राजपूतांची एक चूक बाबरला भारतात मुघल साम्राज्य स्थापन करायची संधी ठरली…

भारतात मुघलांची सत्ता स्थापन करणारा बाबर. मूळचा कझाकस्तानचा. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना येथे झाला.

बाबर फक्त अकरा वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले व तो फर्घाना प्रांताचा राजा झाला. तो अभिमानाने स्वतःला मोगल म्हणवून घ्यायचा.

सुरुवातीपासून त्याला त्याच्या आप्तेष्टांच्या कट्टर विरोधास तोंड द्यावे लागले. मध्य आशियात साम्राज्य स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याने दोन वेळा आपल्या पूर्वजांची राजधानी समरकंद जिंकली पण दोन्ही वेळा ती त्याला गमवावी लागली. इतकेच नव्हे, तर फर्घान्यासही त्यास मुकावे लागले.

अखेर मध्य आशिया सोडून त्याने १५०४ साली काबूल जिंकले. बाबर पराक्रमी आणि तितकाच निर्दयी होता. त्याची आपले राज्य परत मिळवायची धडपड चालूच होती पण काबुल जिंकल्यापासून त्याचा एक डोळा भारतावर पडला होता.

गंगा यमुनेसारख्या नद्यांनी समृद्ध झालेला प्रदेश म्हणजे भारत.

त्याही काळात इथे अनेक संस्कृती सुखाने नांदत होत्या. भारतातुन सोन्याचा धूर निघतो असं म्हटलं जायचं. मध्य आशियातल्या वाळवंटात राहणाऱ्या अनेक टोळ्यांचे राजे भारत जिंकण्याचं स्वप्न बघायचे. भारतातल्या अगणित संपत्तीचा लोभ त्यांना असायचा. बाबर देखील त्यातलाच एक.

१५१२ साली जेव्हा त्याला ऑटोमन राजांनी समरकंद मधून कायमच हुसकावून लावलं तेव्हा मात्र तो भारताकडे वळला. तो आपल्या डायरीमध्ये लिहितो,

“काबुल जिंकल्यापासून हिंदुस्थान पादाक्रांत करण्याचा विचार माझ्या मनातून केव्हाही गेला नाही पण कधी माझे सरदार कचरत असल्यामुळे तर कधी भावांशी मतभेद होत असल्यामुळे माझा हिरमोड होत होता. “

आक्रमणाची योग्य संधी त्याला मिळत नव्हती. काबुल मध्ये त्याच उत्पन्न प्रचंड तोकडं होतं. मुघलांच्या सेनेला पोसण्याचा खर्च उत्पन्नापेक्षाही जास्त होता. शिवाय उझबेकीस्तानचे राजे काबूलवर कधीही हल्ला करतील याची भीती होती. याचमुळे बाबर भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होता.

भारतातील राजकीय परिस्थिती त्याला अनुकूल होती. दिल्लीचा तेव्हाच सुलतान सिकंदर लोदी १५१७ साली मरण पावला होता, त्याच्या गादीवर इब्राहिम खान लोधी बसला होता. या इब्राहिम खानची महत्वाकांक्षा मोठी होती. तो संपूर्ण भारतभरात आपलं साम्राज्य नेण्याचं स्वप्न पाहत होता.

इब्राहिम लोधीच्या आक्रमक स्वभावामुळे भारतात असलेले इतर अफगाण राजे आणि राजपूत राजे यांच्यात दहशत निर्माण झाली. पंजाब प्रांताचा सुभेदार दौलतखान लोधी हा चाणाक्ष होता. त्याने इब्राहिम लोधीला खुश ठेवून आपले बस्तान मांडले होते.

१५१८-१९ साली बाबर पंजाबच्या सीमेवर असलेल्या भिरा किल्ल्यात दाखल झाला.तिथून त्याने दौलत खान आणि इब्राहिम खानाला पत्रे पाठवली. पण दौलतखान लोधीने त्याच्या दूताला लाहोरमध्येच अडवले. बाबरचा संदेश दिल्लीच्या सुलतानापर्यंत पोहचू दिला नाही.

पुढच्याच वर्षी बाबर सिंधूनदी पार करून भारतात घुसला. भिरा आणि सियालकोट हि ठिकाणे मुघलांनी जिंकून घेतली. तो आणखी पुढे सरकला असता पण कंदाहारला बंड झाल्याची बातमी अली आणि बाबरला परत फिरावे लागले. दिड वर्षे वेढा देऊन त्याने कंदाहार परत जिंकून घेतले. तो आता अफगाणिस्तानातील सर्वात शक्तिशाली राजा बनला होता.

