बाजारात तंबू ठोकून जनतेच्या समस्या सोडवणारा आमदार पुणे जिल्ह्यात होऊन गेला

आजकाल नेतेमंडळीची जनता दरबाराची फॅशन आली आहे. पण खरी गोम अशी आहे की साध्या नगरसेवकाला भेटायचं झाल तर त्याच्या चमच्याच्या खिशात पाचशेची नोट सारावी लागते. कामासाठी द्यावे लागणारे पैसे वेगळेच. मंत्र्याचं दर्शन तर अति महाग झालंय. ते फक्त प्रचाराचा नारळ फोडताना दिसतात.

पण एके काळी असाही आमदार या महाराष्ट्रात होता जो गावच्या बाजारात तंबू ठोकून बसायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवायचा. नाव बाबुराव दौंडकर. शिरूर मतदारसंघ.

बाबुराव दौंडकर मुळचे जनसंघाचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या या पक्षाला त्याकाळी शेठजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखल जायच. ग्रामीण भागाच्या तळागाळात यांचे कार्यकर्ते अभावानेच आढळून येत.

बाबुराव दौंडकर यापैकीच एक. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. 

नामदेव-तुकोबाचे अभंग हेच भाषण आणि विठ्ठल भक्तांची मांदियाळी हाच कार्यकर्ता.

१९७८ साली इंदिरा गांधीनी केलेल्या आणिबाणीच्या दडपशाहीच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला होता. वर्षानुवर्षे सत्तेची खुर्ची उबवणाऱ्या नेत्यांपासून जनतेला आता बदल हवा होता. कॉंग्रेसच्या विरोधातील सर्व पक्षांनी आपली विचारसरणी बाजूला ठेवून हुकुमशाही विरुद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि जनता पक्षाची स्थापना झाली. यात विसर्जित होणाऱ्यामध्ये जनसंघसुद्धा होता.

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून सुरु झालेल्या जनता पक्षाच्यालाटेत असे अनेक आमदार खासदार निवडून आले ज्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता की पैशाचं पाठबळ नव्हत.

यातच होते बाबुराव दौंडकर. शिरूर या ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी  कॉंग्रेसच्या माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांचा 7 हजार मतांनी पराभव केला. 

साधा लाल एसटीतून प्रवास करणारा कार्यकर्ता मुबईच्या विधानभवनात आमदार बनून गेला. पण लाल एसटीची साथ सोडली नाही. राज्यभर कुठेही जायचं असेल तर एसटीतून हा नियम त्यांनी स्वतःपुरता घातला होता.

मतदार संघातही आमदार बाबुराव दौंडकर सायकलवरूनच फिरायचे. त्याही काळात लोकांना याच अप्रूप होतं. हा माणूस आपल्यातला वाटायचा.

त्यांची कामाची पद्धत देखील आगळीवेगळी होती. मतदारसंघातील गावामध्ये ज्या दिवशी आठवडी बाजार असेल तेव्हा तिथे बाबुराव हजर व्हायचे. आसपासच्या खेड्यातून आपला माल विकायला आलेले शेतकरी वेगवेगळा जिन्नस विकणारे विक्रेते यांच्या शेजारीच बाबुराव दौंडकर देखील स्वतःचा तंबू ठोकायचे.

डोक्यावर केशरी पटका, अंगात साधाच धोतर अंगरखा, साध्या चपला घालून बाजारात आपल्या तंबूसमोर कमरेवर हात ठेवून उभे असलेले आमदार कोणाची ना कोणाची गाऱ्हाणी ऐकत आहेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत हे अनोख दृश्य शिरूरवाल्यांना सवयीच झाल होत.

नागरिकांना आपल्या प्रतिनिधीला शोधत जाण्याची वेळ येऊ नये त्यापेक्षा आपण स्वताहून त्यांच्या जवळ पोहचायचे असे बाबुरावांचे विचार होते. 

यामुळे गोरगरीब शेतकऱ्याला देखील नेत्याचा संपर्क सोपा झाला. आपल्या आमदारकीचा वापर गडगंज संपत्ती गोळा करण्यासाठी असतो हे त्यांच्या गावी देखील नव्हत.

मुंबईच्या आमदार निवासातही त्यांच्या खोलीत दोन धोतर, दोन अंगरखे, काही वर्तमानपत्रे, एक सतरंजी एवढच साहित्य असायच. शिरूर भागातून येणाऱ्या गावकऱ्यांच ते हक्काच स्थान असायचं.

आमदार निवासातल्या खोलीत आपल्या गावाकडून आलेलेया कार्यकर्त्यासोबत खाली बसून दोन भाकरीच्या मधोमध दाबून आणलेल पिठलं, लसणाची चटणी जेवणारे बाबुराव दौंडकर हे तेव्हाच्या सत्ताधारी आमदारांमध्ये देखील चर्चेचा विषय होते.

पण दुर्दैवाने बाबुरावांची आमदारकीची कारकीर्द दोनच वर्ष टिकली. निवडणुका जिंकण्यासाठी लागणारी गणिते त्यांच्या आवाक्याबाहेरची होती.

शरद पवारांच्या पुलोद प्रयोगामुळे कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले आणि विरोधी पक्षाची जागा देखील कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या या नव्या पक्षाने व्यापली. पण निवडणुकांचा निकाल काहीही असला तरी बाबुराव दौंडकरांची लोकप्रियता शिरूर भागात कमी झाली नाही.

पैशाचं पाठबळ नसूनही प्रामाणिकपणे जनतेची कामे मार्गी लावणारा नेता म्हणून शिरूर करांच्या त्यांचं स्थान अढळ राहिलं.

पुढे जनता पक्षातून जनसंघाचे कार्यकर्ते वेगळे झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. बाबुराव दौंडकर पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष बनले.

भारतीय जनतापक्षाला ग्रामीण भागात रुजवण्याच काम त्यांनी निष्ठेनं केल. त्यांनी स्वतःसाठी आपल्या घरच्यासाठी काही कमवून ठेवले नाही. पण आपल्या पक्षासाठी उभी केलेली शेतकरी शेतमजूर कुटुंबातल्या तरुण कार्यकर्त्यांची फळी हीच आपली संपत्ती मानली.

गोपीनाथ मुंडे यांच्यासारखं नेतृत्व यातूनच उभं राहिलं. 

पक्षासाठी वाहून घेतलेल्या या कफल्लक कार्यकर्त्याच्या अखेरच्या काळात अटलबिहारी वाजपेयीं स्वतः त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायचे. त्यांच्याच हस्ते दौडकर यांना ५ लाख रुपयांची थैली देण्याचा कार्यक्रम झाला होता. पण पुढे काहीच वर्षात त्यांचं निधन झालं.

बाबुराव दौंडकर यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या मूळगावी कारंजवणे येथे पुतळा उभारण्यात आला. त्याच उद्घाटन गोपीनाथ राव मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. सध्या रांजणगाव गणपती येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याच काम देखील सुरु आहे.

ही आठवण जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी आपल्या लौकिक या पुस्तकात लिहून ठेवलेली आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.