अगदी हॉलिवूडची ऑफर नाकारून वयाच्या २२ व्या वर्षी निवृत्त होणारी मराठी अभिनेत्री

काही लोकं स्वत:च्या तत्वांवर आणि निर्णयावर ठाम असतात. समोर कितीही प्रलोभनं असली तरी अशा व्यक्ती निश्चयापासून ढळत नाहीत. ही कहाणी भारतीय सिनेसृष्टीतल्या अशाच एका अभिनेत्रीची. तिने जवळपास १०० सिनेमांमध्ये अभिनय केला.

परंतु करियर ऐन भरात असताना त्यांनी अभिनयातून संन्यास घेतला. ही अभिनेत्री म्हणजे बेबी शकुंतला.

बेबी शकुंतला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३२ साली झाला. त्यांची सविस्तर माहिती सांगण्याआधी एक गोष्ट सांगितली पाहिजे ती म्हणजे, त्या काळात बालकलाकार ते एक यशस्वी अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री आहेत. तर पूर्ण नाव शकुंतला महाजन. पुण्याच्या मातीत आणि आईवडिलांच्या संस्कारात त्यांचं बालपण बालपण गेलं. पुण्यातील भावे शाळेत बेबी शकुंतला यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं.

शकुंतला यांच्या आईचे नातेवाईक होते विष्णुपंत दामले. दामले हे प्रभात स्टुडिओचे मालक. त्यांचं महाजन कुटुंबाच्या घरी येणं जाणं असल्याने लहानपणापासून ते शकुंतला ला पाहत होते.

दामलेंनी महाजनांच्या घरी शकुंतला सिनेमात काम करू शकेल का? अशी विचारणा केली.

शकुंतला अवघी १० वर्षांची असल्याने वडिलांचा सक्त विरोध होता. अखेर मुलीच्या इच्छेपुढे त्यांनी हार मानली.

१९४२ साली प्रभात कंपनीच्या ‘दहा वाजता’ या सिनेमात बालकलाकार म्हणून बेबी शकुंतला झळकली. आणि अशाप्रकारे शकुंतला यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. शकुंतला त्या वेळी शाळेत शिकत होत्या. खूपदा त्यांना पुणे सोडून मुंबईला शूटिंगला जावं लागायचं. त्यामुळे भावे हायस्कूल कडून त्यांना सुट दिली गेली. शकुंतला साठी वेगळी परीक्षा आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यात येत असे.

वडिलांच्या शिस्तीमुळे शूटिंग सांभाळून पहाटे ४ वाजता अभ्यास करून शकुंतला प्रत्येक परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास व्हायची.

प्रभात सारख्या नामवंत फिल्म कंपनी मधून अभिनयाची सुरुवात झाल्याने बेबी शकुंतला यांना पुढे सुद्धा अनेक सिनेमे मिळाले. १९४० नंतरच्या दशकात बेबी शकुंतला या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रामशास्त्री’ सिनेमात त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी प्रचंड गाजली.

‘दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव’ या लोकप्रिय गाण्याने बेबी शकुंतला यांना अभिनेत्री म्हणून नवी ओळख मिळाली.

मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा बेबी शकुंतला यांना प्रचंड मागणी होती. कमल के फुल, छमाछम, नन्हे मुन्हे, पूजा, फरेब यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये बेबी शकुंतला यांनी भूमिका साकारल्या. इतकंच नव्हे त्या काळातली हॉलिवूडची प्रसिध्द MGM कंपनीच्या लोकांनी बेबी शकुंतला यांना सिनेमात काम करण्यासाठी विचारले होते.

परंतु इतक्या दूर आपल्या मुलीला पाठवण्याचं धाडस वडिलांना झालं नाही.