साधारण याच काळात त्याला भारतातून इब्राहिम खान लोधीला हरवण्यासाठी दोन आमंत्रणे आली. यातील एक आमंत्रण होतं दौलत खान लोधीचं तर दुसरं आमंत्रण होतं राणा संगा याचं.

राणा संगा यांनी खरंच हे आमंत्रण पाठवलं होतं का यावरून काही इतिहासकारांच्यात मतभेद आहेत. प्रा.सतीश चन्द्र यांनी मध्ययुगीन भारत या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे बाबरने आपल्या डायरीत तसा उल्लेख केला आहे.

चितोडचे महाराणा संग्रामसिंग सिसोदिया उर्फ राणा संगा हे शूरवीरांची परंपरा असलेल्या मेवाडचे राजे. ते देखील महापराक्रमी होते. आपापसात लढणाऱ्या आठ राजपूत राजांना त्यांनी मुस्लिम आक्रमकांच्या विरोधात एका झेंड्याखाली आणलं होतं. गुजरात मध्यप्रदेश पासून आजच्या पंजाब हरियाणा पर्यंत त्यांचं साम्राज्य पसरलं होतं.

दिल्लीच्या सुलतानापेक्षाही उत्तर भारतातील सर्वात मोठं व शक्तिशाली राज्य त्यांचं बनलं होतं. लोधी आणि राणा एकमेकांना मुख्य शत्रू मानायचे. राणाने दिल्लीच्या सुलतानी सेनेला अनेकदा सहज हरवलं होत.

इस.१५२५ साली दौलत खानाच्या निमंत्रणामुळे पाचव्यांदा बाबर भारतात आला. पेशावरमध्ये तो पोहचला पण तोपर्यंत दौलतखान लोधीने पलटी मारली होती. सियालकोटला मुघल सेनेला त्याने हाकलून लावलं होतं मात्र जेव्हा बाबर स्वतः त्याच्यावर चालून येतोय ही बातमी कळाली तेव्हा मात्र तो शरण आला.

दौलतखानाच्या नामुष्कीमुळे फक्त तीन आठवड्यात बाबरने पंजाब जिंकून घेतले. आता त्याचा दिल्लीच्या सुलतानाशी लढा अटळ होता. दोघांची गाठ पानिपत येथे पडली.

२१ एप्रिल १५२६ रोजी या दोन्ही सेना एकमेकांशी भिडल्या. बाबर फक्त १२ हजारांचे मोगल सैन्य घेऊन आला होता, त्या मानाने इब्राहिम खान लोधी कडे महाप्रचंड सैन्य होतं. पण बाबरने ऑटोमन साम्राज्यातून तोफा व त्या तोफा चालवणारे दोन गोलंदाज आणले होते. या तोफांनीं लोधीची दाणादाण उडवली.

दिल्लीच्या सुलतानाचा पहिल्या पानिपताच्या युद्धात पराभव झाला होता. बाबरला युद्धात भला मोठा खजिना हाती सापडला.लोधी घराण्याचे कंबरडे मोडले.

हे सर्व चालू होतं तेव्हा राणा संगा मात्र स्वस्थ बसले होते. दिल्लीच्या सुलतानाचा घमंड बाबर मोडून काढेल याची त्यांना खात्री होती. पण आजवरच्या इतिहासाप्रमाणे अफगाणिस्तान मधून आलेले परकीय आक्रमक भारतातून संपत्ती लुटून परत जातात हा त्यांना अनुभव होता. बाबर लोधीचा खजिना घेऊन परत जाईल असच त्यांना वाटत होतं.

पण तस घडलं नाही.

बाबरची हाव खूप मोठी होती. त्याला कायमचं श्रीमंत व्हायच होतं. मुघल सैन्य पानिपतच्या युद्धानंतर मातृभूमीला जाण्यासाठी निघालं देखील मात्र बाबर यासाठी तयार नव्हता. त्याने सैनिकांना आदेश दिले ज्याला परत जायचं आहे त्यांनी जावं मी आता भारतातच राहणार आहे. तो आपल्या डायरीत लिहितो,

“काबूलचे दारिद्र्य आता पुन्हा नको.”

त्याला देखील भारत देश आवडत नव्हता, त्याला सुद्धा घरची आठवण येत होती पण पैशांच्या मोहापुढे सगळं काही फिकं होतं. भारतात आपलं साम्राज्य स्थापन करायचं स्वप्न तो बघू लागला. मात्र यासाठी मोठा अडथळा होता राणा संगा यांचा.

