फक्त ५००० रुपये देऊन साईन केलेला हिरो बॉलिवूडचा शहेनशहा बनला.

बॉलिवुड मध्ये टिनू आनंद हे नाव घेतलं की पटकन लक्षात येत नाही. अर्थात जुन्या जाणत्या दर्दी सिनेप्रेमींना टिनू आनंद यांच्याविषयी नक्कीच माहीत असेल. जेव्हा कळलं की अमिताभ बच्चन यांचा शेहेनशाह सिनेमा टिनू आनंद यांनी बनवला आहे, तेव्हा कुतूहल आणखी वाढलं. बॉलिवुडमध्ये छोट्या – मोठ्या आणि बहुतांश वेळा निगेटिव्ह रोल मध्ये टिनू आनंद यांना बघितलं आहे.

थोडी आणखी माहिती शोधल्यावर कळलं की, याच माणसामुळे अमिताभ बच्चन यांचा बॉलिवुडमध्ये प्रवेश झाला होता. काय होता तो किस्सा..

टिनू आनंद यांचे वडील इंदर राज लोकप्रिय पटकथा लेखक होते. त्यांनी राज कपूर सोबत अनाडी, संगम इत्यादी ४ सिनेमे लिहिले. बॉलिवुड सारख्या बेभरवशाच्या दुनियेत आपल्या मुलाने येऊ नये ही त्यांची इच्छा होती. परंतु त्यांना कळलं की, टिनू याच क्षेत्रात येऊ इच्छित आहे.

इंदर साब ने मुलाला समजवायचा खूप प्रयत्न केला. शेवटी मुलाची दुर्दम्य इच्छा बघून इंदर राज यांनी टिनू च्या इच्छेला पाठिंबा दिला. टिनू आनंद यांना फिल्म मेकर व्हायचं होतं. म्हणून इंदर राज यांनी त्यांचे खास मित्र सत्यजित रे यांना चिठ्ठी लिहिली. सत्यजित रे यांनी मुलाला फिल्म मेकिंगचं प्रशिक्षण द्यावं, अशी त्यांनी विनंती केली होती.

सत्यजित रे चिठ्ठीला काय उत्तर देतात याची दोघा पिता – पुत्रांना उत्सुकता होती.

मधल्या काळात टिनू आनंद यांनी के. ए. अब्बास यांचा एक सिनेमा साईन केला. अब्बास साब यांना टिनू ची इच्छा ठाऊक होती. तसेच ते इंदर राज यांचे मित्र सुद्धा होते. म्हणून त्यांनी टिनू ला आपल्या आगामी सिनेमात प्रमुख भूमिका दिली. या सिनेमाचं नाव सात हिंदुस्तानी. अब्बास साहेब सिनेमाच्या इतर कामांमध्ये व्यस्त झाले. टिनू ची एक मैत्रीण अब्बास साब यांनी सात हिंदुस्तानी साठी निवडली. तिचं नाव निना.

एकदा नीना ने तिच्या एका मित्राचा फोटो टिनू ला दाखवून म्हणाली,

“हा मुलगा कलकत्त्यात राहतो. त्याला सुद्धा अभिनय करण्याची आवड आहे. तू जर अब्बास साब यांना सांगितलं तर त्याचं काम होईल.”

टिनू ने फोटो निरखून पाहिला. उंची जास्त असणारा एक किडमिड्या पोरगा त्यांना दिसला. टिनू ने तो फोटो अब्बास साब यांना दाखवला. अब्बास साब यांनी टिनू च्या म्हणण्याचा मान राखला. परंतु त्यांनी एक अट ठेवली,

“या मुलाला ऑडिशन साठी स्वखर्चाने मुंबईला यावं लागेल. ऑडिशन नेमकी कधी होईल सांगता येत नाही. पण तोपर्यंत या मुलाने मुंबईत राहण्याचा स्वतःचा खर्च स्वतः करावा.”

फोटो मधल्या त्या मुलाला मुंबईत येण्यासाठी कळवण्यात आलं. आणि सोबत या अटी सुद्धा सांगितल्या. मुलाला सर्व अटी मंजूर झाल्या.

इथे एन्ट्री होते अमिताभ बच्चन यांची. फोटो मधला तो उंचपुरा मुलगा म्हणजे अमिताभ बच्चन. त्यावेळी बच्चन साहेब सिनेमात काम शोधत होते. पण त्यांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे मुंबईत चालून आलेल्या संधीचा उपयोग करण्यासाठी बच्चन मुंबईत आले. त्याच दरम्यान सत्यजित रे यांनी टिनू ला फिल्म मेकिंगचं शिक्षण देण्यासाठी कलकत्त्याला बोलावलं.

मनावर दगड ठेवून टिनू आनंद यांनी सात हिंदुस्तानी सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा अमिताभ बच्चन यांना होणार होता.

टिनू सिनेमा सोडत असल्याने त्याची भूमिका अमिताभने करावी हे अब्बास साबनी ठरवलं. परंतु त्यांनी टिनू वर एक जबाबदारी सोपवली. ५००० रुपये मानधन देऊन टिनू ने अमिताभला सात हिंदुस्तानी साठी साईन करावं. त्याकाळी सिनेमात दुय्यम भूमिका करणाऱ्या नटाला सुद्धा इतकी कमी रक्कम दिली जात नव्हती. त्यामुळे अमिताभ समोर हा विषय कसा काढावा याचा टिनू आनंद विचार करत होते.

अमिताभला ही गोष्ट कळली. काहीही करून अमिताभला सिनेमात काम करायचं होतं. टिनू आनंद कडून मिळालेली पाच हजार रुपयांची रक्कम अमिताभ यांनी स्वीकारली. यानंतर टिनू आनंद कलकत्त्याला सत्यजित रे यांच्याकडे फिल्म मेकिंग शिकायला निघून गेले. आणि इकडे १९६९ साली अमिताभ बच्चन यांना सात हिंदुस्तानी हा पहिला हिंदी सिनेमा मिळाला.

पुढे अमिताभ बच्चन स्टार झाले. ज्या कलाकाराला ५००० रुपये देऊन टिनू आनंद यांनी करारबद्ध केलं होतं. त्याच अमिताभ बच्चन यांना आपल्या सिनेमात प्रमुख भूमिका देऊन टिनू आनंद यांनी ‘कालिया’ आणि ‘शेहेनशाह’ हे दोन सिनेमे दिग्दर्शित केले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.