव में अपना योगदान दिया। भारत को द्विपक्षीय बातचीत के जरिये पाकिस्तान के साथ नए संबंध बनाने चाहिए जो संघर्ष पर नहीं अपितु सहयोग पर आधारित हों।

JR10
१९७१ सालच्या युद्धातील सैन्यासोबत संरक्षणमंत्री जगजीवन राम

१९७१ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध भारताने जिंकलं त्यात जितका वाटा पंतप्रधान इंदिरा गांधींचा होता, तितकाच वाटा संरक्षणमंत्री म्हणून जगजीवन राम यांचा देखील होता. परंतु इतिहासाने त्याचं योग्य मूल्यमापन कधीच केलं नाही. या युद्धातील इस्टर्न कमांडच्या लेफ्टनंट जनरल जेकब यांच्याच भाषेत सांगायचं तर,

‘जगजीवन राम हे भारताला मिळालेले सर्वोत्तम संरक्षणमंत्री होते.’

भारतात नाही पण बांगलादेशमध्ये बाबू जगजीवन राम यांना उचित सन्मान देण्यात आला. तेव्हाचे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजबीर रहमान यांनी जगजीवन राम यांना बांगलादेश युद्ध हिरोचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान केला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.