ऑलिम्पिकचा चान्स हुकला आणि बाबुराव पेंढारकरांसारखा माणूस सिनेमात आला

असं म्हणतात, जे होतं ते चांगल्या साठी होतं. त्या एका क्षणी एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून नक्कीच वाईट वाटतं. पण कधी कधी काही गोष्टी नाही मिळणं सुद्धा आयुष्याला कोणती कलाटणी देऊन जातील काही सांगता यायचं नाही.

असंच काहीसं झालं दिग्गज मराठी अभिनेते, दिग्दर्शक बाबुराव पेंढारकर यांच्याबाबतीत. 

भालजी पेंढारकर यांच्याविषयी माहिती असेल ते मराठी सिनेसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल. भालजी पेंढारकर यांच्या कुटुंबाने मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला दिलेलं योगदान फार मोठं आहे.

जेव्हा मराठी इंडस्ट्री अगदी प्राथमिक स्तरावर सुरू झाली होती. सिनेमा आणि नाटकांची लोकांना ओळख होत होती. त्या काळात पेंढारकर कुटुंबाने नवनवीन सिनेमा आणि नाटकांची निर्मित केली. पेंढारकर कुटुंबाचे मोठे बंधू म्हणजे बाबुराव पेंढारकर. आणि त्यांचे धाकटे बंधू म्हणजे भालजी पेंढारकर.

भालजींची ओळख आपल्या सर्वांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत अनेक भव्य दिव्य असे ऐतिहासिक सिनेमे भालजींनी रुपेरी पडद्यावर आणले. आणि मराठी सिनेसृष्टीला शिवाजी महाराजांच्या चरित्राची नव्याने ओळख करून दिली.

बाबुराव पेंढारकर हे भालजींचे मोठे भाऊ. 

बाबुराव पेंढारकर आणि बाबुराव पेंटर यांच्या नावाची अनेकदा गल्लत होते. परंतु ही दोन्ही व्यक्तिमत्व वेगवेगळी.

तर, बाबुराव पेंढारकर यांचा जन्म २२ जून १८९६ रोजी कोल्हापूरला झाला. मराठी सिनेमांच्या सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म कंपनीने अनेक चांगल्या मराठी सिनेमांची निर्मिती केली. प्रभात कंपनीच्या स्थापनेत बाबुराव पेंढारकर यांचं मोठं योगदान आहे.

किंबहुना कंपनीला ‘प्रभात’ हे नाव बाबुराव पेंढारकर यांनीच सुचवलं. 

हा किस्सा बाबुराव पेंढारकर यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात घडलेला..

तालमी, कुस्ती अशा अनेक गोष्टींसाठी कोल्हापूर ओळखलं जातं. अशा कोल्हापुरात राहून सुद्धा बाबुराव पेंढारकर यांना कुस्ती खेळण्याची इतकी हौस नव्हती. त्यांच्या बरोबरची मुलं कुस्ती, दांडपट्टा अशा खेळांमध्ये तरबेज.

त्यामुळे त्यांना बघून लाल मातीत उतरण्याची इच्छा बाबुरावांच्या निर्माण झाली. पण मनात भीती सुध्दा तितकीच. बाबुराव जेव्हा तिसरीत होते तेव्हा त्यांची ओळख सरदार बाळासाहेब यादव यांच्याशी झाली.

बाळासाहेब यादव कोल्हापुरातील नामवंत कुस्तीपटूंपैकी एक होते. 

बाळासाहेब एकदा जबरदस्तीने बाबुरावांना कुस्तीच्या आखाड्यात घेऊन गेले. तालमीतल्या एका मुलाला त्यांनी बाबुरावांशी कुस्ती खेळायला सांगितले. त्या मुलाने अत्यंत त्वेषाने बाबुरावांवर चढाई करून त्यांना मातीत लोळवले. मातीत पडल्यामुळे नाका तोंडात माती जाऊन बाबुराव अर्धमेले झाले. आपण खूपदा ऐकलं आहे की पोहायचं असेल तर खूपदा मोठी मंडळी छोट्यांना पाण्यात ढकलून देतात.