बाबर परत जाणार नाही तो भारतात राहणार आहे हे कळताच राणा यांच्या रागाचा भडका उडाला. त्याला धडा शिकवायची वेळ जवळ आली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. राजपूत सेनेला एकत्र करून त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली.

इकडे बाबर म्हणतो की

राणा संगा यांनीच माझा वचनभंग केला. त्यांनी आम्हाला भारतात येण्याचे आमंत्रण दिले आणि  ऐनवेळी पानिपतच्या युद्धावेळी लोधीच्या विरुद्ध मदतदेखील केली नाही.

राणा संगा बाबरला हुसकावून लावतील या आशेने इब्राहिम लोधीचा मुलगा त्यांचं सैन्यात दाखल झाला. राणाच्या पराक्रमाची कीर्ती मुघलांच्या पर्यंत पोचली होतीच. तो चालून येतोय ऐकलल्यावर बाबरचे सरदार हादरले. निम्म्यापेक्षा अधिक सैनिक परत जाण्यास निघाले होते. सैन्याचं मनोधैर्य खचत चाललं आहे हे पाहताच बाबरने एक आयडिया काढली.

हि आयडिया म्हणजे जिहाद !

राणा संगा विरुद्धची लढाई हे धर्मयुद्ध असल्याचं त्याने जाहीर केलं. त्याला हिंदू मुसलमान रंग दिला. आपण कट्टर मुस्लिम आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या छावणीतील दारूचे मठ फोडून टाकले. राज्यात दारूबंदीचे आदेश दिले. मुसलमानांवरील जकात रद्द केला आणि हिंदूंवर अनेक कर लादले. याचा परिणाम धर्मासाठी लढायचं म्हणून मुघल नव्या उत्साहाने तयारीला लागले.

त्याने राणाच्या विरुद्ध स्थानिक मुसलमान सैनिकांना एकत्र केले. लढाईचं ठिकाण शोधलं खानवा. आग्र्यापासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर असलेलं खानवा हे मुघलांची सर्वार्थाने सोयीचं होतं. हि लढाई १५२७ साली झाली.

बाबरच्या मते राणा संगा हे तब्बल दोन लाखांचे सैन्य घेऊन आले होते. यात १० हजारांचं अफगाण घोडेस्वारांचे दळ देखील होतं. तितकेच हसनखान मेवाटीचे सैन्य होते. राणाच्या सैन्यात मुस्लिम सैनिक असूनही बाबरने दिलेला हिंदू मुसलमान युद्धाचा रंग मुघलांच्या कामी आला. मुघल जीव तोडून लढाईत उतरले.

राणा संगाने जोरदार हल्ला करून बाबरच्या सैन्याच्या उजव्या तुकडीला नामोहरम केले होते. मात्र बाबरने जबरदस्त व्युव्ह रचना बनवली होती. त्याने दोन्ही बाजूनी आक्रमण करत राणाच्या या भल्या मोठ्या सेनेला एका बेचक्यात अडकवले. त्याच्या तोफा या अडकलेल्या सैन्याचा वेध घेत होत्या.

रक्ताचे पाट वाहू लागले, राजपूत सेना पळून जाऊ लागली. भयंकर मनुष्यहानी झाली. राणाला माघार घ्यावी लागली. खानव्याच्या अटीतटीच्या युद्धात बाबरचा विजय झाला. हा विजय मुघलांच्या साठी निर्णायक ठरला.

पराभूत झालेल्या राणा संगाने पुन्हा लढाईची तयारी सुरु केली  पण खानव्यात बाबरने केलेल्या रक्तपाताने घाबरलेले इतर राजपूत योद्धे आता युद्ध नको म्हणून राणाला समजावत होते. पण बाबरचा प्रतिशोध घेण्यासाठी आसुसलेला राणा कोणाला ऐकत नव्हता. अखेर त्याच्या सरदारांपैकीच कोणी तरी युद्ध टाळण्या साठी त्याला विष खाऊ घालून मारले.

भारताच्या या महान सम्राटाचा दुर्दैवी अंत झाला आणि इथूनच मुघल साम्राज्याला सुरवात झाली असं मानलं जातं.

बाबरच्या तोफांनी आणि त्याच्या जिहादच्या हाकेने हा विजय घडवून आला होता.  राजपूत सरदारांनी राणाला विष देऊन मारण्याची चूक केली नसती तर कदाचित दुसऱ्या लढाईत त्याने बाबरला हरवून परत पाठवले देखील असते आणि पुढचा तीनशे वर्षांची गुलामगिरी टळली असती.

अशा रीतीने खानव्याची लढाई भारताचा इतिहास बदलवणारी ठरली.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.