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शकुंतला चं अभिनयाचं करियर सुसाट सुरू होतं. त्यावेळचा एक छोटासा किस्सा असा.. एकदा भालजी पेंढारकर यांनी बेबी शकुंतला यांच्याशी संपर्क साधला. “तुम्ही या तारखेला शूटिंगसाठी या” असं भालजी म्हणाले. बेबी शकुंतला यांच्याकडे असंख्य सिनेमांच्या ऑफर्स होत्या.

“तुमचं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे का ? तारीख दिली आहे?”

असं शकुंतला म्हणाल्या. तेव्हा पलीकडून “मी भालजी पेंढारकर बोलतोय.” असा आवाज आला. “ते ठीक आहे, पण तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना?” असं शकुंतला यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या लहानग्या वयात शकुंतला यांना भालजी पेंढारकर कोण आहेत हे ठाऊक नव्हतं. नंतर वडिलांनी शकुंतला ला चांगलीच समज दिली. परंतु भालजी पेंढारकर यांनी शकुंतला वर अजिबात राग व्यक्त केला नाही.

पुढे भालजींच्या ‘छत्रपती शिवाजी’ या सिनेमात बेबी शकुंतला यांनी भूमिका केली.

बेबी शकुंतला आणि बॉलिवुड ची सौंदर्यवती मधुबाला या दोघींची घनिष्ट मैत्री होती. १९५० सालच्या ‘परदेस’ सिनेमात मधुबाला आणि बेबी शकुंतला यांनी एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून दोघींची मैत्री बहरली. मधुबाला च्या घरात तिच्या वडिलांची कडक शिस्त होती. कट्टर मुस्लिम कुटुंबात जन्म झाल्याने मधुबाला वर अनेक निर्बंध होते. परंतु बेबी शकुंतला सोबत मधुबाला ला बाहेर जाण्यास वडील परवानगी द्यायचे.

मग घराबाहेर पडल्यावर मधुबाला बुरखा घालायची. आणि शकुंतला आणि मधुबाला थेटर मध्ये इंग्रजी सिनेमे बघायचे.

बेबी शकुंतला यांचा अभिनय प्रवास बहरत होता. त्याचवेळी त्यांना मोठमोठ्या कुटुंबाकडून लग्नासाठी मागणी आल्या. अशावेळी बेबी शकुंतला यांनी मोठा निर्णय घेतला.

‘जर माझं लग्न फिल्म इंडस्ट्रीतील व्यक्तीसोबत झालं तर पुढे मी अभिनय करत राहीन. असं झालं नाही, तर मात्र अभिनय सोडून संसाराला प्राधान्य देईन.’

याच दरम्यान कोल्हापूरचं मोठं जमीनदार घराणं असलेलं खंडेराव नाडगोंडे यांच्याकडून लग्नाची मागणी आली. शकुंतला लग्नासाठी तयार झाल्या. लग्नाआधी त्यांनी काही सिनेमे पूर्ण केले. आणि लग्न होऊन बेबी शकुंतला कोल्हापूरला गेल्या.

लग्न झाल्यानंतर बेबी शकुंतला उमादेवी नाडगोंडे झाली. आणि त्यांनी अभिनयातून कायमची निवृत्ती स्वीकारली.

१९९६ साली महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांच्या हस्ते सरकारतर्फे बेबी शकुंतला यांचा विशेष सन्मान समारंभ आयोजित केला होता.

“तुम्ही या वयात कितीही वृध्द दिसत असला तरी तुम्ही सौंदर्य स्पर्धेत पहिल्या याल.”

असे कौतुकोद्गार प्रमोद नवलकर यांनी काढले. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी स्वतःच्या तत्वांवर ठाम राहून सिनेसृष्टीला अलविदा करणाऱ्या बेबी शकुंतला यांचं २०१५ साली निधन झालं. अवघ्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १०० सिनेमांमध्ये अभिनय करून अफाट काम केलं होतं.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Panjabrao Mali says

    Only one Song ” Don ghadhincha daw” the whole means baby Shakuntala

Leave A Reply

Your email address will not be published.