पोहण्याचं काहीच ज्ञान नसलं तरीही पाण्यात पडल्यावर माणूस हातपाय मारतोच. तसंच काहीसं बाबुरावांच्या बाबतीत झालं. समोरच्या कुस्तीपटूने मातीत अक्षरशः चितपट केल्याने त्या लहानग्या वयात बाबुरावांची भिड चेपली आणि त्यांना व्यायामाची आवड लागली. 

१९२० साल.

जगभरात ऑलिम्पिक स्पर्धांचा एक माहोल होता. त्यावेळी या स्पर्धेसाठी इतकी चढाओढ नव्हती. कारण भाग घेणारे खेळाडू कमी होते. त्यामुळे वातावरण एकदम निवांत होतं. १९२० साली बेल्जियम येथील अँटवर्प येथे ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं. या स्पर्धेसाठी भारतातून कुस्तीगीर पाठवावेत म्हणून एक सराव चाचणी सामना होणार होता. या सामन्यात जो खेळाडू बाजी मारेल त्याची थेट ऑलिम्पिक साठी रवानगी होणार होती. 

हे कळल्यावर कोल्हापुरातील तालमीतून दोन विद्यार्थी तयार करण्यात आले.

त्यातले एक होते बाबुराव आणि दुसरे होते दिनकर शिंदे. बाळासाहेब यादव यांनी या दोघांकडून कसून तालीम करून घेतली. जोर बैठका, सूर्यनमस्कार, कुस्तीचे डावपेच अशा अनेक गोष्टी बाळासाहेब यादव या दोघांकडून करून घ्यायचे. दोघेही तयार झाले होते.

परंतु दोघांपैकी कोणा एकालाच ऑलिम्पिक साठी पाठवावं लागणार होतं. आता पंचाईत निर्माण झाली. यावर एक तोडगा काढण्यात आला. गावात कुस्तीचा व्यवसाय करणारे जे पहिलवान आहेत, त्यांच्याशी हे दोघं कुस्ती खेळतील. दोघांपैकी ज्याचे गुण जास्त त्याला ऑलिम्पिक साठी पाठवले जाईल. 

बाबुराव आणि दिनकर शिंदे दोघांना हा तोडगा पटला. कुस्तीची स्पर्धा भरवली गेली. न्यूनगंड म्हणा की आणखी काही..

बाहेरच्या पहिलवानां सोबत कुस्ती खेळण्यास बाबुराव थोडे कमी पडायचे. तालमीत ओळखीच्या माणसांना ते चितपट करायचे. परंतु बाहेरच्या कुस्तीपटूंशी दोन हात करण्यामध्ये बाबुरावांना कधीच यश मिळत नव्हतं. त्यादिवशी सुद्धा तेच झालं. दिनकर शिंदे सर्वांसोबत जोमाने लढत होते. परंतु बाबुरावांना मात्र बाहेरच्या लोकांना हरवणे कठीण गेले. जास्त गुणांनी दिनकररावांनी बाजी मारली. आणि १९२० साली भारताकडून जे कुस्तीपटू ऑलिम्पिकला पाठवले गेले त्यात दिनकर शिंदे यांचा समावेश होता. 

इतकी मोठी संधी हुकल्यामुळे बाबुराव पेंढारकर यांचा नक्कीच हिरमोड झाला. परंतु दुःख कवटाळत बसण्यापेक्षा त्यांनी नवी गोष्ट करायला घेतली, ती म्हणजे सिनेमा..

पुढे सिनेसृष्टीत बाबुराव पेंढारकर यांनी एक दिग्दर्शक, कलाकार म्हणून यश मिळवले. त्यादिवशी जर बाबुराव पेंढारकर यांची निवड झाली असती तर कदाचित सिनेसृष्टीत बाबुराव पेंढारकर यांनी शिरकाव केला नसता. त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी म्हणायचं.. कारण बाबुराव पेंढारकरां सारखी माणसं असल्यामुळे भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचला गेला. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.